ट्रेकर्सना खुनावतोय कर्नाळा किल्ला

स्वप्नील भालेराव
Monday, 27 July 2020

उन्हाळा सुरु झाला की, गर्मीने अंगाची लाही लाही होते, डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यांत घामाने अंग चिंब भिजून जाते. तशीच गत पावसाळ्यात देखील होते. तुडुंब भरलेली नदी- नाले, महापूर, दरड कोसळणे यामुळे जनजीवन विस्कळीत होते. त्यामुळे नागरिक भयभीत होऊन घरीच बसणे पसंत करतात. पण हिवाळा सुरु झाला की, अंगात एक ऊर्जा भरते. त्यातच थंडीची चाहुल लागली की, तरुणाईचे पाय भटकंतीला निघतात. सध्या तरुणाईत भटकंतीची प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. आठवड्याची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी तरुणाई निसर्गाच्या कुशीत जाण्याचा मार्ग अवलंबत आहे.

तरुणाई आणि निसर्ग यांच एक अतुट नातं नेहमी पहायला मिळत. निसर्गाच्या संरक्षणासाठी तरुणाई सरसावलेली असते. अनेक पर्यावरणवादी आंदोलनाची धुरा तरुणाईच्या खांद्यावर असते. तन-मन-धन लावून आंदोलनाची धुरा तरुणाई सांभाळत असते. हे अनेक आंदोलनावरुन सिध्द झाले आहे. निसर्गाशी मैत्री करुन तीचे सौंदर्य पुढच्या पिढीकडे हस्तांतरीत केले पाहिजे ही भावना तरुणाईत रुजू लागली आहे. निसर्गाशी मैत्री करण्याचे अनेक मार्ग तरुणाई अवलंबते. त्यातील सर्वांत आवडता मार्ग म्हणजे ट्रेकींग.

निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारा एकमेव मार्ग म्हणजे ट्रेकींग. सध्या ट्रेकींगला व्यवसाईक रुप आलं आहे. अनेक पर्यटन कंपन्या ट्रेकींगचे नियोजन करत असतात. पर्यटन कंपन्यांच्या ट्रेकींग दर आणि नियोजन सर्वसामान्य तरुणाईच्या आवाक्याबाहेर असल्यामुळे तरुणाईचा कल वैयक्तिक आणि ग्रुपने ट्रेकींग करण्याकडे आहे. ट्रकींगसाठी मुंबईरांच्या हक्काच ठिकाण म्हणजे कर्नाळा किल्ला. मुंबईतील रोजच्या धकाधकीपासून शांत ठिकाणी जायच असेल तर कर्नाळा किल्ला आणि पक्षी अभयारण्य हा पर्याय आहे. रायगड जिल्ह्यातील माथेरान डोंगर रांगेतील कर्नाळा किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने सोपा समजला जातो. ट्रेकींगचा मोठा थरार कर्नाळा किल्ल्यावर अनुभवायला मिळतो.

अद्यभुत निसर्ग सौदर्य-

किल्ल्याकडे जाताना कर्नाळा परिसर दृष्टीक्षेपास पडतो. दोन्ही बाजूनी हिरवागार जंगल, खळखळनाऱ्या नद्या, झुळझुळनारा वारा, धबधबे हे पाहून अद्यभुत निसर्ग सौंदर्याची परिभाषा समजते. अभयारण्यातुन किल्ल्याकडे जाण्यासाठी वाट आहे. त्यामुळे किल्ला सर करतांना अभरारण्याची सफर होते. सकाळी लवकर गेल्यास पहिली भेट माकडांची होते. त्यानंतर पक्षांचा किलबिलाट सुरु होतो. थोड पुढे गेल्यावर काही पिंजऱ्यातील पक्षी पहायला मिळतात. त्यात राष्ट्रीय पक्षी मोर, लांडोर, पोपट, कासव, सशांच्या काही प्रजाती पाहायला मिळतात.

किल्ल्यावर खाण्यासाठी काहीच मिळत नाही. मात्र किल्ल्याच्या पायथ्याशी नाश्ता व जेवणाची सोय आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या नाहीत, कच्ची वाट आहे. दगड, वेली, झाडांच्या मुळा यांचा सहारा घऊन ट्रेकरना चालाव लागत. साधारण २ ते ३ तास किल्ला चढण्यासाठी वेळ लागतो. गडाच्या जवळ जसे- जसे पोहचाल तसे सह्याद्रीचा सौंदर्याचा अनुभव ट्रेकर्सना येत जाईल. दगडातून ट्रेकींग करताना छत्रपतींच्या मावळ्यांची आठवण होईल, त्यातच "छत्रपती शिवाजी महाराज की जय" या गर्जेनेन किल्ला दुमदुमुन जाईल. अंगाच एक जोश अवतरेल आणि ट्रेकींगचा आनंद द्विगुणित होईल.  

