नोकरीपेक्षा गावातच उद्योग उभारणारा "कैलास" फूडस्‌

विलास साळुंखे
Friday, 7 June 2019

एक घास तोंडात टाकला की त्याची कुरकुरीत, खुसखुशीत व झणझणीत चव जिभेला लागल्यावर ते संपूच नये आणि संपलेच तर पुन्हा पुन्हा घ्यावेसे वाटणारे "कैलास फूडस्‌' फरसाण आता फक्त साताऱ्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत. फरसाण्याचे अनेक ब्रॅंड आले आहेत. मात्र, कैलास फूडस्‌च्या उत्पादनांचा स्वाद न्यारा म्हणूनच "कैलास' फूडस्‌ उद्योगाच्या उत्पादनाचा खप आणि दबदबा संपूर्ण महाराष्ट्रात डोंगराएवढा आहे.

बांदल परिवाराने अत्यंत मेहनतीने, कष्टाने 23 वर्षांची आपल्या उत्पादनाची परंपरा चवीत, क्वॉलिटीत कोणतीच तडजोड न करता जपली आहे. मराठी पाऊल पडते पुढे या उक्तीला पुणे- बंगळूर महामार्गावर वाई तालुक्‍यातील पाचवडनजीक अमृतवाडी या गावातील दत्ताशेठ बांदल यांनी सार्थ करून दाखवले आहे. कोणताही व्यवसाय उभे करणे सोप असते; पण तो पुढे चालवणे आणि त्याच नाव राखणे खर तर कसरतीचे काम त्यांनी लीलया जपले आहे. "कैलास' फूडस्‌ उद्योगाची मुहूर्तमेढ 30 एप्रिल 1996 रोजी अमृतवाडी येथे रोवली. नोकरीपेक्षा गावातच राहून स्वातंत्रपणे उद्योग करावा, असा दूरदृष्टीचा विचार त्यांनी केला. सुरवातीला अल्पशा भांडवलावर अल्पसा माल तयार करून तो त्यांनी गावोगावी विकण्यास सुरवात केली.

तीन चाकी गाडीच्या माध्यमातून वाई तालुक्‍याच्या विविध गावांत जाऊन फरसाण विक्रीस सुरवात केली. अल्पशा कालावधीत चटकदार असणारा "कैलास'चा फरसाणा सातारा जिल्ह्यातील प्रत्येक घरात आणि प्रत्येकाच्या तोंडात जाऊन पोचला. त्याची चव जशी ती तोंडात गेली, तशीच प्रत्येकाच्या तोंडातून "कैलास'च्या उत्पादनाची वाहवा झाली. ज्याने खाल्ले त्याने दुसऱ्याला खायला लावले. पै-पाहुण्यांना सांगितल आणि त्यामुळे "कैलास'च्या उत्पादनाची भरभरून प्रसिद्धी झाली. 

दत्तात्रय बांदल यांनी व्यवसाय सुरू केल्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही. या व्यवसायात त्यांनी 23 वर्षांत अनेक चढ-उतार बघितले. बेसन तेलाचे वाढते दर कामगारांची अडचण, कच्चा मालाची कमतरता, व्यावसायिक स्पर्धा आदींचा सामना करीत बांदलशेठ यांनी "कैलास' फूडस्‌ची उत्पादने संपूर्ण महाराष्ट्रात पोचवली आहेत. आता यापेक्षा इतरांची कितीही भारी उत्पादने स्पर्धेत आली, तरीही "कैलास'चा ब्रॅंड कधीच मागे वळून पाहणार नाही. कारण बाजारात आणि घराघरांत व घरातील प्रत्येकाच्या मनात "कैलास'च्या उत्पादनांनी आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे. काजू, बदाम, पिस्तासह विविध फळांचा स्वाद असलेल्या बंगाली मिठाईची लज्जत लयभारी अशी भावना खवय्यांची होऊन बसली आहे. तोंडाला चव यावी म्हणून कुणी सकाळ-संध्याकाळच्या नाष्टा, वाढदिवस, लग्नकार्य, बारसे आदी कार्यक्रमांसह भूक लागली म्हणून कांदा-चटणी घालून भेळ-मिसळ बनविण्यासाठी, प्रवासातला साथीदार म्हणूनही "कैलास' फूडसची उत्पादने समाजातील घटकात अविभाज्य घटक बनून राहिली आहेत.

