आठ लढती गमावलेला आनंद शेवटून दुसरा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 31 July 2020
  • माजी जगज्जेत्या विश्वनाथन आनंदला लीजंडस्‌ ऑफ चेस स्पर्धेत आठव्या पराभवास सामोरे जावे लागले.
  • या स्पर्धेतील प्राथमिक नऊ फेऱ्यांत आनंदने एकच विजय मिळवला आणि त्याला तळाचे स्थान टाळल्याचेच समाधान लाभले.

मुंबई :- माजी जगज्जेत्या विश्वनाथन आनंदला लीजंडस्‌ ऑफ चेस स्पर्धेत आठव्या पराभवास सामोरे जावे लागले. या स्पर्धेतील प्राथमिक नऊ फेऱ्यांत आनंदने एकच विजय मिळवला आणि त्याला तळाचे स्थान टाळल्याचेच समाधान लाभले.

आनंद अखेरच्या फेरीत त्याचा पारंपरिक प्रतिस्पर्धी वासिली इवानचूकविरुद्ध अखेरच्या फेरीत पराजित झाला. या लढतीतील चार डावही बरोबरीत सुटल्यावर आनंदने आर्मगेदॉन डाव गमावला. या स्पर्धेत आनंदने या प्रकाराचे चारही डाव गमावले. या प्रकारात वेगवान खेळ करणारा यशस्वी होतो, आनंदला नेमके हेच जमले नाही आणि त्याला २-३ पराभवास सामोरे जावे लागले.

इवानचूक आणि आनंद यांच्यातील पहिली लढत १९८५ च्या जागतिक कुमार स्पर्धेत झाली होती. चेस ऑफ लीजंडस्‌मधील लढत नक्कीच संस्मरणीय नव्हती. आर्मगेदॉन डावात पांढरी मोहरी असलेल्या आनंदने सुरुवातीस प्यादे जिंकत छान सुरुवात केली. त्याचा खेळ इवानचूकपेक्षा जास्त वेगवानही होता. पांढरी मोहरे असल्याने आनंदला विजयच हवा होता, तर इवानचूकला बरोबरी पुरेशी होती. इवानचूकची बरोबरीची योजना हाणून पाडण्यात आनंद अपयशी ठरला. त्यामुळे स्पर्धेत पाचव्या आलेल्या इवानचूकने आनंदच्या दुप्पट बक्षीस जिंकले. आनंद चीनच्या डिंग लिरेनपाठोपाठ नववा आला.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News