सह्याद्रीचं मनमोहक दृष्य-

घाट चढल्यानंतर एक सपाट रस्ता लागतो. एका बाजूला सह्याद्री पर्वताच्या विस्तीर्ण रांगा, त्यावरुन वाहणारे पाण्याचे झारे दिसतात. खोल दरीतून शिट्टी वाजवात कोकण रेल्वे जातांना दिसते, हे पाहून एखाद्या चित्रपटात दृष्य डोळ्यासमोर उभं राहत. सह्याद्री पर्वाताच्या कुशित आल्याचे जाणवत. दुसऱ्याबाजूला सह्याद्री पर्वातातून जाणारा मुंबई- गोवा महामार्ग दिसतो. महामार्गावरुन जाणारे वाहन मुंगीच्या आकारासारखे दिसतात. त्याही पलीकडे मुंबईचा काही भाग दिसतो. कारखान्यातून निघत असलेला धुर, त्यातुन होणारे वायुप्रदुषण हे उघड्या डोळ्यांनी दिसते.

कर्नाळा देवीच्या मंदीरापासून गडाच्या टोकापर्यंत जाण्याची वाट खडतर आहे. एका वेळेस फक्त एकच व्यक्ती जाऊ शकेल अशी निमुळती वाट आहे. पावसाळ्यात आणि दोन्ही बाजूनी दरी आहे, तोल गेला किंवा पाय घसला तर थेट दरीत कोसळू शकतो, त्यामुळे ट्रेंकरसने काळजी घेत ही वाट सर करावी. प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर किल्ला सुरु होतो. किल्ला पाहण्यासाठी साधारण आर्धा तास लागतो.

परतीचा प्रवास-

गडावरुन खाली येण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक ज्यामार्गाने जातात त्याच मार्गाने परत येणे आणि दुसरा मार्ग घनदाट जंगलातून जातो. जंगलातून जाणारा मार्ग अतिशय कठीण वळणाचा आहे. नदी, ओढे, काटेरी झुडूप यांच्यातून वाट काढत पुढे जावे लागते. अनेक वेळा घसरुन पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शारीरिक ईजा होऊ शकते. काही प्राण्यांचे दर्शन यावेळी होते.  

तिकीट दर-

कर्नाळा किल्ला आणि अभरारण्य पाहण्यासाठी वन्यजीव विभागाने २५ रुपये तिकीट ठेवले आहे. मात्र सुरुवातीला १०० रुपये डीपॉजीट ठेवावे  लागते. सोबत गाडी आणली असेल कर पार्कींग आणि कॉमेरा यासाठी अतिरीक्त रक्कम भरावी लागते.

ट्रकींगची वेळ-  

सकाळी ७ वाजता कर्नाळा ट्रेकींगला सुरुवात केल्यास अभयाण्यातील पक्षी, प्राणी यांचे दर्शन होते. ऊन  डोक्यावर येण्याआधीच ट्रेकर्स गडावर पोहचू शकतात.

कसे जाल?

मुंबई-गोवा महामर्गावर मुंबई पासून ६२ किलो मीटर आणि पनवेल पासून १३ किलो मीटर अंतरावर कर्नाळा किल्ला आहे. कर्नाळा जाण्यासाठी दोन मार्ग आहे. मुंबई-गोवा महामर्गावरुन जाताना शिरढोण गाव लागत. गावाच्या पुढे गेल्यानंतर कर्नाळा किल्ल्याचा परिसर दिसतो. महामार्गावरुन बोटाच्या आकारासारखी कावळकडा दिसते. गोव्याकडे जाताना डाव्या बाजूला कर्नाळा किल्ला आणि अभयारण्य प्रवेशद्वार दिसले की किल्ल्याजवळ आलो अस समजावे. रसायनी- आपटा माहामर्गाने आकुळवाडी गाव लागते, गावातून जाणारी वाट मुख्य माहामार्गाला येऊन मिळते.

काय पाहाल?-

कर्नाळा किल्ला हा गिरीदुर्ग प्रकारातला आहे. त्यांची उंची अडीच लाख फुट आहे. किल्ल्यावर पुरातन दरवाजा, भवानी मातेच मंदिर, वाडा, शंकराची पिंड, सुकळा, पाण्याची टाकी, धान्यचे कोढार, नक्षी काम, मराठी व पारसी भाषेतील शिलालेख पाहण्याची ठिकाणे आहेत. सुकळा चढण्यासाठी ट्रेकर्सना प्रस्तरारोहणाचे कौशल्य आवश्यक आहे. प्रस्तरारोहणासाठी लागणारे सर्व साहित्य सोबत ठेवणे आवश्यक आहे.

पक्षी अभयारण्य-

कर्नाळा पक्षी अभयारण्य १२.१५४ चौ. कि. मी क्षेत्रात पसरले आहे. लाखो मैलाचा प्रवास करुन देशी -विदेशी पक्षी अभयारण्यात वास्तव्यसाठी येतात. त्यात ३७ जातीच्या पक्षांचा समावेश आहे. त्यांचे दर्शन आक्टोबर- फेब्रुवारी महिन्यात होते. शाहीन ससाण्याची जोडी याच काळात आपले खरटे बांधते. हा कालावधी पर्यटकनासाठी उत्तम समजला जातो.

 

 कर्नाळा अभयारण्यामध्ये भटकंतीसाठी नैसर्गिक वाटा व ट्रेक
 
अ. क्र निर्गवाट कालावधी लांबी  (कि.मी)  

  • 1 हरियाली ३० मिनिट 1  
  • 2 गारमाळ ९० मिनिट 3  
  • 3 मोरटाका १५० मिनिट 5  
  • 4 कर्नाळा किल्ला ९० मिनिट 3  
  • 5 विश्रांती गृह परिसर १५ मिनिचॉट 0.5    

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News