लोकमान्य टिळकांची पत्रकारिता 

विद्याविलास पाठक
Saturday, 1 August 2020
  • देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक सोनेरी व्यक्तिमत्त्व. ‘ स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच ’हा दुर्दम्य आशावाद घेऊन देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात केली

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक – देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक सोनेरी व्यक्तिमत्त्व. ‘ स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच ’हा दुर्दम्य आशावाद घेऊन देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात केली ती टिळकांनी. पुण्यात शिकत असतानाच त्यांच्या मनात ब्रिटिश सरकारविरुद्ध असंतोष धुमसत होता. तो त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवला आणि ते ‘भारतीय असंतोषाचे जनक’ झाले. समाजातल्या तळागाळातल्या घटकांची बाजू त्यांनी घेतली म्हणून ते ‘तेल्या तांबोळ्यांचे पुढारी ’ झाले. त्यांची स्वातंत्र्याची चळवळ ही नियोजन बद्ध होती. स्वराज्याचे ध्येय गाठण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा काढली, लोकांना संघटित करण्यासाठी गणेश –उत्सव आणि शिवाजी-उत्सव सुरू केले. लोकांचे प्रबोधन करण्यासाठी ‘केसरी’ मराठा’ सारखी वृत्तपत्रे काढली. 

बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी आपल्या इतर काही सहकार्यांशच्या मदतीने 1881 च्या जानेवारीत केसरी (मराठी)आणि मराठा (इंग्रजी) ही  वृत्तपत्रे सुरू केली. जनतेला स्वातंत्र्य चळवळीसाठी उद्युक्त करणे, सामाजिक परिवर्तनासाठी जनजागृती व शासकीय अन्यायाचा प्रतिकार हा त्यामागचा मूळ उद्देश होता. केसरीच्या पाहिल्याच अंकात ‘ रस्तोरस्ती रात्री दिवे लावलेले असल्याने व पोलिसांची गस्त सारखी फिरत असल्याने जो उपयोग होतो तोच ज्या त्या जागी वर्तमानपत्रकर्त्यांची लेखणी सदादीत चालू असल्याने होत असतो ’ अशा शब्दात केसरीचे धोरण स्पष्ट करण्यात आले होते. 1982 च्या अखेरीस केसरी हे भारतातील सर्वाधिक खप असलेले प्रादेशिक वर्तमानपत्र बनले.1884 मध्ये केसरीचा खप 4200, 1897 च्या सुरुवातीस 6750 व नंतर जुलै मध्ये तो 6900 पर्यन्त वाढला. 1927 मध्ये तो 24000 झाला. 1902 मध्ये तो ब्रह्मदेश (म्यानमार), सिलोन (श्रीलंका) , आफ्रिका , अफगाणिस्तान या देशातही केसरी जात असे. सुरूवातीला केसरीचे संपादक आगरकर तर मराठाचे संपादक टिळक होते. टिळकांच्या संपादकीय लेखनाच्या कारकीर्दीचे तीन कालखंड पडतात. 1881-1888, 1888- 1897, 1899-1908. 3 सप्टेंबर 1891 रोजी केसरी आणि मराठा या दोन्ही वर्तमानपत्रांचे संपादक म्हणून टिळकांनी स्वत:च्या नावाचे डिक्लरेशन केले. दरम्यानच्या काळात त्यांनी दारूबंदी, वंगभंग, बहिष्कार, प्लेग, दुष्काळ निवारण तसेच विविध शासकीय प्रश्नांसाठी आंदोलने, चळवळी केल्या. त्यात एक लढा वृत्तपत्र स्वातंत्र्याचा होता. ‘भाला’ आणि ‘काळ’ या वृत्तपत्रांवर सरकारने दाखल केलेल्या खटल्यांच्या विरोधात टिळकांनी सरकारवर कडाडून टीका केली होती. ‘इंग्रजी राज्यात सरकार हे निर्जीव,निरिंद्रिय,निराकार भाववाचक नाम झाले आहे ‘ असे ते म्हणत. वृत्तपत्राचा उपयोग ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढण्याचे एक शस्त्र म्हणून ते करीत.ज्या काळात ‘प्रेस इन्स्टिट्यूट’ ही संकल्पनाच नवी होती त्या काळात आपल्या वाड्याचा काही भाग ‘प्रेस इन्स्टिट्यूट’ला दिला जावा आणि या संस्थेमार्फत आपली वृत्तपत्रे चालविली जावीत अशीही इच्छा टिळकांनी व्यक्त केली होती.   

