असा होता पूर्वीचा काळ...

धनश्री जोशी
Wednesday, 28 August 2019

घरा मधले देव होते 
गंधफुलांनी सजलेले ,
गृहिणीचे हात मात्र,होते
कष्ट करून थकलेले...

पूर्वीचा काळ बाबा,
खरंच होता का चांगला,
म्हणे साधे घर साधी माणसं ?
राहिलाही नव्हता बंगला...

साध्या घरात म्हणे,
मायाळू माणसं होती,
उगाच का घरची गृहिणी,
मूक आसू ढाळत होती?

घरा मधले देव होते 
गंधफुलांनी सजलेले ,
गृहिणीचे हात मात्र,होते
कष्ट करून थकलेले...

जावा जावा उभा दावा,
नांदू न देते ती नणंद,
सासू सून विळा भोपळा,
सगळ्या नात्यांचा हा आनंद...

सगळ्यांचे भोजन झाले,
की गृहलक्ष्मी पावन,
तिला काय उरले?
याची कोण घेत होते नोंद?

घरात आलेल्या पाहुण्याला 
आग्रहाने बसवताना पंगतीला
जाणिव होती का कोणाला,
अविरत राबणार्या हातांची?

जुन्या गोष्टी जुना काळ,
नका उगाळू आता राव,
चिरेबंदी वाड्यातले अश्रू,
कधी नाही दिसले काय?

सख्खे भाऊ वैरी वैरी,
उबर्यात उभी गृहलक्ष्मी 
सासुरवाशिण बहीण होती,
का बरे मग हुंडाबळी?

नातेगोते घट्ट होते,
मायेच्या बंधनाने,
आजही भाऊ करतो,
बहिणीचे प्रेमाने...

आता मुलगी शिकत आहे,
घरदार सावरत आहे,
खांद्याला देऊन खांदा,
जोडीने लढत आहे...

आठवडा भर काम करून,
वीकएन्ड साजरा करताना,
तिला एक दिवस का होईना,
विश्रांती तरी मिळत आहे...

हळूहळू चित्र बदलतय,
आईच्या बरोबरीने आता,
बाबा घरात काम करतो,
बालसंगोपनाची जबाबदारी घेतो.

घरात सगळं काम करतात,
सगळे एकत्र विश्रांती घेतात,
मिळालेला वेळ हसत खेळत 
साजरा करतात...

बहीण भावाचे नाते ,
आजही घट्ट आहे ,
एकमेकांच्या अडचणीना,
हातात हात घट्ट आहे...

उत्सव सण समारंभ ,
आजही छान साजरे होतात,
त्या निमित्ताने सगळे,
एकमेकांना भेटतात...

नात्यातली ती गंमत 
प्रेम माया आपुलकी,
तेव्हा जेवढी होती,
तेवढीच आजही आहे ...

रोज भेटत नसलो तरी ,
व्हाॅट्सअॅप वर भेटतो,
एकमेकांच्या कायम,
कायम संपर्कात असतो...

रोज यायला पाहूण्यांनाही ,
आता तसा वेळ नसतो...
सवडीने जमतात सगळे,
तेव्हा आनंदाला पार नसतो ...

जुने ते सोने हे खरे,
बदल हा होतच असतो,
त्याला हसत स्वीकारावे,
यातच खरा आनंद असतो...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News