कलानिधीगड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 7 July 2020

कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेस चंदगड तालुक्यातील आटोपशीर आकाराचा थोड्याश्या सुस्थितीतील तट, बुरूज, देखणे प्रवेशव्दार, घनदाट जंगल आणि सोपी चढण असलेला आणि सहकुटुंब पाहता येण्यासारखा हा डोंगरी किल्ला आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेस चंदगड तालुक्यातील आटोपशीर आकाराचा थोड्याश्या सुस्थितीतील तट, बुरूज, देखणे प्रवेशव्दार, घनदाट जंगल आणि सोपी चढण असलेला आणि सहकुटुंब पाहता येण्यासारखा हा डोंगरी किल्ला आहे. सभासद बखरीनुसार हा किल्ला शिवरायांनी बांधला आहे. गडावरील उंचीने ठेंगणी आणि उतरती, पसरट छप्परे असलेली बैठी दोन मंदिरे वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

 

दोन विहिरी एकत्र असलेले विहिर संकुल आहे. हा किल्ला तसा दुर्लक्षित आहे, पण तो पाहण्यासाठी अलिकडे पर्यटकांची गर्दी होत आहे. सभासद बखरीतील उल्लेखानुसार हा किल्ला शिवरायांनी वसविलेल्या १११ किल्ल्याच्या यादीत आहे. हेरेकर सावंत भोसले, तांबूळवाडीकर सावंत यांचा या किल्ल्याशी प्रामुख्याने संबंध आला. गडाच्या दक्षिण बाजूकडील तटबंदीच्या मजबूतीकरणा संबंधात करवीरकर छत्रपतींच्या कागदपत्रात या गडाचा उल्लेख आलेला आहे.

 

पोर्तुगिज दप्तरातही कलानिधीगडाचा वारंवार उल्लेख येतो. विशेष उल्लेखनिय गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे लाडके व्यत्त्कीमत्व, पु. ल. देशपांडे यांचे मूळ आडनाव कलानिधीगडकर असे होते. त्यांचे पूर्वज या किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यांचे मूळ गावही चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी होते. या गावावरूनही त्यांना जंगमहट्टीकर या नावाने ओळखले जाई, म्हणूनच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पु. ल. देशपांडे यांना कलानिधीगडावर या नावाने हाक मारीत असत.

 

पहाण्याची ठिकाणेकलानिधीगडाचे प्रवेशव्दार लहान असले तरी फारच देखणे आहे. दरवाजातून आत गेल्यावर आपणास गड दोन भागात विभागल्याचे दिसते. एका भागात दूरसंचार खात्याचा मनोरा आहे आणि उर्वरित भागात गडाचे अवशेष आहेत. दरवाज्यासमोर डाव्या हातास आपणास अनेक जुनी बांधकामे दिसतात.

 

यातच दोन मंदिरे आहेत. पहिल्या मंदिरात शिवलिंग असून, त्यामागे भैरवाची मूर्ती आहे. दुसऱ्या मंदिरात गडाची अधिष्ठता भवानी देवीची लहान परंतु सुबक आणि शस्त्रसज्ज मूर्ती आहे. मंदिराच्या दारात वेगळ्या शैलीतील गणेशाची कलात्मक मुर्ती आहे. या मंदिरासमोर एक जुनी समाधी आहे. मंदिरे पाहून पुढे गेल्यावर तटबंदीच्या आत एक पायर्यांचा मार्ग खोल विवरात उतरताना दिसतो. येथे एका चौकोनी हौदात दोन विहिरी खोदलेल्या पहावयास मिळतात. यातील एक विहिर झाडांनी भरून गेली आहे, तर दुसरी विहिर वापरात आहे. या विहिर संकुलात अनेक पायऱ्या, देवळ्या आणि चौथरे इत्यादी दिसतात.

 

विहिर संकुल पाहून आपण गडाच्या पश्चिम तटबंदीवर चढून पुढे चालायचे, येथील उतारावरचे जंगल अतिशय घनदाट आहे. या ठिकाणी एक भव्य बुरूज लागतो. यापुढील एक भव्य बुरूज लागतो. या पुढील तटाचा काही भाग पाडून दूरसंचार खात्याने वर येण्यासाठी सडक बनविलेली दिसते. हा अपवाद सोडता संपूर्ण गडाची तटबंदी चांगल्या अवस्थेत आहे. या सडकेने खाली उतरून गडाकडे पाहिल्यास गडाच्या तटबंदीचे बुरूजांचे फारच मनोहरी दृष्य दिसते.

 

दूरसंचार टॉवरकडील तटबंदीमध्ये आपणास जागोजागी शौचकूप दिसतात. दूरसंचार खात्याच्या कचेरी शेजारी आपणास जुना वाडा दिसतो. गडाच्या पूर्व बाजूला ताम्रपर्णी नदीच्या नागमोडी पात्राचे मोहक दर्शन होते.

 

पोहोचण्याच्या वाटा :-

 

१)     स्वत:चे वाहन असल्यास बेळगावाला जायचे. तिथून शिनोळी-पाटणे फाटा मार्गे कालिवडे गावात जायचे. कालविडे गावातून किल्ल्यावर जाण्यास एक तास पुरतो.

 

२)     जर स्वत:चे वाहन नसल्यास कोल्हापूरहून चंदगड गाठायचे. चंदगड वरून शिनोळी-पाटणे फाटा मार्गे कालिवडे गावात पोहोचता येते. कलानिधीगड ज्या डोंगरावर वसला आहे, त्याची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. गड आटोपशीर असून उत्तम तटबंदीने वेढलेला आहे. कलिवडे गावातून गडावर वीजवाहिनी गेली आहे. तिची साथसोबत गडापर्यंत लाभते. कलिवडे गावापासून शेतातून जाणाऱ्या वाटेने आपण गडाच्या पूर्व बाजूच्या उतारावर असलेल्या वस्तीवर पोहचतो. ही वस्ती पार करून पुढे गेल्यावर गडावर जाणारा जांभ्या दगडातील पक्का रस्ता लागतो. हा रस्ता फिरून गडावर जात असल्याने, उजव्या हाताने जाणाऱ्या पायवाटेने चालू लागायच, डोंगराचा एक टप्पा चढून गेल्यानंतर एक खिंड लागते, ती ओलांडून आपण गडाचा डोंगर डाव्या हातास ठेवून, आणखी १५ मिनिटे चालल्यावर आपण गडाच्या दरवाज्यात पोहचतो.

 

राहण्याची सोय :- गडावर राहण्याची सोय नाही.

जेवणाची सोय :- जेवणाची सोय आपण स्वत:च करावी.

पाण्याची सोय :- गडावरील विहिरीत पिण्यायोग्य पाणी आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ :- कलानिधीगडावर पोहचण्यास कालिवडे गावातून १ तास लागतो.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News