जॅग्वार तेजतर्रार..!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 2 July 2019

टाटा मोटर्सची मालकी असणाऱ्या जॅग्वार लॅन्ड रोव्हरची एक्‍सई ही अत्याधुनिक स्पोर्टी कार.

टाटा मोटर्सची मालकी असणाऱ्या जॅग्वार लॅन्ड रोव्हरची एक्‍सई ही अत्याधुनिक स्पोर्टी कार. तेजतर्रार वेग, आरामदायी, दणकटपणा आणि सुरक्षा या सर्व आघाड्यांवर ही गाडी आपल्याला समाधान देते. तिच्यामध्ये पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात बदल करण्यात आले आहेत, जे या गाडीला अधिक उत्तम बनवतात.

अत्याधुनिक कारनिर्मिती करणे ही जॅग्वार कंपनीची प्राथमिकता आणि खास गोष्ट आहे. जॅग्वारच्या अन्य गाड्यांप्रमाणेच एक्‍सईचे डिझाइनही अतिशय उत्तम आहे. तिच्या डिझाइनमध्ये स्पोर्टीनेस आणि एलिगेंसचे अचाट मिश्रण पहायला मिळते. समोरून ही गाडी अधिक रुंद आणि लांब आहे. बोनेटवरील लाईनमुळे ती अधिक मस्क्‍युलर, मजबूत आणि बोल्ड लूक देते. समोरच्या बाजूला पातळ अशा स्वरूपात हेडलाईट देण्यात आले असून, त्यामध्ये एलईडी न वापरता एचआयडी प्रोजेक्‍टर हेडलॅम्प वापरण्यात आले आहेत.

‘जे’ आकारातील डीआरएल देण्यात आल्यामुळे रात्रीच्या वेळी उत्तम प्रकाश मिळतो. मात्र, यात बाजूचे लाइट देण्यात आलेले नाहीत. सर्वात पुढे हनीकोंब ग्रील देण्यात आले आहे. हे ग्रील आकाराने मोठे आहे. त्यामध्ये जॅग्वारचा लोगो देण्यात आला आहे. अन्य गाड्यांच्या तुलनेत नवीन जॅग्वारचे क्रोम गर्निशिंग अतिशय उत्तम आहे. ग्रीलमध्ये एक कॅमेरा देण्यात आला असून, तो ३६० अंशातील आहे. यामुळे गाडीच्या आजूबाजूचा परिसर पहायला मिळतो. गाडी पार्किंग करताना याची मोठी मदत होते. 
कारची पुढची बाजू अतिशय खाली वाटते. एका बाजूने गाडी पाहिल्यास ती चटकन नजरेत भरते. गाडीला उत्तम लूक देण्यासाठी गाडीच्या खिडक्‍यांवर क्रोम ट्रीटमेंट करण्यात आली असून, तिच्या दरवाजाच्या हॅन्डलला उत्तम रंगाची फिनिशिंग करण्यात आली आहे. सर्व जॅग्वार कारप्रमाणेच जॅग्वार एक्‍सईमध्येही फ्रंट क्रोम डक्‍ट देण्यात आले आहे. त्यामुळे व्हील वेलमध्ये जमा झालेल्या हवेला सामान्य रूपात बाहेर काढण्यासाठी मदत होते. गाडीच्या मागील बाजूलाही दोन मोठे टेललॅम्प देण्यात आले आहेत.

दोन्ही टेललॅम्पच्यामध्ये नंबर प्लेटसाठी जागा देण्यात आली आहे. नंबर प्लेटच्या बरोबर वरती पहात रहावा असा जॅग्वारचा लोगो देण्यात आला आहे. अन्य जॅग्वार कारच्या तुलनेत नवीन जॅग्वार एक्‍सईमध्ये ड्युअल टिप एग्जॉस्ट देण्यात आले आहेत. त्यामुळे ही गाडी स्पोर्टी कार असल्याचा फिल वारंवार करून देते. तसेच यात देण्यात आलेले अंतर्गत डकटेल अतिशय सुंदर आणि कार स्पोर्टी असल्याची जाणीव करून देते.

