कबड्डी शारीरिक संपर्काचा खेळ; मार्गदर्शक तत्त्वे करून काहीचं साध्य होणार नाही

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 30 June 2020
  •  निवृत्त न्यायाधीश एस. पी. गर्ग यांचे मत

मुंबई : देशात क्रीडा सराव, शिबिरे, स्पर्धा सुरू करण्यास सुरुवात होत आहे; पण गेल्या काही वर्षात जास्तच लोकप्रिय झालेली कबड्डी सुरू करण्याबाबत अद्याप विचार झालेला नाही. कबड्डीच्या खेळाचे स्वरूप बघितल्यास मार्गदर्शक तत्त्वे करून काही साधणार नाही, त्यामुळे ते केले नसल्याचे. गर्ग हे भारतीय कबड्डी महासंघावर न्यायालयाने नियुक्त केलेले निरीक्षक आहेत.

मार्चमध्ये जयपूरला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा त्या वेळीच राजस्थानमध्ये कोरोना रुग्ण वाढत होते. त्यामुळे चिंतेची स्थिती होती. राष्ट्रीय स्पर्धेच्या वेळी प्रो कबड्डीची प्राथमिक चर्चा सुरू होती. मार्चपासून सर्वच खेळांच्या स्पर्धा स्थगित झाल्या. आता काही दिवसांपासून सराव सुरू झाला आहे; मात्र कबड्डीबाबत कोणतीही चर्चा नाही. "क्रीडा मंत्रालयाबरोबर आमची बैठक झाली होती. कबड्डी हा कमालीचा शारीरिक संपर्काचा खेळ आहे. तो खेळताना मास्क वापरणे अशक्‍य आहे; तसेच सुरक्षित अंतर राखणेही अशक्‍य आहे. त्यामुळे या खेळाबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे करून काही साधणार नाही. त्यामुळे ते केलेल नाहीत," असे गर्ग यांनी सांगितले.

कुस्ती, बॉक्‍सिंग हे शारीरिक संपर्क असलेले खेळ आहेत. त्यांच्या खेळांच्या पुनरागमनाची चर्चा सुरू झाली आहे. जपानमध्ये तर सुमो कुस्तीला सुरुवातही करण्यात आली आहे, याकडे कबड्डीप्रेमी लक्ष वेधतात. कबड्डी महासंघावरील निरीक्षकांना हे मान्य नाही. ते म्हणाले, "कबड्डी खेळ सुरू करण्यासाठी आम्हीही उत्सुक आहोत; पण त्यातील धोकाही लक्षात घ्यायला हवा. नजीकच्या कालावधीत कोणतीही आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धा नाही. त्यामुळे तातडीने शिबिर घेण्याची किंवा स्पर्धा घेण्याची गरज नाही, समजा आपण खेळ सुरू केला आणि कोणाला दुर्दैवाने कोरोना झाला, तर खेळाची प्रगती होणार नाही. त्याचा प्रतिकूल परिणाम होईल. परिस्थिती सुधारल्यास नक्कीच विचार करता येईल," असे त्यांनी सांगितले.

कबड्डी खेळ नक्कीच सुरू करण्यासाठी आम्हीही पावले उचलत आहोत. नवोदित खेळाडू, मार्गदर्शक, तांत्रिक पदाधिकारी यांना मार्गदर्शन करण्याबाबत विचार करीत आहोत. ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुरू करण्याचा विचार आहे. क्रीडामंत्र्यांना आम्ही हे सांगितले आहे. त्यासाठी संलग्न राज्य संघटनांबरोबर लवकरच चर्चा करणार आहोत. त्याचे मत जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर योजना तयार करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

परिस्थिती आटोक्‍यात आल्यावर प्रो कबड्डीचा विचार

कोरोनाचे आक्रमण वाढत आहे. रुग्ण वाढत आहेत, मुंबई, दिल्लीत तर जास्तच वाढत आहेत. या परिस्थितीत प्रो कबड्डीही सुरू करण्याचा विचार करणे अवघड आहे. एकदा ही साथ कमी झाली, की त्याबाबत विचार करता येईल, असे गर्ग यांनी सांगितले. प्रो कबड्डी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये घेण्याबाबत सुरू असल्याची चर्चा आहे, याकडे लक्ष वेधल्यावर गर्ग म्हणाले, कोरोनाची साथ आटोक्‍यात येण्याची आवश्‍यकता आहे. खेळाडूंचे आरोग्य पणास लावून कोणतीही स्पर्धा सुरू करण्यास परवानगी द्यायला क्रीडा मंत्रालय तयार नाही, असेही त्यांनी सांगितले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News