नोकरी, फंडिंग आणि गायडन्स

दिलीप ठोसर
Saturday, 10 October 2020

सर नोकरीसाठी प्रयत्न करतोय. १-२ वर्ष नोकरी करून थोडे पैसे आणि अनुभव मिळला की मग स्टार्टअप करीन म्हणतोय. पण नोकरी मिळत नाहीये. सगळा कोविडचा गोंधळ चाललाय

नोकरी, फंडिंग आणि गायडन्स

- दिलीप ठोसर

लेखक हे मेन्टाॅर, इन्व्हेस्टर असून सिंबायोसिस सेंटर आॅफ आन्त्रप्रेन्यूअरशिप अँड इनोव्हेशनचे माजी सीईओ आहेत
 

राजेश अगदी होतकरू, सुशील, सुशिक्षित, शहाणा मुलगा. नुकताच भेटला. म्हणाला, "सर तुमचा गाईडन्स पाहिजे". छाती फुगवून मी म्हणालो, "बोल वत्सा काय प्रॉब्लेम आहे?" 

राजेश म्हणाला, "मला स्वतःचा बीझनेस सुरु करायचा आहे, स्टार्टअप".

मी म्हणालो "मग कर की"

त्यावर तो म्हणाला, "नाही, फंडींग हवंय". 

मी जोरात हा हा हा हा करत चक्क जमिनीवर लोळण घेतली. 

"आहो असा काय करताय, चुकलं का काही माझं? तो  कावरा बावरा थिजूल पुटपुटला.

मी म्हटलं, "नाही बुवा, काही चुकलं नाही तुझं. चुकण्यासाठी काही करायला लागतं. तू तर चूकच काय, काहीच केलं नाहीस"

दोन मिनिटांच्या दुहेरी स्तब्ध  शांततेनंतर तो म्हणाला, "सर मला काम करायचा आहे, त्या शिवाय कसं होईल. पण काय आणि कसं करू तेच सुचत नाहीये". 

मी कुतूहलाने विचारले, "मग सध्या वेळ कसा घालवतोस?"

म्हणाला, "सर नोकरीसाठी प्रयत्न करतोय. १-२ वर्ष नोकरी करून थोडे पैसे आणि अनुभव मिळला की मग स्टार्टअप करीन म्हणतोय. पण नोकरी मिळत नाहीये. सगळा कोविडचा गोंधळ चाललाय". 

मी अर्धा मिनिट हे नवीन ज्ञान पचविण्याचा प्रयत्न केला. अचानक त्याला विचारले, "अरे, आपली ओळख करून दिली तो आपला अंत्या काय करतोय सध्या?"

म्हणाला, "तो त्याच्या एका मित्राने कुठूनतरी PPE किट मागवले एप्रिलमध्ये आणि विकले हॉस्पिटल आणि लोकांना."  

मग?

मग त्यांनी काही बायकांकडून मास्क शिवून घेतले आणि रस्त्यावर मिळतील त्या विक्रेत्यांमार्फत विकले. २०-३० रुपयांना विकले गेले. रग्गड ३-४ लाख तरी कमीत कमी कमवले असतील" 

"अरे वा! चांगलेच उपदव्यापी निघाला आंतु !" 

"सर हे असले उद्द्योग करून काय फायदा?  पठ्यानी मग सरळ ऑक्सीजन सिलिंडर, आॅक्सिमीटर, घरगुती चवनप्राश आणि हातमोजे विकले. सर तुम्ही त्याला एकदा चांगला सल्ला दिला, आणि मला पण...”

"नाही बुवा! अंतू गेल्या सहा महिन्यात एकदाच भेटला. आपलं कार्ड वजा मेनूची यादी मला द्यायला आला तेव्हा पण घाईतच होता.” 

“त्याचं असू द्या सर, मला गायडन्स करा ना." 

“अरे हो तुला फंडिंग हवं होतं नाही का?  किती? कशासाठी?"

"सर मी आणि बंडू एक मशीन काढणार आहोत. तुंबलेली गटारं ऑटोमॅटिकली स्वच्छ करणारी... त्यात IOT, रोबोटिक्स, मुख्य म्हणजे AI भरलेला असेल. तर ते डिझाईन नीट करून पहिलं प्रोटोटाईप बनवायचंय. खूप खर्च येईल. तुम्हाला माहितीच आहे सर. मी, अंतू, बंडू, टम्या हे सगळे जसे गरिब, मध्यमवर्गीय घरचे. हे मशिन बनवायला पैसे लागणार ते कुठून आणणार आपण?”. 

“किती हवेत? 

