नोकरी की व्यवसाय, वाचा तरूणाईचे विचार  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 August 2020

नोकरी की व्यवसाय...नॊकरी तर का ? व्यवसाय तर का ?... या विषयावर आज 'यिनबझ'च्या अनेक ग्रुपमध्ये तरूणांनी मनसोक्त चर्चा केली. या चर्चेतील काही निवडक मते आणि प्रतिक्रिया आम्ही येथे देत आहोत.

नोकरी की व्यवसाय, वाचा तरूणाईचे विचार  

मुंबई - जगावरती आलेलं महामारीचं संकट केव्हा सरेल हे निश्चित कोणीचं सांगू शकत नाही. अशातचं अनेकांच्या नोक-या गेल्या आहेत, तर काही उद्योजकांचे उद्योग बंद झाले आहेत. कोरोनापुर्वीचं आयुष्य केव्हा सुरू होईल व ते सुरू होईल की नाही हे सुध्दा कोणीचं सांगू शकत नाही. नोकरी की व्यवसाय...नॊकरी तर का ? व्यवसाय तर का ?... या विषयावर आज 'यिनबझ'च्या अनेक ग्रुपमध्ये तरूणांनी मनसोक्त चर्चा केली. या चर्चेतील काही निवडक मते आणि प्रतिक्रिया आम्ही येथे देत आहोत.

माझ्यामते ज्यांच्याकडे बौद्धिक कौशल्य चांगले आहे, त्यांनी नोकरीसाठी प्राधान्य दिले पाहिजे. कारण ते सुरक्षित असते आणि तुमच्या बुद्धीची कदर नोकरी मध्ये जास्त चांगली होऊ शकते. तसेच तुम्हाला तिथे तुमची गुणवत्ता पाहून प्राधान्य सुद्धा मिळू शकते. जे मध्यम आणि कमी पात्रता मिळवून पास झालेले आहेत. त्यांनी व्यवसायाकडे वळावे. मग तो लहान व्यवसाय असेल तरी चालेल. कारण नोकरी केली तर उच्च पदापर्यंत पोहचण्यासाठी खूप वेळ आयुष्याचा जावू शकतो. ज्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे आणि तुमच्याशिवाय घरात कोण कमवणारा नसेल तर तुम्ही नोकरी पासून सुरुवात करा.. पुन्हा व्यवसाय केला तरी चालेल..कारण कोणतेही क्षेत्रात बॉस म्हणून काम करायचे असेल तर आधी नोकर म्हणून अनुभव घेतला पाहिजे..
शंभूराज पाटील

सध्याची बेरोजगारीची परिस्थिती पाहता व्यवसाय करणेच योग्य ठरेल.. कारण पदवी असूनही नोकरी मिळत नसल्याने इंजिनिअर सुद्धा चहाचा व्यवसाय करत असल्याचे आपण पाहिले आहे. सरकारी नोकरी प्रत्येकास मिळेलच असे नाही. तर खासगी क्षेत्रामध्ये कोणत्याही क्षणी नोकरीवरून पायउतार व्हावे लागते, आणि याचे उत्तम उदाहरण या लॉकडाऊनच्या काळात पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आत्मनिर्भरपणाने केला जाणार व्यवसाय हा अधिक उत्तम आहे असं  मला वाटतं
नागेंद्र स्वामी 

नोकरीपेक्षा व्यवसायाला प्राधान्य देणे नक्कीच चांगलं आहे...नोकरी करताना मर्यादा असतात तसं व्यवसायात नाही... तिथं आपल्या कल्पना, मत फक्त मांडायला नाही तर सत्यात उतरवण्याची संधी मिळते जी आपण स्वतः तयार केलेली असते. नोकरीत असणार राजकारण इथं आड येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण इतरांना नोकरी उपलब्ध करून देऊ शकतो. आजकाल सरकारी नोकरी शिवाय नोकरी सुरक्षित राहिली नाही त्यामुळं व्यवसाय हा पर्याय अधिक चांगला आहे. तसही इतरांच्या मर्जीने त्यांच्या हाताखाली एक प्रकारच्या दबावाखाली काम करण्यापेक्षा स्वतंत्र पणे स्वतःचा व्यवसाय उभा करणं अधिक हितकारक ठरु शकत.
मेघना 

