हिमतीने लढ...

पूनम माने, फलटण
Thursday, 9 May 2019

काळ्या आईचा लेक कधी 
संकटापुढे झुकला का? 
कितीही तापला सूर्य तरी 
समुद्र कधी आटला का? 

घरटे उडते वादळात 
बिळा, वारुळात पाणी शिरते 
कोणती मुंगी? कोणते पाखरू? 
म्हणून आत्महत्या करते? 

प्रतिकूल परिस्थितीतही 
वाघ लाचारीने जगत नाही 
शिकार मिळाली नाही म्हणून 
कधीच अनुदान मागत नाही... 

घरकुलासाठी मुंगी 
करत नाही अर्ज 
स्वत:च उभारते वारूळ 
कोण देते गृहकर्ज? 

हात नाहीत सुगरणीला 
फक्‍त चोच घेऊन जगते 
स्वत:च विणते घरटे छान 
कोणतं पॅकेज मागते? 

कोणीही नाही पाठी 
तरी तक्रार नाही ओठी 
निवेदन घेऊन चिमणी 
फिरते का कोणत्या योजनेसाठी? 

घरधन्याच्या संरक्षणाला 
धावून येतो कुत्रा 
लाइफ इन्शुरन्स काढला का? 
असे विचारत नाही मित्रा... 

राब राब राबून बैल 
कमावून धन देतात 
सांगा बरं कोणाकडून ते 
निवृत्ती वेतन घेतात? 

कष्टकऱ्यांची जात आपली 
आपणही शिकलं पाहिजे 
पिंपळाच्या रोपासारखं 
पाषाणावर टिकलं पाहिजे 

कोण करतो सांगा त्यांना 
पुरस्काराने सन्मानित 
तरीही मोर फुलवतो पिसारा 
अन्‌ कोकिळा गाते मंजूळ गीत 

मधमाशीची दृष्टी ठेव 
फुलांची काही कमी नाही 
मधाच्या पोळ्यासाठी मित्रा 
कोणतीच "रोजगार हमी' नाही 

घाबरू नको कर्जाला 
भय, चिंता फासावर टांग 
जीव एवढा स्वस्त नाही 
सावकाराला ठणकावून सांग 

काळ्या आईचा लेक कधी 
संकटापुढे झुकला का? 
कितीही तापला सूर्य तरी 
समुद्र कधी आटला का? 

निर्धाराच्या वाटेवर 
टाक निर्भिडपणे पाय 
तू फक्‍त विश्‍वास ठेव 
पुन्हा सुगी देईल धरणी माय... 

विश्‍वासाने जिंकू आपण 
पुन्हा यशाचा गड 
आयुष्याची लढाई 
फक्‍त हिमतीने लढ... 
फक्‍त हिमतीने लढ... 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News