सर एक लाख तर मटेरिअलचेच असणार. मग वर्कशॉप इत्यादीवर आणखी एक दोन लाख खर्च करायला लागतात आणि महत्वाचं म्हणजे मार्केटिंग करावं लागेल. त्यासाठी दहा लाख ते दोन कोटीच्या दरम्यान भरायला लागतील”.

“वा वा मोठा प्रोजेक्ट प्लॅन बनवलाय डिझाईन वगैरे तयार आहे ना?”

“नाही ना सर... अजून प्रोजेक्ट प्लॅन वगैरे नाही बनवला. फंडिंग मिळालं की ते पहिले करणार”

मी मनातल्या मनात पुटपुटलो. “किती हवेत” 

“सर आताच सांगितलं ना” 

“नाही रे... माझे शब्द तेच होते पण अर्थ वेगळा होता. या वेळेस सगळेच किती हवेत” आणि मग मी गुपचूपपने हसलो.

“अरे तू नोकरी शोधण्याबदल काय म्हणालास” 

“सर CV बनवतोय, बघु बघु… मी आणि बंडू म्हणत होतो तुमचा गायडन्स घ्यावा त्यासाठी”

“राजा, एक गोष्ट सांगतो... एक प्रकाश नावाचा होतकरू तरुण होता... जोशी सरांनी त्याला आपल्या फॅब्रिकेशनच्या व्यवसायात सुतार म्हणून नोकरीवर ठेवलं... अनेक दशकं लोटली... प्रकाश चांगलाच तरबेज सुतार झाला... सुंदर आणि किल्ष्ट लाकूड कामे शिकून त्यांनी ती बनवली... आता प्रकाश साठ वर्षाचा झाला. बासष्ठ वर्षाच्या जोशींना म्हणाला. सर आता हाडं जुनी झाली, आता रिटायर व्हावा म्हणतोय... त्याला वाटलं काही पेन्शन वगैरेचं बोलतील... केल्या कामाचं कौतुक करतील... पण जोशीबुवा कट्टर पुणेरी... म्हणाले, अरे वा छान छान पण रिटायर होण्याच्या आधी एक प्रोजेक्ट कर आणि आपल्या घरी जा. प्रकाश एकदम हिरमुसला... काय प्रोजेक्ट आहे. असलं सगळं जुनं सागवानी लाकूड दिसतंय. घराच्या सगळ्या गोष्टी या लाकडाच्या बनवायच्या. मोठी पार्टी दिसतीये कुणी तरी. ठीक आहे. खूप मेहनत लागणार. मनातल्या मनात प्रकाश हिरमुसल्यागत काम करायला लागला. पण त्याच त्यालाच मन लागेना पेन्शन नाही तर काही दहा-बारा हजार रुपये तरी हातावर ठेवायचे होते.  ते काही नाही तर, आणखी एक प्रोजेक्ट करून जा म्हणे, साईट पण कुठे गावाच्या बाजूला दिली. नशीब त्याच्या झोपडीच्या जवळपास होती. कसातरी दिवसामागे दिवस काम रेटत राहिला... अलाईनमेंट चुकायची, लाकूड नीट कापलं जायचं नाही. तसाच चालवायचं... शेवटी ते काम रेटत रेटत संपलं. जोशीबुवांकडे गेला ते काम संपलं म्हणून सांगायला... तर त्यांनी सर्व कामगारांना एकत्र केलं आणि त्या घराचे पेपर आणि किल्ली त्याच्या हातात ठेवत म्हणाले, प्रकाशराव इतकी वर्ष तुम्ही इमाने इतबारे काम केलं... घ्या आता दिल्या घरी सुखी राहा. म्हणजे हे घर मला भेट दिलं. हे भगवान म्हणत प्रकाशने जिथल्या तिथेच बसकण मारली. अरे अरे अरे नेहमी सारखंच नाही तर नेहमी पेक्षा जास्त लक्ष देऊन काम करायला पाहिजे होता. स्वतःलाच फसवलं आपण तर.” 

“राजा स्वतःला फसवू नकॊ. धंदा नाही तर नोकरी काहीतरी एक पकड आणि स्वतःचं समजून वाढवं... निश्चित यश पावशील. कृती कर. नुसती दिवा स्वप्न नकोत. गायडन्स मागण्या इतका कृतिशील हो, मग तुला माझा काय कुणाच्या गायडन्सची काही गरज पडणार नाही. तेव्हा तुला सगळ्यांकडून चांगला गायडन्स पण मिळेल. तेव्हा तू त्यातून काय घ्यायचे हे तू ठराव. जा कृती कर, यशस्वी हो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News