 केसरी, मराठा सुरू झाल्यानंतर काही काळातच कोल्हापूर संस्थानचे दिवाण माधवराव बर्वे यांच्याविषयी प्रसिद्ध झालेल्या लिखाणाबद्दल टिळक आणि आगरकरांना चार महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. 26 ऑक्टोबर 1882 रोजी त्यांची कैदेतून सुटका झाली. 1893 मध्ये झालेल्या हिंदू-मुसलमान दंग्यानंतर लोकजागृतीची साधने म्हणून गणेश-उत्सव आणि शिवजयंती  या उत्सवांना सार्वजनिक रूप देण्याची कल्पना पुढे आली॰  

1896 चा दुष्काळ आणि त्या पाठोपाठ आलेली प्लेगची साथ, या दोन्ही प्रकरणात केसरीने महत्त्वाची भूमिका बजावली.1887 पासून टिळकांनी खर्या॰ अर्थाने केसरीत लिहायला सुरुवात केली. केसरीत प्रसिद्ध झालेल्या ब्रिटीशांविरुद्धच्या लेखांबाबत टिळकांना तीन वेळा राजद्रोहाच्या खटल्याला सामोरे जावे लागले. 1897 चा खटला लॉर्ड सनढर्स्ट च्या काळात तर 1908 चा खटला सर जॉर्ज सिडनहॅम क्लार्कच्या काळातला. या दोन्ही खटल्यांना टिळकांचे केसरीतले लिखाण कारणीभूत ठरले तर 1916 चा  खटला त्यांच्या भाषणांमुळे दाखल करण्यात आला होता. प्लेगाच्या प्रतिबंधासाठी नेमलेल्या कमिशनर रॅन्ड याच्या हाताखालील गोर्याआ अधिकार्‍यानी धुमाकूळ घातला त्यामुळे 22 जून 1897 रोजी चाफेकर बंधूंनी रॅन्डचा खून केला. त्यासंदर्भात टिळकांनी ‘ सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ आणि ‘राज्य करणे म्हणजे सूड उगविणे नव्हे ’ असे अग्रलेख लिहिले. त्याचा परिणाम म्हणून त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेऊन खटला चालवण्यात आला. त्यात टिळकांना 18 महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा झाली. तुरुंगातून सुटल्यावर चार जुलै 1899 रोजी ‘ पुनश्च हरि:ओम !’ हा अग्रलेख लिहून टिळकांनी पुन्हा नव्या जोमाने स्वराज्यप्राप्तीच्या कामाला सुरुवात केली. ‘देशाचे दुर्दैव’ (12 मे 1908) आणि ‘हे उपाय टिकाऊ नाहीत ’(9 जून 1908) या अग्रलेखांमुळे टिळकांवर पुन्हा राजद्रोहाचा खटला चालविण्यात आला, त्यात टिळकांना ज्युरींनी दोषी ठरवून सहा वर्षे काळे पाणी व 1000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. 1915 मध्ये सर व्हलेंटाईन चिरोल यांच्या ‘ इंडियन अनरेस्ट’ या ग्रंथात आपल्या विरुद्ध बदनामीकारक मजकूर छापल्याबद्दल टिळकांनी लंडनच्या न्यायालयात अब्रूनुकसानीची फिर्याद केली होती तिचा निकाल टिळकांच्या विरोधात गेला.   

