ओळख सियाचेनची

-कोमल खांबे
Saturday, 8 August 2020

जगातील सर्वात जास्त उंच, थंड आणि कठीण युद्धभूमीची ओळख करून देणारे 'ओळख सियाचेनची' हे सियाचेन या विषयावरचे मराठीतील पहिलेच पुस्तक लेखिका अनुराधा गोरे यांनी लिहिले आहे.

जगातील सर्वात जास्त उंच, थंड आणि कठीण युद्धभूमीची ओळख करून देणारे 'ओळख सियाचेनची' हे सियाचेन या विषयावरचे मराठीतील पहिलेच पुस्तक लेखिका अनुराधा गोरे यांनी लिहिले आहे. ग्रंथाली प्रकाशन ने ते प्रकाशित केले आहे. देशाच्या रक्षणासाठी सदैव झटत असणाऱ्या आणि हौतात्म्य आलेल्या कॅप्टन विनायक या आपल्या मुलासह सर्व जवानांना हे पुस्तक त्यांनी अर्पण केले आहे. भारताला आणि जगालाही व्याख्याने, फोटोप्रदर्शन, डाॅक्युमेंट्री, लेखांद्वारे सियाचेनची ओळख करून देणारे,३५ वर्ष हिमालय जर्नलचे संपादक पद भुषिवणारे गिर्यारोहक हरिश कापडिया यांची  पुस्तकाला प्रस्तावना आहे. 
          पुस्तक तीन भागात विभागले असून भाग १ आणि भाग २ मध्ये सियाचेनचा इतिहास, भूगोल, सियाचेनची ओळख यासोबतच सियाचेन सिमेवर कसं आलं, सियाचेनच्या शोधाचे टप्पे हे मुद्दे व्यवस्थित समजावून सांगितले आहेत. इतिहास मांडताना लेखिकेने स्वातंत्र्यापूर्वी जम्मू-काश्मीरवर राज्य करणार्या राजघराण्यांपासून ते जम्मू-काश्मीरचं स्वतंत्र भारतात विलिनीकरण होईपर्यंतच्या प्रवासाचा पाच टप्प्यांत अगदी सविस्तरपणे मागोवा घेतला आहे. काश्मीर प्रश्नाबाबत असलेली राजकारण्यांची उदासीनता, अपरिपक्वता, दूरदृष्टीचा अभाव लेखिकेने विशेष अधोरेखित केला आहे. इथली पर्वतशिखरे, नद्या, पर्वतरांगा त्यांच्या भौगोलिक महत्त्वासहित पटवून देताना आवश्यक तिथे छोट्या नकाशांचा उपयोग केला आहे. सियाचेनचा भूगोल समजून घेताना याची निश्चितच मदत होते.  कारगिल युद्धासोबतच सियाचेनच्या भूमीवर यशस्वीपणे पार पाडलेल्या आॅपरेशन मेघदूत, आॅपरेशन राजीव यांसारख्या अनेक महत्त्वाच्या आॅपरेशनचे कथित वर्णन वाचताना डोळ्यांपुढे चित्रफित उभी झाल्याशिवाय राहत नाही. इतिहास, भूगोल यासोबतच भारताचे शेजारच्या राष्ट्रांसोबत झालेले करार आणि त्याचा परिस्तिथीवर झालेला परिणाम याचीही माहिती लेखिकेने दिलेली आहे. 
       'आठवणींच्या गंधकोशी' हा पुस्तकाचा तिसरा भाग जवळपास २०० पानांचा आहे. यात सियाचेनच्या सिमेवर  आपली कामगिरी बजावलेल्या कर्नल, मेजर, लेफ्टनंट यांच्या मुलाखती अनुभव स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आठवणींच्या गंधकोशीतून बाहेर पडणारे हे अनुभव मृगाच्या कस्तुरी प्रमाणे कायमचे मनावर कोरले जातात. हेलिकॉप्टरच्या मर्यादा ओळखून आपल्या कौशल्याचा कस लावणारे