'याची देही, याची डोळा'

लक्ष्मण जगताप, बारामती
Wednesday, 1 July 2020

आम्ही पण पालखी सोबत चालू लागलो. पहिल्यांदाच वारीत चालत असल्यामुळे खूपच आनंद झाला होता. वारीत प्रत्येक जण एकमेकांशी बोलताना "माऊली" म्हणूनच बोलत होता. हळूहळू पालखी पुढेपुढे जाऊ लागली. सकाळच्या प्रहरी रम्य वातावरण, उगवत्या सूर्यनारायणाचे मनमोहक दृश्य, रस्त्याच्या दुतर्फा पालखीच्या स्वागतासाठी उभे राहिलेले लोक.

पंढरीची वारी म्हणजे भक्ती व परमार्थ यांचा सुरेख संगम. कोणालाही कोणतेही आमंत्रण नसताना लाखो वारकरी एकत्र येतात ते फक्त विठुरायावर असणाऱ्या  श्रद्धेपोटी. कधी एकदाचे पंढरी येते आणि डोळे भरुन विठुरायाला पहायला मिळते असे वारक-यांना झालेले असते. म्हणूनच त्यांची पाऊले पंढरीच्या दिशेने झपझप पडत असतात. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता.

अशा आनंद सोहळ्यात आपल्याला पण सामील व्हायला मिळावे असे दरवर्षी वारी निघाली की वाटायचे. म्हणतात ना "इच्छा असेल तर मार्ग निघतो" त्यानुसार   रविवारी सुट्टीच्या दिवशी सकाळीच जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामतीचा मुक्काम आटपून काटेवाडीच्या दिशेने जाणार होती.

माझा एक चुलतभाऊ नेहमीच तुकाराम महाराजांच्या पालखी बरोबर वारीत देहू ते पंढरपूर पर्यंत चालत जायचा. वारी करून आल्यानंतर तो वारी विषयी माझ्याशी मनसोक्त गप्पा मारायचा. वारीत मिळणारे सुख या आयुष्यात एकदा तरी अनुभवावे असे वारंवार सांगायचे. तो आता या जगात नाही. पण वारी विषयीच्या त्याच्या गप्पा आजही आठवतात. आपल्याला पण वारी करता यावी असे मनोमन वाटायचे. त्यानुसार मी व माझ्या मिञांनी बारामती ते काटेवाडीपर्यंत वारीत चालत जायचे ठरविले. रविवारी सकाळी लवकरच बारामतीच्या पालखी मुक्कामी ठिकाणी पोहचलो. आणि काही वेळातच पालखीने काटेवाडीच्या दिशेने प्रस्थान केले.

आम्ही पण पालखी सोबत चालू लागलो. पहिल्यांदाच वारीत चालत असल्यामुळे खूपच आनंद झाला होता. वारीत प्रत्येक जण एकमेकांशी बोलताना "माऊली" म्हणूनच बोलत होता. हळूहळू पालखी पुढेपुढे जाऊ लागली. सकाळच्या प्रहरी रम्य वातावरण, उगवत्या सूर्यनारायणाचे मनमोहक दृश्य, रस्त्याच्या दुतर्फा पालखीच्या स्वागतासाठी उभे राहिलेले लोक. भजन व अभंगाच्या तालावर, डोक्यावर तुळस, हातात टाळ आणि मुखी विठुरायाचे नामस्मरण करत, अतिशय शिस्तबद्ध रीतीने चालणारे वारकरी पाहिल्यानंतर वारीचे माहात्म्य आणि वारीत चालण्याचे सुख 'याची देही याची डोळा'अनुभवत आम्ही पुढे पुढे चालत होतो.

ना कोणता थकवा, ना कोणता कंटाळा जाणवत नव्हता. उलट चालताना उत्साह वाढत होता. रस्त्याच्या कडेला जागोजागी वारक-यांच्या साहित्याचे ट्रक दिसत होते. तसेच तंबू, राहुट्या यांनी सगळा परिसर गजबजलेला दिसत होता. मोतीबाग, बांदलवाडी, पिंपळी लिमटेक करत पालखी दुपारच्या वेळी काटेवाडी येथे पोहचली. पालखीचे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले. तेथेच दुपारचे भोजन झाले ते वारक-यासमवेत. पंगतीत जेवणाचा आनंद काही वेगळाच असतो.

काटेवाडी येथील मेंढ्याचे रिंगण पाहण्यासाठी सगळे जण आतुर झाले होते. अडीज तीनच्या सुमारास रिंगण सुरु झाले. मानाच्या त्या मेंढ्या. त्यांनी पालखीच्या भोवती फेऱ्या मारून रिंगण पूर्ण केली. सगळा वारकरी समाज हा रिंगण सोहळा डोळ्यांत साठवून ठेवत होता.

गरीब - श्रीमंत भेद नष्ट करणारा, जातीपाती व धर्म या पलीकडे जाऊन मानवतेचा संदेश देणारा, अहंकाराला मूठमाती देऊन आपुलकी, माया, स्नेह, मैत्री, प्रेम, परोपकार, सेवा, शांती, सहकार्य, एकता अखंडता  यांची आणि माणुसकीची शिकवण देणारा हा सोहळा महाराष्ट्राराला भूषणावह तर आहेच पण जगाच्या पाठीवर महाराष्ट्राची शान आणि मान वाढविणारा आहे. उगीच नाही महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणत नाही. त्यासाठी या वैष्णवांच्या मेळ्यात म्हणजेच वारीत चालण्याचा आनंद आमच्या साठी सदोदित ऊर्जा देणारा आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News