अंतर्गत रचना
गाडीमध्ये पाऊल ठेवल्यानंतर आपले स्वागत मोठ्या प्रमाणातील फिचर्स, आरामदायीपणाने होते. एक लक्‍झरी कार असल्याचा फिल यात सतत येत राहातो. नवीन जॅग्वार एक्‍सईमध्येही एफ पेससारखे सेंट्रल कंसोल देण्यात आले असून, यात आणखी विशेष ड्राइव्ह कंट्रोल देण्यात आले आहे. जॅग्वार एक्‍सईमध्ये नऊ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यात आली आहे. मात्र, ती अपेक्षेपेक्षा जरा लहान वाटते. कंपनीने म्हटल्यानुसार पुढील आणि मागील आसने अतिशय उत्तम आणि आरामदायी दिली आहेत.

गाडीची अंतर्गत रचना अधिक स्पेस आणि आरामदायी असणारी आहे. गाडीमध्ये ३०० लिटरचा आकाराने अतिशय मोठा बूट स्पेस (डिक्‍की) देण्यात आली आहे. यामध्ये एका कुटुंबाच्या दूरवरच्या प्रवासासाठी लागणारे सामान अतिशय आरामात घेऊन जाता येऊ शकेल. या लक्‍झरी कारमध्ये अतिशय मोठा सनरुफ देण्यात आला आहे. या सनरुफची सुरुवात अतिशय उत्तम आहे. ज्यावेळी आपण सनरुफला उघडतो, त्यावेळी कारचे सौंदर्य आणखी खुलून येते.

कामगिरी
नवीन जॅग्वार एक्‍सईमध्ये २.० लिटर डिझेल इंजिन देण्यात आले असून, ते १८२ बीएचपी ऊर्जा आणि ४३० न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करते. या इंजिनला आठ स्पीड झेडएफ ऑटोमॅटिक गिअरबॉक्‍स देण्यात आले आहेत. या माध्यमातून सर्व ताकद मागील चाकांना मिळते. ही गाडी ० ते १०० किमी प्रती तासाचा वेग घेण्यासाठी केवळ ९ सेकंदाचा वेळ घेते. गाडीचा सर्वाधिक वेग २२८ किमी प्रती तास इतका प्रचंड आहे. ही गाडी चार ड्रायव्हिंग मोडसह उपलब्ध आहे. यात इको, नॉर्मल किंवा शहर, डायनामिक आणि पाऊस किंवा बर्फ हे पर्याय देण्यात आले आहेत. आपण कोणत्या वातावरणात, कोणत्या प्रदेशात गाडी चालवत आहोत त्यानुसार हे पर्याय आपल्याला निवडता येतात.

इको मोडवर गाडी चालवल्यास इंधनामध्ये मोठी बचत पहायला मिळते; तर डायनामिक हा पर्याय अतिशय वेगाने गाडी चालवताना वापरण्यात येतो. पाऊस आणि बर्फ मोडमध्ये ही गाडी रस्त्यावर आपली पकड मजबूत करण्यासाठी मोठी मदत करते.

सुरक्षा वैशिष्ट्ये
सुरक्षा वैशिष्ट्यांचा विचार केला तर नवीन जॅग्वार एक्‍सईमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व ती काळजी घेण्यात आल्याचे दिसते. डायनॅमिक स्टॅबिलिटी कंट्रोल (डीएससी), एबीएस, ईबीडीसह बीए, टॅक्‍शन कंट्रोल, एसपीसी आणि पाच एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत. त्यामुळे एखादवेळेस चुकून अपघात झाला तरी गाडीतील प्रवाशाला अधिक जखमी होण्याची शक्‍यता कमी असते.

किंमत आणि मायलेज
जॅग्वार एक्‍सईची किंमत कंपनीने ४३.२१ लाख रुपये (एक्‍स शोरुम, नवी दिल्ली) ठेवली आहे. शहरामध्ये ही गाडी ११.२ किमी प्रति लिटर आणि हायवेवर १४.५ किमी प्रति लिटरचे मायलेज देते. जे एक लक्‍झरी कारच्या तुलनेत अतिशय अधिक आहे. ज्यावेळी गाडी इको मोडमध्ये मोकळ्या रस्त्यावर एकसमान वेगात असते, त्यावेळी गाडीचे मायलेज अधिक वाढलेले दिसून येते.

का घ्यावी?
४३ लाख रुपये या सुरुवातीच्या किमतीनुसार जॅग्वार एक्‍सई थोडी महाग वाटते. मात्र, तरीही जर आपण एंट्री लेव्हल मिड साईज स्पोर्टी सेदान कार खरेदी करू इच्छित असाल, तर ही गाडी उत्तम पर्याय आहे. यात गाडीची ताकद आणि आरामदायीपणा यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे.  त्यामुळे ती अनेकांच्या आवडीची गाडी ठरते.
 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News