आयपीएल प्रशासकीय समितीची बैठक पुढील आठवड्यात 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 25 July 2020

आयपीएल दुबईत खेळण्याबाबत केंद्र सरकारकडून अजून हिरवा कंदील मिळाल्याची घोषणा झालेली नाही.

नवी दिल्ली ः आयपीएल दुबईत खेळण्याबाबत केंद्र सरकारकडून अजून हिरवा कंदील मिळाल्याची घोषणा झालेली नाही. कार्यक्रम निश्‍चित करण्यासाठी आयपीएल प्रशासन समितीची बैठक झालेली नाही, तरीही प्रशासकीय समितीचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांना आयपीएलची तारीख जाहीर करण्याची लगीनघाई झाली.

यंदाची बहुचर्चित आयपीएल 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत दुबईत होणार असल्याचे ब्रिजेश पटेल यांनी जाहीर केले. अखेर हो..ना...हो...ना म्हणता आयपीएलचे नगारे वाजणार, हे पटेल यांच्या घोषणेनंतर निश्‍चित झाले. एकूण दिवसांचा हा उत्सव होणार आहे. आयपीएल प्रशासकीय समितीची बैठक पुढील आठवड्यात होणार आहे. त्यात प्रत्येक दिवसाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.
पूर्ण कार्यक्रम निश्‍चित करण्यासाठी लवकरच प्रशासकीय समितीची बैठक होणार आहे, तोपर्यंत केंद्र सरकारची परवानगी मिळेल, असे ब्रिजेश पटेल यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.

प्रेक्षकांना संधी मिळणार?
कोविड-19 चा विळखा असताना संयुक्तिक कार्यप्रणाली तयार करण्यात येईल आणि त्याबाबत बीसीसीआय अमिराती क्रिकेट मंडळाला लेखी कळवणार आहे. प्रेक्षकांना संधी द्यायची की नाही, याचा निर्णय अमिराती मंडळावर असेल; परंतु काहीही असले तरी एकमेकांमधील अंतराचा नियम अनिवार्य असेल, असे पटेल यांनी सांगितले.

तीन स्टेडियम
आयपीएल स्पर्धेचे सामने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, शारजा स्टेडियम आणि अबु धाबी येथील शेख झयाद स्टेडियम अशा तीन मैदानांवर होतील. स्पर्धेच्या अगोदर संघ दाखल होणार असल्यामुळे त्यांच्या सरावासाठी दुबईतील अकादमीच्या खेळपट्ट्या बीसीसीआय भाड्याने घेणार आहे. आयसीसीच्या अकादमीत 38 खेळपट्ट्या आणि सहा इंडोर खेळपट्ट्या आहेत.

दुबईत विलगीकरण नाही
कोविड-19 चाचणी जर निगेटिव्ह आली असेल, तर दुबईत विलगीकरणाचा नियम नाही; मात्र जर चाचणी केलेली नसेल, तर ती करणे अनिवार्य आहे.

पूर्ण आयपीएल
51 दिवसांचा कालावधी असल्यामुळे पूर्ण आयपीएल होणार आहे. शनिवार आणि रविवारी या विकेंडला प्रत्येकी दोन सामने होतील, असे पटेल यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News