काका, मी जिल्हाधिकारी होणारच

मंगेश शेवाळकर
Saturday, 8 June 2019
  • दोन्ही डोळ्यांनी दिव्यांग असलेल्या आशुतोषचा आत्मविश्वास
  • निकालानंतर आई, वडिलांच्या डोळ्यात उभे राहिले आनंदाश्रू.
  • मी खचून जाणार नाही. बारावी परिक्षेत यापेक्षाही जास्त गुण मिळविन

हिंगोली : काका, दहावी परिक्षेमधे भरपुर अभ्यास केला मात्र ५६ टक्केच गुण मिळाले असले तरी मी खचून जाणार नाही. माझे आई, वडिलच माझे डोळे आहेत. बारावी परिक्षेत यापेक्षा जास्त अभ्यास करून एक दिवस जिल्हाधिकारी होऊन आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करेल असा दुर्दम्य आत्मविश्वास दोन्ही डोळ्यांनी दिव्यांग असलेल्या हिंगोलीच्या आशुतोष देवके याच्या बोलण्यात जाणवत होता. 

हिंगोली शहरातील बरुडगल्ली भागात राहणारे नागेश देवके यांचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आहे. उन्हाळ्यामधे लग्नसराईमधे मंडपाचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या देवके यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलगा आशुतोष लहानपणापासूनच दोन्ही डोळ्यांनी शंभर टक्के दिव्यांग आहे. मात्र या परिस्थितीतही देवके कुटुंबियांनी त्याला शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. दहावी वर्गात प्रवेश घेतल्यानंतर त्याला अभ्यासक्रम झेपेल काय, त्यातच यावर्षी नवीन अभ्यासक्रम त्यातच तिव्र स्पर्धा यामधे मुलाचे कसे होईल याची चिंता देवके यांना होती.

मात्र डोळ्यांनी दिसत नसले तरी आई, वडिलांच्या बोलण्यातून दिसून येणारी काळजी हेरत आशुतोषने आई, बाबा मी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होईल तुम्ही काळजी करू नका असा विश्वास दिला. दरम्यान, मुलाने दाखविलेल्या आत्मविश्वासामुळे  देवके यांनी त्याच्यासाठी मुंबई येथून दहावीच्या अभ्यासक्रमाच्या सीडीज, मागविल्या तसेच पेनड्राईव्हमधे अभ्यासाचे साहित्य घेऊन त्याला मोबाईल द्वारे ऐकविण्यास सुरवात केली.

ब्रेललिपीतील पुस्तके वाचने अन मोबाईलवरून अभ्यासाची माहिती घेणे हा त्याचा दिनक्रम बनला होता. एका खोलीचे घर असलेल्या ठिकाणी आशुतोष दिवसातून किमान चार तास अभ्यास करीत होता. दहावी परिक्षेमधे पेपर लिहीण्यासाठी सहाय्यक घेऊन त्याने परिक्षा दिली. आज दहावीच्या परिक्षेचा निकाल लागल्यानंतर त्याने ५६ टक्के गुण मिळविल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या निकालानंतर आई, वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. 

दरम्यान, निकाला संदर्भात सकाळशी बोलतांना आशुतोष म्हणाला की, काका या निकालाने मी समाधानी नाही, मला किमान सत्तर टक्के गुण मिळणे अपेक्षीत होते. मात्र मी मागे हटणार नाही, माझे आई, वडिलच माझे डोळे असून त्यांच्या आशिर्वादानेच मी यश मिळवू शकलो. कमी गुण मिळाले असले तरी मी खचून जाणार नाही. बारावी परिक्षेत यापेक्षाही जास्त गुण मिळविन. मला जिल्हाधिकारी होऊन माझ्या आई, वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे असल्याचे त्याने सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News