कोरोनाच्या विळख्यात आडकली कबड्डी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 2 June 2020
  • केंद्रीय क्रीडा खात्याने नुकतीच खेळाची गटवारी तयार केली आहे.

मुंबई : जर्मनीत व्यावसायिक फुटबॉल लीग सुरू झाली आहे. क्रिकेटच्या सरावास सुरुवात झाली आहे; पण मराठमोळ्या कबड्डीची कोरोनाच्या पकडीतून सुटका होण्याची सध्या तरी कोणतीही शक्‍यता दिसत नाही. किंबहुना कबड्डीचा दमच कोरोनाच्या चढाईत कोंडला जाण्याची चिन्हे दिसत आहेत.

केंद्रीय क्रीडा खात्याने नुकतीच खेळाची गटवारी तयार केली आहे. त्यात जास्त शरीरसंपर्क तसेच पाण्यात होणाऱ्या खेळांना नजीकच्या कालावधीत मंजुरी मिळण्याची शक्‍यता नाही. कबड्डी हा तर कमालीचा शारीरिक संपर्क असलेला खेळ आहे. कुस्ती, बॉक्‍सिंग, ज्यूदो, कराटे यांसारख्या खेळात झटापट असली, तरी ती वैयक्तिक असते. कबड्डी हा कमालीचा शारीरिक संपर्क असलेला खेळ आहे, त्यामुळे जेव्हा कबड्डीच्या स्पर्धा सुरू होतील, त्या वेळी जवळपास सर्व खेळ सुरू झाले आहेत, असे समजण्यास हरकत नाही, असे कबड्डी अभ्यासकांनी सांगितले.

राज्य कबड्डीतील संघटक अभ्यासकांच्या मताशी सहमत आहेत. त्यातील काही पदाधिकाऱ्यांनी तर कबड्डी कधी सुरू होईल, याबाबत काहीच सांगता येत नाही. यंदाचा मोसम सुरू होईल का, झाला तर कधी सुरू होईल, याबाबत काहीच सांगता येत नाही, अशी कबुली दिली; तर एका पदाधिकाऱ्यांनी थोडा टोकाचा विचार केला, तर या मोसमात कबड्डीच्या स्पर्धा होण्याची शक्‍यता कमी आहे. कदाचित मी काय बोलतो, ते कोणाला आवडणार नाही, पण प्रेक्षकांविना कबड्डीच्या स्पर्धा कशा होऊ शकतील. या परिस्थितीत किती स्पर्धांचे आयोजन होऊ शकेल, अशी त्यांनी विचारणा केली.

मुंबई असो किंवा महाराष्ट्रातच कशाला, देशभरात कबड्डी स्पर्धा प्रामुख्याने राजकीय व्यक्ती किंवा मोठ्या संस्था आयोजित करतात. या स्पर्धांच्या आयोजनाच्या माध्यमातून त्यांना प्रसिद्धी हवी असते. प्रेक्षकांविना स्पर्धा घेतली, तर स्पर्धा संयोजक कशाला पुढे येतील आणि स्पर्धांचे आयोजनही कसे होईल, अशी विचारणाही कबड्डी पदाधिकारी करीत आहेत.

कबड्डीस सुरुवात होणे जास्तच अवघड

कोरोनाच्या आक्रमणामुळे शरीर संपर्क खेळांचे पुनरागमन अवघडच झाले आहे. कुस्ती, बॉक्‍सिंग, वुशू, कराटे, ज्यूदो यांसारख्या खेळातही थेट शारीरिक संपर्क आहे, पण ते वैयक्तिक आहेत. मात्र कबड्डी हा सांघिक आहे. त्यातील एकास बाधा झाली असेल, तर त्याची लागण संघातील सात खेळाडूंनाच नव्हे, तर राखीव पाच खेळाडूंसह प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंनाही होऊ शकते. कबड्डीतील झटापटी पाहिल्यास त्यात एकाची पकड करण्यासाठी प्रसंगी सात खेळाडू जातात. त्याचबरोबर सामनाधिकारी, पंच, गुणलेखकही फार दूर नसतात.

कबड्डी पूर्ण ट्रॅक सूट घालून खेळली तरी त्यामुळे संपर्क काही कमी होणार नाही. त्याचबरोबर मास्क घालून कबड्डी खेळणे अवघड आहे. कबड्डी... कबड्डी.. कबड्डी... हा दम कसा घुमणार आणि तो घुमत असल्याचे पंचांना कसे दिसणार. त्याचबरोबर खेळाडूंना घाम येतो, हा घाम झटापटीच्या वेळी, केवळ साध्या होणाऱ्या चढाईच्या वेळी कोणाला लागणार नाही, याची काळजी कशी घेतली जाणार, अशी विचारणा कबड्डी अभ्यासकांनी केली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News