झक मारणे, बाजारबुणगे, षंढ , नोकरशाही यासारखे शब्द त्यांच्या लिखाणात नेहमी येतात. आपल्या वर्तमानपत्रात कोणता शब्द कशाप्रकारे छापून आला पाहिजे याबाबत त्यांनी खास पुस्तिका तयार केली होती त्या पुस्तिकेत जवळपास तीन-साडेतीन हजार शब्द होते. मराठी भाषेची लेखनपद्धती या विषयावर त्यांनी चार अग्रलेख लिहिले. प्रत्येक वर्तमानपत्राची भाषा त्या त्या संपादकाच्या भाषेवरुन ठरवली जाते. टिळकांची भाषा ही त्यांच्यासारखीच जहाल, लोकांच्या मनात घर करणारी होती. त्यांच्या अग्रलेखांची शीर्षके नजरेखालून घातली तरी याची प्रचिती येते. उदाहरणादाखल ही काही उदाहरणे पहा.. आमची मनेच फिरली पाहिजेत !, उत्तम गुराखी कोण ?, आशेची निराशा आणि निराशेची आशा, युनिव्हर्सिट्या उर्फ सरकारी हमालखाने, धूर्त कोण आणि फासला कोण ?, चतकोर भाकरीची गुलामगिरी, दुमजली इमारतीचा पुंडावा, हे सारा वाढविणे की जुलूम?, उठा, अजून वेळ गेलेली नाही , दुराग्रही सरकार आणि निर्बल लोकमत, डोंगर पोखरून उंदीर निघाला, कराची सूट आणि बाकीची लूट, पुण्यातील पहिली चिमणी, उजाडले पण सूर्य कुठे आहे ?, सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?, टोणग्याचे आचळ, प्रिन्सिपाल, शिशुपाल की पशुपाल, राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे !, हे आमचे गुरुच नव्हेत !, 110 कोटी रुपया कसा उडतो !, देशाचे दुर्दैव ! इत्यादि॰   1881 ते 1920 या काळात टिळकांनी सुमारे 513 अग्रलेख लिहिले.  
पत्रकार , पंडित, राजकारणी आणि भविष्यदर्शी नेता अशा विविध भूमिकातून लोकमान्यांनी लेखन केले जे प्रसंगोपात असले तरी त्यात शाश्वत तत्त्वांचे विवेचन आले आहे. राष्ट्रीय अभ्युदय आणि मानव जातीचे कल्याण या त्यांच्या राजकीय जीवनाच्या मुख्य प्रेरणा होत्या. गीता रहस्य या आपल्या ग्रंथातल्या सिद्धावस्था व व्यवहार या प्रकरणात टिळक म्हणतात- सर्व मानव जातीचे किंबहुना प्राणिमात्राचे ज्याने हित होईल तोच धर्म, हा जरी अखेरचा सिद्धान्त आहे , तरी परमावधीची ही स्थिति प्राप्त होण्यास कुलाभिमान , धर्माभिमान, देशाभिमान या चढत्या पायर्यात असल्याने त्यांची आवश्यकता केव्हाही नाहीशी होत नाही. 

राजयकारभारातील दोष काढून टाकण्यासाठी लोकांनी पुढे आले पाहिजे असा टिळकांचा आग्रह होता. दुष्काळ असो की प्लेग, त्या संकटांना तोंड देण्यासाठी त्यांनी आपल्या लेखांद्वारे जनतेत धैर्य निर्माण केले आणि गणेश- उत्सव, शिवाजी –उत्सव यांच्या द्वारा संघटना बांधली. त्यांनी सुरू केलेले असे उत्सव किंवा चालविलेल्या चळवळी अखिल जनतेसाठी होत्या. कोणा एका विशिष्ट जातीसाठी नव्हत्या हे त्यांनी आपल्या लेखातून तर मांडलेच त्याहीपेक्षा अधिक ठाशीवपणे आपल्या कृतीतून दाखवून दिले. 
जनतेला शिक्षण मिळाले पाहिजे- त्यातही जपानप्रमाणे औदौगिक व लष्करी शिक्षण मिळावे हा त्यांचा आग्रह होता आणि तो त्यांनी आपल्या शिक्षण विषयक लेखातून लाऊन धरल्याचे आढळते. शोध पत्रकारिता आणि विकास पत्रकारितेचा पाया टिळकांनीच घातला. 