तज्ञ पायलट, जखमी सैनिकांवर उपचार करणारे आर्मीतले डाॅक्टर्सही पुस्तकातून आपल्याला भेटतात. उणे तापमान असलेल्या सियाचेन सारख्या प्रदेशात तैनात केल्या जाणाऱ्या सैनिकांचे ट्रेनिंग, त्यांना वापरासाठी दिले जाणारे विशिष्ट कपडे, इथे वापरात येणारी स्नोस्कूटर्स, सामान पोचवण्यासाठी केले जाणारे हर्क्युलिन टास्क, रेस्क्यू आॅपरेशन्स याबाबतीत पडलेल्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे पुस्तक वाचून मिळतात. हिमकडे कोसळणे, हिमवादळे या नैसर्गिक संकटांसोबतच बर्फामुळे उद्भवणाऱ्या स्नोब्लाइंडनेस, हिमदंश, व्हाईटआऊट आणि सैनिकांना होणाऱ्या मानसिक आजारांबद्दलही माहिती दिली आहे. सियाचेन सारख्या प्रदेशात भारतीय सेनेसाठी 'संजीवनी' ठरलेल्या आणि लिम्का बुक्समध्ये समावेश असलेल्या M. A. C. Hundes या हाॅस्पिटल बद्दलही लेखिकेने सविस्तर मांडले आहे. हाय रिस्क मिशन साठी सदैव तत्पर असणाऱ्या HRM टीमचं कार्य ही समजावून सांगितले आहे. लेखिका पेशाने शिक्षिका असल्याने पुस्तकाला थोड्या फार प्रमाणात पाठ्यपुस्तकाचे स्वरूप आल्याचे दिसून येते. पण तरीही पुस्तक अतिशय माहितीप्रदान आहे, हे नाकारता येत नाही. 
          बाल्टी भाषेत 'सिया' म्हणजे रानटी गुलाब आणि चेन म्हणजे प्रदेश. संपूर्ण कारकिर्दीत सियाचेनमध्ये तीन महिन्यांसाठी तरूण वयात फक्त एकदाच पोस्टिंग होतं. या ९० दिवसांत शस्त्रूशी दोन हात करत रोजच्या गरजांसाठी सैनिकांना करावी लागणारी धडपड, रोज नव्या आव्हानांसोबत निसर्गाशी होणारं युद्ध, वेळोवेळी अनुभवाला आलेली आयुष्याची क्षणभंगुरता हे सारंच वाचताना मन थक्क होतं. सर्वत्र बर्फ साठलेला असताना प्यायला पाणी मिळवण्याच्या खटाटोपापासून ते बर्फाखाली गेलेलं हेलिपॅड वैमानिकाला दाखवण्यासाठी रूअाब्झा चा केलेला वापर , असे सगळेच प्रसंग  केवळ जिवंत राहण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षाची जाणीव करून देतात. सियाचेनचं अल्टिमेट मानलं जाणारं पोस्टिंग अनेकांच्या आयुष्यात गुलकंदाच्या स्वादाप्रमाणे असतं तर कित्येक सैनिक आणि त्यांच्या कुटूंबियांच्या आयुष्यात कायमचे काटे खोलवर रूतवून जातं!!  
        मानसिक-शारीरिक क्षमता पणाला लावत, 'जोश सोबत अधिक होश ठेवत' आपली ड्युटी करत उभं राहणं, हे सामान्य माणसाच्या कल्पना करण्यापलिकडचे आहे, याची बोचरी जाणीव पुस्तक वाचताना वेळोवेळी होते. "Army is the great organization!!" , हे कर्नल, मेजर यांच्या तोंडून निघणारं, अनेकदा पुस्तकात उल्लेख केलेलं सुभाषित मात्र मनात घर करून जातं!!! 
      
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News