आयटीआयचे निकाल आता ऑनलाइन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 16 January 2020

ऑनलाइन परीक्षेमुळे परीक्षेत पारदर्शकता येऊन निकालात त्रुटी आणि विलंब होणार नाही. वेळेत निकाल लागून प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना नोकरी-व्यवसाय करणे शक्‍य होईल.’’

पिंपरी : आयटीआयचे निकाल अखेर ऑनलाइन जाहीर झाले असून, प्रवेश प्रक्रिया आणि निकालापाठोपाठ केंद्र सरकारकडून आयटीआयच्या वार्षिक लेखी परीक्षाही आता ऑनलाइन घेण्याची तयारी केली जात आहे. येत्या जुलै महिन्यापासून त्याची अंमलबजावणी होण्याची अपेक्षा आहे. या निर्णयामुळे सर्व परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता येणार असून, निकालही लवकर लागण्यास मदत होणार आहे.

मागील सुमारे चार वर्षांपासून देशभरातील आयटीआयच्या प्रवेश प्रक्रिया आणि त्यांच्या परीक्षांचे निकाल ऑनलाइन जाहीर केले जात आहे. मात्र यापुढील काळात केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभाग मंत्रालयांतर्गत महासंचालक प्रशिक्षण (डीजीटी) कार्यालयाकडून वार्षिक लेखी परीक्षाही ऑनलाइन करण्याचे नियोजन आहे. त्याचा फायदा परीक्षार्थी विद्यार्थ्यांना होणार आहे. 

मोरवाडी आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांचे निकाल केंद्र सरकारच्या www.ncvtmis.gov.in या संकेतस्थळावर जाहीर झाले आहेत. एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी दोन सत्रे आणि दोन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी चार सत्र परीक्षा होत असत. मात्र आता सत्र परीक्षा पद्धत बंद झाली असून, त्याऐवजी जुलैमधील वार्षिक परीक्षा ऑनलाइन करण्याचे नियोजन केले जात आहे. ज्या ठिकाणी इंटरनेट आणि पायाभूत सुविधा उपलब्ध असतील तेथे ऑनलाइन परीक्षा घेता येतील. लेखी परीक्षा ऑनलाइन आणि प्रात्यक्षिक (प्रॅक्‍टिकल) परीक्षा ज्या त्या केंद्रांवर होऊ शकतील. ऑनलाइन परीक्षेमुळे परीक्षेत पारदर्शकता येऊन निकालात त्रुटी आणि विलंब होणार नाही. वेळेत निकाल लागून प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना नोकरी-व्यवसाय करणे शक्‍य होईल.’’

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News