शेतीशी तसा त्यांचा अर्थार्थी संबंध आला नव्हता तरीही शेतकर्यांळची शेती सुधारावी, त्यांना सरकारला द्यावा लागणारा अन्यायकारक सारा, यावर त्यांनी विपुल लिखाण केले आहे. ‘जमिनीची मालकी बुडाली’, ‘सावकार मेला कुणबिहि मेला!’, ‘फेरपहाणीचा जुलूम’ असे अनेक  अग्रलेख लिहिले. शेतकर्यांाविषयी टिळकांच्या मनात अत्यंत आदराची भावना होती. ते म्हणत ‘ हिंदुस्थानातील शेतकरी हा राष्ट्राचा आत्मा आहे. त्याच्यावरील मालीन्याचा पडदा दूर करता आला तरच हिंदुस्तानचा उद्धार होईल. या करिता शेतकरी आपला व आपण शेतकर्यां चे , असे आपणास वाटवयास हवे.’ 

‘सामाईकेने उभारलेल्या भांडवलांचे कारखाने’ या केसरीच्या पाहिल्याच वर्षी लिहीलेल्या लेखात टिळक म्हणतात ‘देश सधन असो व निर्धन असो, जित असो व अजित असो, लोकसंख्येच्या मानाने हलक्या दर्जाचे म्हणजे काबाडकष्ट करून निर्वाह करणार्याअ लोकांची संख्या जास्त असावयाचीच. या करिता या समाजाची स्थिति सुधारली नाही तोपर्यंत देशस्थिती सुधारली, असे कधीही म्हणता येणार नाही.’ देश म्हणजे काय, लोक म्हणजे कोण हे लोकमान्यांनी आपल्या मनाशी निश्चित केले होते. देश म्हणजे शेतकरी, देश म्हणजे काबाडकष्ट करणारी जनता. ‘शेतकरी हा राष्ट्राचा आत्मा’ असे 1880 मध्ये सांगणारे टिळक हे पहिले नेते होते.खरा हिंदुस्थान म्हणजे खेड्यापाड्यात आहे आणि तेथे राष्ट्र निर्माण करायचे म्हणजे या खेड्यापाड्यात जागृती करायची असा सिद्धान्त टिळकांनी मनाशी बांधला होता. अर्थात गिरणी- कारखान्यात काम करणारा कामगार वर्गही त्यांना तेव्हडाच महत्त्वाचा वाटत असे. 1902-3 पासून टिळकांनी त्या वर्गातही राष्ट्रीय जागृती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केले. म्हणूनच टिळकांना 1908 मध्ये झालेल्या शिक्षेच्या निषेधार्थ कामगारांनी संप पुकारला आणि सरकारी अत्याचारांना न जुमानता तो सहा दिवस चालू ठेवला. 

नोकरशाहीशी संघर्ष करण्याचे त्यांनी जणू व्रतच घेतले होते. हिंदुस्थानातली नोकरशाही निराळी आणि इंग्लंडमधील पार्लमेंट निराळे असा राज्यकर्त्या वर्गामध्ये त्यांनी जो भेद केला तो त्यांच्या राजकीय प्रतिभेचा उन्मेषच होय. 

जे हिन्दी राजकारण पूर्वी ‘सरकारसन्मुख’ होते व बौद्धिक पातळीवरून चालत होते ते लोकमान्यांनी लोकांच्या बोलीत बोलून ‘लोकाभिमुख’ केले आणि त्याला कृतीची जोड दिली आणि असे करताना आपल्या वाट्यास आलेले तुरुंगवासासारखे भोग स्थितप्रज्ञतेने सोसले. म्हणून त्यांच्या वाणीला मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले. त्यामुळेच त्यांच्या पाठीशी सारे राष्ट्र उभे राहिले. लोकमान्य भारतातील ‘लोकयुगाचे निर्माते‘ ठरले ते यामुळेच.

आपल्या लेखनाचे उद्दिष्ट स्पष्ट करताना ते म्हणतात ‘ आम्ही जे लेख केसरीत लिहितो ते केवळ आमच्या राज्यकर्त्यांसाठी नसून आमच्या मनातील तळमळ किंवा जळफळ सर्व मराठी वाचकांच्या मनात उतरावी एव्हड्याकरिता आहे. ( केसरी 11 फेब्रुवारी 1902). टिळकांची भाषा ठाशीव पण जळजळीत व प्रेरणा देणारी होती. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News