फक्त तिच्यासाठी...

नितीन चंदनशिवे
Monday, 3 June 2019

तिच्याही हातात असतं घड्याळ
पण मिरवण्यासाठी नसतं ते
ती तिलाच गिरवत राहते
त्या काट्यांबरोबर..

तिचं घरटं असतं
तिची पिल्लं असतात
तिचा चिमणा असतो
ती असते संसारात
ती असते ऑफिसात
असते ती सगळीकडे

तिच्याही हातात असतं घड्याळ
पण मिरवण्यासाठी नसतं ते
ती तिलाच गिरवत राहते
त्या काट्यांबरोबर..

ती नटते
काढते एखादा सेल्फी
ती व्हाट्सअप वर आहे
ती फेसबुकवर आहे
बऱ्याच ठिकाणी दिसते ती
पण खरं सांगू?
ती रस्त्यावर पडलेली नसते.

तिला वाटतं आपणही व्यक्त व्हावं
लिहावी एखादी कविता
जमेल तशी
म्हणून लिहितेसुद्धा 

तिला आवडते माझी कविता
करते ती कमेंट मनापासून
म्हणून मी लगेच जायचं नसतं ना उसळून
लगेच तिचं प्रोफाईल पाहून 
द्यायची नसते ना कमेंट
खूप सुंदर दिसतेस म्हणून
तिच्याच इनबॉक्समध्ये जाऊन..

तिला जगू द्या ना यार 
तिच्या मनासारखं
होऊ द्या तिला व्यक्त
सोशल विनयभंग 
नाही सोसत तिला

आता अंगण नाही राहिलं तिला
शेजारणी येत नाहीत गप्पा मारायला
सगळ्याच जणी व्यस्त झाल्यात
करिअर शोधण्यात
आणि त्याच्या करिअरसाठी झिजण्यात

ती या अंगणात रमू लागलीय आता
तिच्या हरवलेल्या मनांची
गिरवलेली पानं
तिला जर इथं पुन्हा लिहावीशी वाटत असतील
तर मनमोकळं करून लिहू द्या तिला.

तिच्या स्वप्नांचे खून खूपदा होतात
खूपदा रडलीय ती आतल्या आत
आता पाझरू लागलीय ती
झिरपू लागलीय फेसबुकवर
तिला पाझरू द्या
झिरपू द्या
तिचं आयुष्य सुंदर आहेच
अजून सुंदर बनवूया..

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News