आजच्या काळात नोकरी आणि व्यवसाय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे नोकरी म्हणजे काळानुसार मिळणारा मोबदला आणि व्यवसाय म्हणजे कामानुसार मिळणारा मोबदला. फरक फक्त  विचारांचा आहे. काळ्या मातित राबणारे हात असतील, किंवा किबोर्ड वर तासंनतास काम करणारे हात असतील. मेहनत ही  प्रत्येक ठिकाणी करावीच लागते. आज समाजात प्रत्येक व्यक्तीला वाटते नोकरी करणारे सुखी आहेत. पण खरं पाहिलं तर नोकरी करणाऱ्या व्यक्तीचे जीवन हे मर्यादित आणि ठराविक नियमांनुसार स्वरूपाचे ठरलेले असते. नोकरी करणारी व्यक्ती ही  कुणाच्या कुठल्याही कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना आधी मालकाकडून त्याला परवानगी घ्यावी लागते. व्यवसायात​ मात्र खूप वेगळी परिस्थिती असते. आपण आपल्या मर्जीचे म्हणजे स्वतःचे  मालक असतो. त्यामुळे अनेक पटीने अधिक व्यवसाय हा नोकरी पेक्षा श्रेष्ठ ठरतो. पण जेव्हा आपल्या हातात भांडवल नसते. आपल्याला समाजामध्ये कुणाचाही  आधार नसतो. तेव्हा अशावेळी या एकविसाव्या शतकातील स्पर्धेत​ टिकून राहणे खूप महत्वाचे असते. त्यामुळे स्वतः च्या मेहनतीने​ एक उपजीविकेचे साधन म्हणून नोकरी केली जाते.
शिल्पा नरवडे

मला वाटत आहे की, व्यवसाय करणे योग्य आहे कारण की, व्यवसाय केल्याने आपल्याला तर त्याचा फायदा होतो. परंतु आपल्यामुळे व्यवसायामुळे अनेक लोकांना रोजगाराच्या संधी देखील त्यामुळे उपलब्ध होतात. म्हणजे अनेक लोकांना त्यांचा फायदा होतो. आता संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आले आहेत. त्या अनेक लोकांच्या नोकऱ्या देखील गेल्या आहेत. आता व्यवसाय सुरू करण्यासाठी ही आत्ताच्या तरूण मुलांना चालून आलेली संधी आहे. व्यवसाय कोणताही असो लहान किंवा मोठा पण तो व्यवसाय जर प्रामाणिकपणे जर केला तर नक्कीच मोठा उद्योग निर्माण होऊ शकतो आणि एवढेच नाही तर अनेक घराचा आधार देखील होऊ शकतो. व्यवसाय म्हटलं की, थोडे चढउत्तार हे येणारच परंतु प्रत्येक गोष्टीतून मार्ग हा निघतोच. 
रसिका जाधव 

आजचा तरुण खूप हुशार आहे सतत नवीन काही ना काही शोधत असतो. आता तुम्ही म्हणाल नोकरी की व्यवसाय स्वावलंबी होणं कधीही खूप चांगलं (आत्मनिर्भर ). बरेचसे तरुण उद्योजक होण्यासाठी उडी घेतात खूप जण त्याच्यात खूप पुढे जातात पण काहींची गाडी मात्र तिथेच अडून बसते. काही आर्थिक संकटात सापडतात तर काही अनुभवात, व्यवसाय करण्यासाठी पेशन्स असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तूप खाल्लं की लगेच रूप येत अशातला भाग नाही. त्यासाठी सातत्य खूप महत्त्वाचं ठरतं आणि एकदा का तुम्हाला तुमचा व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचवता आला की मग काय तुम्हीच तुमचे राजे. आज कमी वयात व्यवसायात लोक खूप पुढे गेलेले आहेत. व्यवसाय करण्यासाठी आर्थिक फ्रीडम असणं खूप गरजेचे आहे आणि तुम्ही कुठला व्यवसाय करताय ह्या वर सुद्धा ते अवलंबून आहे .ज्याच्या कडे वेगळी संकल्पना असेल आणि पेशन्स असतील अश्यानी नक्की व्यवसाय करावा. नोकरी केल्याने आर्थिक अडचणी बऱ्याचदा जाणवत नाही तुम्ही तुमचं. जीवन आरामात जगू शकता अगदी महिन्याला तुमच्या अकाऊंट मध्ये पगार येत असतो पण तिथे सुद्धा अडचणी नाहीत असं नाही पण नोकरी करून सुद्धा तुम्ही हवी ती उंची तुम्ही गाठू शकता .फक्त त्याला कौशल्याची जोड हवी .आज नोकरीत मेहनतीच्या जोरावर उच्च पदापर्यंत पोहोचता येते आणि हवा तेव्हढा पैसा सुद्धा मिळवता येतो.
संदिप सुखदेव पालवे

कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोक-या गेल्या आहेत, कारण देशातील उद्योग बंद आहेत. तरूण हा आपला उदरनिर्वाह करण्यासाठी भेटेल ते काम करतोय. काहींनी छोटे-छोटे उद्योग सुरू करून आपला उदरनिर्वाह करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अधिक तरूणांची व्यवसाय करण्याला पसंती आहे. 
महेश घोलप

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News