टोकियो ऑलिंपिक ठरल्यानुसारच

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 14 April 2020
  • पर्यायी योजनांचा विचारही करण्याची गरज नसल्याचा आता दावा

टोकियो ः टोकियो ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ठरलेल्या नव्या कार्यक्रमानुसारच होणार आहे. त्यामुळे पर्यायी योजनांचा विचारही करण्याची गरजच नाही, असे टोकियो ऑलिंपिक संयोजन समितीने स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी संयोजन समितीचे सीईओ तोशिरो मुतो यांनी एका वर्षाने लांबणीवर पडलेली स्पर्धा अनिश्‍चित असल्याचे सांगितले. टोकियो ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा 23 जुलै 2021 या दिवशी सुरू होतील, या दिशेनेच पूर्वतयारी सुरू आहे, असे संयोजन समितीचे प्रवक्ते मॅसा तॅकाया यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती आणि जपानचे पदाधिकारी यांच्यात गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत तारीख ठरली होती. तॅकाया यांनी जगातील निवडक पत्रकारांशी संवाद साधताना आम्ही लक्ष्यपूर्तीच्या दिशेने काम करीत असल्याचे सांगितले.

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा पंधरा महिने दूर असली, तरी ती अनिश्‍चित आहे. कोरोनाचे जगभरातील रुग्ण आणि मृतांची संख्या वाढत आहे. या परिस्थितीत कोणते पर्याय आहेत, या प्रश्नावर तॅकाया यांनी अन्य कोणत्याही पर्यायांचा विचार करण्याचा प्रश्नच नाही, असे सांगत, जणू ऑलिंपिक ठरल्यानुसारच होणार असल्याचे सांगितले. त्याच वेळी त्यांनी ऑलिंपिक तसेच पॅराऑलिंपिकच्या नव्या तारखा नुकत्याच ठरल्या आहेत, अशीही पुष्टी जोडली.

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅश यांनी टोकियो ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा पुन्हा लांबणीवर पडणार का, या प्रश्नाचे थेट उत्तर टाळले होते. त्यांनी टोकियो ऑलिंपिक 2020 संयोजन समिती तसेच अन्य समिती एकमेकांच्या साथीत काम करीत आहेत, असेच सांगितले होते. त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना टोकियो ऑलिंपिक यापेक्षा जास्त लांबवणे आम्हाला परवडणार नसल्याचे जपानच्या पंतप्रधानांनी सांगितले, असे बॅश यांनी नमूद केले होते. ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत 11 हजार, तर पॅराऑलिंपिक स्पर्धेत चार हजार चारशे खेळाडूंचा सहभाग असतो. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे सदस्य असलेल्या 206 देशांतील प्रतिनिधीही ऑलिंपिकसाठी उपस्थित राहतात.

वाढलेल्या खर्चाबाबत गुरुवारी चर्चा?

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा तसेच पॅराऑलिंपिक एक वर्ष लांबणीवर पडल्यामुळे जपानला दोन ते सहा अब्ज डॉलरचा जास्त खर्च होईल, अशी शक्‍यता आहे. हा खर्च आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने करावा, यासाठी जपान आग्रही आहे. मात्र आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती यास तयार नाही. ऑलिंपिक समिती आणि संयोजकात गुरुवारी टेलिकॉन्फरन्स आहे. त्या वेळी या वाढलेल्या खर्चाचा मुद्दा उपस्थित होईल आणि त्यावर चर्चा होईल, असे सांगितले जात आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News