तो पहावा सर्वोत्तम जलदुर्ग... मुजऱ्यास तत्पर असे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019

बुरुज असे की समोरचे क्षितिज भेदरुन जाईल, आणि तटबंदी अशी की फटीतुन गवतसुद्धा रुजत नाही...

महाराष्ट्राला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. या समुद्रकिनाऱ्याच्या अंगानेच आमच्याकडे इतिहासात जलदुर्ग संस्कृती निर्माण झाली. महाराष्ट्राच्या किनारी असे शंभरएक जलदुर्ग आजही त्या समुद्राच्या लाटांशी गुजगोष्टी करत उभे आहेत. यातील काही ऐन समुद्रात, काही किनाऱ्यावर पाण्यात पाय बुडवून तर काही काठालगतच्या एखाद्या डोंगर-टेकडीवर ठाण मांडून बसले आहेत. या माळेतील एक छोटेखानी रत्न – पूर्णगड!

रत्नागिरीच्या पूर्व दिशेला समुद्रात समांतर अशी एक वाट गेलेली आहे. भाटय़ेची खाडी, पावस, गणपतीगुळे अशा या वाटेवरचा शेवटचा थांबा, पूर्णगड! या वाटेवरील पावसला अनेक पर्यटक-भाविक जात असतात. रत्नागिरी ते पावस अंतर २० किलोमीटर तर त्यापुढे १० किलोमीटरवर पूर्णगड! या पूर्णगडासाठी रत्नागिरी किंवा पावसहून बस, रिक्षा मिळतात. खरेतर रत्नागिरीहून स्वतंत्र रिक्षा करूनच निघाल्यास भाटय़ेचा किनारा, पावस, गणपतीगुळे आणि पूर्णगड अशी चारही स्थळे पाहता येतात.

पूर्णगड हे अगदी छोटेखानी गाव. गावाच्या पूर्वेला मुचकुंदी नदी आणि तिची पूर्णगड नावाची खाडी. रत्नागिरीहून निघालेली ही वाट या खाडीवरील पुलावरून पुढे राजापूर तालुक्यात शिरते. या मुचकुंदी नदीची एक गंमत! तिचा जन्म होतो विशाळगडाजवळ आणि ती समुद्राला मिळते पूर्णगडाशेजारी! एका गडाजवळ उगम पावत अन्य एका गडाजवळ समुद्रात अंतर्धान पावणारी ही एकमेव नदी असावी. 

असो. तर पूर्वेला मुचकुंदी नदीची खाडी आणि दक्षिण -पश्चिम बाजूला अथांग पसरलेला सिंधुसागर! या दोन्हीच्या मधे एका छोटय़ा टेकडीवर वसलेला हा पूर्णगड! किंबहुना त्याच्या या भूगोलातच त्याच्या निर्मितीची रहस्ये! या खाडीतील हालचालींवर नजर ठेवण्यासाठीच या गडाची निर्मिती झाली. कुठल्याही गडाचा इतिहास शोधताना त्याचा असा भूगोलही विचारात घ्यावा लागतो. पूर्णगड हे गाव अगदीच छोटीशी वस्ती! कोकणातील उतरत्या घरांची, आंबा, फणस, काजूच्या झाडांखाली विसावलेली. यातही फणसाची झाडे तर महामुबलक.

प्रत्येकाच्या दारा-अंगणात हे फणस अगदी बुंध्यापर्यंत फळांनी लगडलेले. फणसाच्या अंगाखांद्यावरील त्याच्या या बाळांना स्पर्श करतच निघायचे. या गावात शिरलो तरी हा पूर्णगड काही दिसत नसतो. तेव्हा कुठल्याही गावकऱ्याला या गडाबद्दल विचारावे तर एखाद्या घरामागे बोट दाखवत तो म्हणतो, ‘यो इथं मागू त्यों पूर्णगड!’ आणि तसेच होते. त्या छोटय़ा वाटेने निघालो, की अगदी दहा मिनिटांत गडाच्या प्रवेशदारात आपण हजर होतो. 
या दरवाज्यात येण्यापूर्वीच डाव्या हाताला एक तळे, विहीर दिसते. अगदी दाराशी हनुमानाचे एक छोटेखानी मंदिरही आहे.

शेंदूर लावून चकचकीत केलेल्या या हनुमानाचे दर्शन घ्यायचे आणि गडकर्ते व्हायचे.शिवकाळात बांधल्या जाणाऱ्या गोमुखी पद्धतीचा हा दरवाजा. गडाचा मुख्य दरवाजा तट-बुरुजांच्या आत लपवत बांधण्याची ही पद्धत. जेणेकरून शत्रूला गडाचा दरवाजा कुठे आहे, हेच कळू नये. पूर्णगडाच्या या दरवाजावर मध्यभागी गणेश तर बाजूला चंद्र आणि सूर्य कोरले आहेत. यातील गणेश मांगल्याचे तर चंद्र-सूर्य हे स्थैर्याचे प्रतीक! या लोकी जोवर हे चंद्र-सूर्य आहेत, तोवर हे स्थापत्य आणि आतील सत्ता अबाधित राहील असाच या शिल्पांचा संकेत! आपल्याकडे अनेक ठिकाणी ऐतिहासिक वास्तूंचे प्रवेशद्वार, शिलालेखांवर अशी चंद्र-सूर्याची रचना केलेली दिसते, त्यामागे याच ‘अक्षय’ 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News