'खालापूर'बद्दल तुम्हाला हे माहित आहे का?

मनोज कळमकर
Friday, 15 March 2019

सह्याद्रीच्या कडेकपारीची अभेद्य भिंत तर दुसऱ्या बाजूला गगनगिरी महाराजांची पुण्यभूमी. त्याला वळसा घालून वाहाणाऱ्या पाताळगंगा नदीलगत वसलेलं खालापूर गाव. ४५ ग्रामपंचायतीचे ठिकाण असलेलं खालापूर गाव तालुक्‍याच ठिकाण असेल असं प्रथमदर्शनी वाटत नाही.

सह्याद्रीच्या कडेकपारीची अभेद्य भिंत तर दुसऱ्या बाजूला गगनगिरी महाराजांची पुण्यभूमी. त्याला वळसा घालून वाहाणाऱ्या पाताळगंगा नदीलगत वसलेलं खालापूर गाव. ४५ ग्रामपंचायतीचे ठिकाण असलेलं खालापूर गाव तालुक्‍याच ठिकाण असेल असं प्रथमदर्शनी वाटत नाही.

परंतु खालापूरला असलेला ऐतिहासिक वारसा, बारा बलुतेदार परंपरा, पेशवाईच्या खाणाखुणा, धार्मिक स्थळांचा वारसा यामुळे खालापूर गाव वैशिष्ट्यपूर्ण बनलं आहे. विजापूरच्या आदिलशाहच्या ताब्यात असताना खालाला (आत्याला) इनाम दिलेल्या गावाचं पुढे खालापूर असे नाव झाले, अशी अख्यायिका सांगितली जाते; तर खोलेश्‍वर नावाच्या राजाचे राज्य होते, त्याच्या नावावरून खालापूर नाव पडले असा उल्लेख गॅझेटमध्येदेखील आहे.

पेशवाईत महालानंतर पेटा आणि पुढे १९४४ ला खालापूर तालुक्‍याचे ठिकाण बनले. गावाचे दोन भाग भौगौलिक रचनेत तयार झाले असून वरच्या आणि खालच्या भागात खालापूर गाव वसले आहे. १८ व्या शतकात रस्त्यालगतची वस्ती लुटारू टोळ्यांपासून संरक्षणाकरिता खालच्या भागात येऊन राहिली,

अशी वंदता असून तीच खालापूर बाजारपेठ आहे. गावात वरच्या बाजूला शके १२०८ मधील सोमेश्‍वराचे मंदिर आहे. मोगल आक्रमणात अनेक वेळा मंदिराची नासधूस झाल्याच्या खुणा भग्न अवस्थेतील नंदी व पुरातन मूर्ती पाहिल्यावर येते. गावात दोन मोठे तलाव असून वरच्या भागात साडेतीन एकरात पेठ तळे, तर गावात खालच्या बाजूला १४ एकरमध्ये विस्तीर्ण पसरलेला मसळा तलाव पूर्वी गावाच्या पाण्याच्या स्वयंपूर्णतेची साक्ष देतो.

आजूबाजूला शहरीकरण होत असताना खालापूरचं गावपण मात्र टिकून राहिलं. त्याचा परिणाम म्हणून गाव मूलभूत विकासापासून वंचित राहिलं. असं असलं तरी वाचन संस्कृतीचा वारसा ६९ वर्ष जपणारा, राष्ट्रसेवा तालुका वाचनालय म्हणजे वाचनाची भूक भागवेल अशी दुर्मीळ ग्रंथसंपदा जपून आहे. तीन वर्षांपूर्वी नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर खालापूर कात टाकत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News