प्रत्यक्ष उत्पादन सुरू असताना, तयार माल दत्ताशेठ बांदल हे स्वतः वेळोवेळी दर्जा, चव तपासूनच पुढचं उत्पादन चालू ठेवातात. कच्च्या मालाचे दर कितीही वाढू देत; पण दत्ताशेठ बांदलांनी गुणवत्तेत कधीच तडजोड केली नाही म्हणूनच व्यावसायिक स्पर्धेत "कैलास'ची उत्पादने सरस ठरत आहेत. "कैलास'च्या उत्पादनांनी आज पुणे, मुंबई, नवी मुंबई, वाशी, महाड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, कणकवली, चिपळूण या बाजारपेठा काबीज केल्या आहेत. सुरवातीला पाच-पन्नास किलोवरून शे-पाचशे आणि आता टनाटनाने "कैलास'ची उत्पादने राज्यातील बाजारपेठेत जात आहेत. ते त्यांची खासियत आहे म्हणूनच दत्ताशेठ बांदलांना जशी वडील (कै.) शिवाजीराव बांदल यांनी व्यवसायात समर्थपणे साथ दिली, तशीच साथ आता दत्ताशेठ यांच्या पत्नी सौ. सुरेखा. बंधू नितीनबापू, पुतने किरण बांदल व निलेश बांदल, मुलगा सिद्धेश यांची लाभत आहे. त्यांच्या मृदू व मितभाषी स्वभावानुसार गोड लाघवी बोलण्याने चोखंदळ ग्राहक कैलास फूडस्‌च्या प्रत्येक आऊटलेटकडे आकर्षित होत आहेत.

पाचवड-कुडाळ रस्त्यावर वाई, जावळी तालुक्‍यांच्या सीमेवर असणाऱ्या अमृतवाडी येथे सुसज्ज मशिनरीसह "कैलास' फूडस्‌चे युनिट विविध उत्पादनासाठी उभे राहिले आहे. पूर्वी हाताने निर्माण होणारी उत्पादने आता पूर्ण यांत्रिक पद्धतीने बनवली जात आहेत. जरी यांत्रिकीकरण झाले असले तरी त्याची चव मात्र, हाताने बनवल्यासारखीच राखण्यात बांदल परिवाराला यश आले आहे. ही उत्पादने निर्माण करताना बांदल परिवाराला प्रचंड कष्ट व मेहनत घ्यावी लागली आहे. त्यांची जिद्द, चिकाटी आणि सचोटी यामुळे "कैलास' फूडस्‌ उद्योग भरभराटीला आला आहे. 

लवकरच या क्षेत्रातील उत्पादनात आमूलाग्र बदल करण्याचा त्यांचा मानस असून, बदलत्या शैलीप्रमाणे उत्पादनातही यापेक्षाही नावीन्य घडवून लवकरच महाराष्ट्रासह संपूर्ण देशातही "कैलास' उद्योगाचे जाळे पसरविण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. मित्र परिवाराची समर्थ साथ, दानशूरपणा आदी व्यवसायासाठी लागणाऱ्या पूरक गोष्टी बांदल परिवाराने चांगल्या पद्धतीने जोपासल्या व जतन केल्या म्हणनच या ग्रामीण भागातील मराठी माणसाचे पाऊल उद्योग व्यवसायात स्थिरावले आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात व बदलत्या बाजारपेठेत इतर कितीही उत्पादने येऊ देत; पण "कैलास'च्या उत्पादनांना विशेषतः फरसाण्याला खरोखरच तोड नाही. दत्ताशेठ बांदल आणि बांदल परिवाराच्या कैलास फूडस्‌ उद्योगसमूहाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होणार, यात शंका नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News