‘ससुराल सिमर का’ ते ‘विद्या’ पर्यंतचा प्रवास 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 14 September 2019
  • ‘उडाण’ ही मालिका माझ्या आयुष्यात टर्निंग पॉईंट ठरली
  • लवकरच ‘विद्या’ मालिकेतून मी प्रेक्षकांसमोर येणार आहे.

मीरा देवस्थळे, अभिनेत्री
‘उडान’, ‘दिल्लीवाली ठाकूर गर्ल’सारख्या अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत पाहायला मिळालेली अभिनेत्री मीरा देवस्थळे लवकरच तिच्या ‘विद्या’ मालिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यानिमित्त तिच्या आजवरच्या प्रवासाबद्दल...  
 
मी मूळची बडोद्याची. अभिनय क्षेत्रात करिअर करायचे हे लहानपणीच ठरवले होते. त्या वेळी मी शाळेत वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे. नृत्याची आवड असल्याने लहानपणीच डान्स क्‍लासही लावले होते. शाळेत असताना डान्स आणि नाटकांच्या स्पर्धेसाठी माझे नाव आधी घेतले जायचे. कधीकधी असं व्हायचं की, मला न विचारताच माझं एखाद्या स्पर्धेसाठी नाव दिलं जायचं. कारण मी नाही म्हणणार नाही, याची पूर्ण खात्री शिक्षकांना होती.

मला अभिनयासाठी संधी मिळाली आणि मुंबईत यावे लागले. गेल्या पाच वर्षांपासून मी इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. ‘कलर्स टीव्ही’वरील ‘ससुराल सिमर का’या हिंदी मालिकेतून मी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. या मालिकेत मी काम केले असल्याचे प्रेक्षकांना आठवतही नसेल इतकी लहान भूमिका माझी होती. संपूर्ण मालिकेत केवळ दोनच दिवसांची माझी भूमिका होती.

एक पाहुणी कलाकार म्हणून मी या मालिकेत काम केले होते. याच मालिकेतून माझ्या अभिनय प्रवासाला खरी सुरुवात झाली. त्यानंतर मी ‘अँड टीव्ही’वाहिनीवरील ‘दिल्लीवाली ठाकूर गर्ल’ ही मालिका केली. ही मालिका करत असताना इंडस्ट्रीमधील कलाकारांशी माझ्या बऱ्यापैकी ओळखी झाल्या. या मालिकेमुळे मला बरेच काही शिकायला मिळाले. त्यानंतर मला कलर्स टीव्ही वाहिनीवरील ‘उडाण’ या मालिकेसाठी विचारण्यात आलं होतं.

या मालिकेत मी ‘चकोर’ ही भूमिका साकारली होती. या मालिकेतील ही माझी मुख्य भूमिका होती. खरं पाहता ‘उडाण’ ही मालिका माझ्या आयुष्यात टर्निंग पॉईंट ठरली. आमचं मूळ घर हे बडोद्यामध्ये आहे. पण माझे चित्रीकरण मुंबईत असल्याने मी आणि माझी आई मुंबईत राहतो. माझ्या घरातील मी पहिलीच मुलगी अभिनय क्षेत्रात असल्याने त्यांनाही माझ्याबद्दल खूप अभिमान वाटतो.

सध्या मी कलर्स टीव्ही वाहिनीवरील ‘विद्या’ मालिकेसाठी काम करत आहे. या मालिकेचे निर्माते महेश पांडे यांनी माझी ‘उडाण’ मालिका पाहिली आणि त्यातील माझं काम त्यांना आवडलं होतं. तशी आमची आधीपासून ओळख होती. पण मालिकेतील माझं काम आवडल्याने त्यांनी मला ‘विद्या’ मालिकेबद्दल सांगितलं. मला या मालिकेची कथा आवडली आणि त्यांना मी या मालिकेत विद्याची मुख्य भूमिका करण्याची इच्छा व्यक्त केली. लवकरच ‘विद्या’ मालिकेतून मी प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News