आयटीआय प्रवेश प्रक्रिया 'या' दिवसापासून सुरू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 31 July 2020
 • आयटीआय प्रवेश प्रक्रिया केंद्रीयभूत ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार असून, त्यासाठी १ ऑगस्टपासून https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज उपलब्ध होणार आहेत.

मुंबई :- आयटीआय प्रवेश प्रक्रिया केंद्रीयभूत ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार असून, त्यासाठी १ ऑगस्टपासून https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज उपलब्ध होणार आहेत. खासगी आणि सरकारी अशा ९८६ आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) महाविद्यालयांमध्ये एक लाख ४५ हजार ८२८ जागा उपलब्ध आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ही महाविद्यालये कधी सुरू होतील याबाबत सरकारच्या निर्णयानुसार माहिती जाहीर करण्यात येणार आहे.

आयटीआय प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण अशी किमान शैक्षणिक पात्रता आहे. किमान शैक्षणिक अर्हता किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाची शैक्षणिक अर्हता धारण करणारे १४ वर्षांवरील उमेदवार आयटीआय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. प्रवेशासाठी उच्च वयोमर्यादा निर्धारित करण्यात आलेली नाही, जेणेकरून वयाच्या कोणत्याही टप्प्यावर इच्छुक उमेदवार प्रवेश घेऊ शकतात. यंदा प्रवेश अर्ज व नोंदणी शुल्क भरणे, आयटीआय केंद्रांची निवड करणे, प्रवेश अर्जात सुधारणा, दुरुस्ती करणे, हरकती नोंदवणे आदी सर्व कामे विद्यार्थ्यांना ऑनलाईन करता येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रवेशासाठी गर्दी होऊ नये, विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागू नये याकरिता प्रवेश प्रक्रियेच्या सर्व सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.
 

दीड लाख विद्यार्थी प्रवेशक्षमता
 

राज्यात प्रत्येक तालुक्‍यात किमान एक सरकारी आयटीआय महाविद्यालय आहे. ३५८ तालुक्‍यांत ४१७ शासकीय आयटीआय महाविद्यालये कार्यरत असून, त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता ९२ हजार ५५६ इतकी आहे. आदिवासी भागात आदिवासींसाठी ६१ संस्था, अनुसूचित जाती आणि नवबौद्धांसाठी चार उच्चस्तर संस्था, अल्पसंख्याकांसाठी दोन स्वतंत्र संस्था आणि ४३ शासकीय आयटीआयमध्ये स्वतंत्र तुकड्या, महिलांसाठी १५; तर २८ आदिवासी (आश्रमशाळा) आयटीआय अशा संस्थांचा समावेश आहे. असे राज्यात ५६९ खासगी आयटीआय कार्यरत असून, त्यांची वार्षिक प्रवेशक्षमता ५३ हजार २७२ आहे. सरकारी आणि खासगी ९८६ आयटीआय महाविद्यालय असून, त्यांची एकूण प्रवेशक्षमता एक लाख ४५ हजार ८२८ विद्यार्थी इतकी आहे.

अशी असेल प्रवेश प्रक्रिया

 • ऑनलाईन अर्ज करणे :- १ ते १४ ऑगस्ट २०२०
 • पहिल्या फेरीसाठी प्राधान्य :-  २ ते १४ ऑगस्ट
 • प्राथमिक गुणवत्ता यादी :-  १६ ऑगस्ट सकाळी ११ वाजता
 • हरकत/ बदल नोंदणी :-  १६ आणि १७ ऑगस्ट
 • अंतिम गुणवत्ता यादी :-  १८ ऑगस्ट संध्याकाळी ५ वाजता
 • पहिली प्रवेश फेरी :-  २० ऑगस्ट
 • दुसरी प्रवेश फेरी :-  ३० ऑगस्ट
 • तिसरी प्रवेश फेरी :-  ७ सप्टेंबर
 • चौथी प्रवेश फेरी :-  १५ सप्टेंबर
 • नवीन प्रवेश :-  १ ते १९ सप्टेंबर

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News