हिंदी विश्‍वविद्यालयात शांतता आणि न्‍याय विषयावर आंतरराष्‍ट्रीय चर्चासत्र

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 28 January 2020
  • केंद्रीय संस्कृतीक राज्यमंत्री प्रल्‍हाद पटेल यांनी केले उदघाटन.
  • गांधी विचार- तत्वज्ञानाने जगात शांतता वाढेल: केंद्रीय राज्यमंत्री

वर्धा: जय जगत 2020 न्‍याय आणि शांतता वैश्विक पदयात्रेच्‍या वर्धेतील प्रवासानि‍मित्‍त महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयात शांतता आणि न्‍याय विषयावर आयोजित आंतरराष्‍ट्रीय चर्चासत्राच्‍या उद्घाटन समारंभात केंद्रीय संस्‍कृती व पर्यटन राज्‍यमंत्री प्रल्हाद पटेल म्‍हणाले की, महात्‍मा गांधीचे तत्‍वज्ञान स्वीकार केल्यास भारतातच नव्‍हे तर जगात शांतता नांदेल. राजघाट ते जिनेवा जय जगत पदयात्रेच्‍या माध्‍यमातून जगात सौहार्द आणि शांततेचा संदेश प्रसारित होईल.

महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयात आयोजित दोन दिवसीय आंतरराष्‍ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन मंगळवारी  (ता. 28) गालिब सभागृहात केंद्रीय संस्‍कृती आणि पर्यटन राज्‍यमंत्री (स्‍वतंत्र प्रभार) श्री प्रल्हाद पटेल यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विश्‍वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. रजनीश कुमार शुक्‍ल होते. यावेळी मंचावर प्रकुलगुरू प्रो. चंद्रकांत रागीट, गांधी चिंतक राधा भट्ट, यात्रेचे संयोजक पी. वी. राजगोपाल, विनोबा चिंतक बालविजय व जिल बहन उपस्थित होते. 

प्रो. मनोज कुमार व डॉ. अमित कुमार विश्‍वास लिखित ‘गांधी की अहिंसा दृष्टी’ आणि विक्रम नायक लिखित ‘जय जगत ऑन नॉन वायलेंस’ या पुस्तकांचे लोकार्पण तसेच 60 देशातील कलाकारांनी बनविलेल्‍या कार्टून प्रदर्शनाचे उद्घाटन संस्‍कृती मंत्री श्री पटेल यांनी केले. केंद्रीय राज्‍यमंत्री श्री पटेल यांना नागार्जुन अतिथी गृहात सुरक्षा कर्मचा-यांनी त्‍यांना गार्ड ऑफ ऑनर दिले.  

केंद्रीय राज्‍यमंत्री श्री पटेल म्‍हणाले की, पदयात्रा जगाला जोड़ण्‍यासाठी आणि लोकांच्‍या समस्‍या जाणून घेण्‍यासाठी प्रभावी मार्ग आहे. नवीन पीढीला चरित्रवान बनविण्‍यासाठी धर्म आणि पूजा पद्धती नव्‍हे तर आपल्‍या पौराणिक ग्रंथांत जे मूल्‍य संस्‍कार दिले आहेत तेच आदर्श होवू शकते. 

अध्‍यक्षीय भाषणात विश्‍वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. रजनीश कुमार शुक्‍ल म्‍हणाले की, गांधीजींची अहिंसा दृष्टी धर्म आहे. जय जगत पदयात्रा ही विधायक दृष्टीचा संकल्‍प होय, आजच्‍या जगात देश आणि जगाला शांततेच्‍या शिक्षणाची अत्‍यंत आवश्‍यकता आहे. 

उद्घाटन सत्रात पी. वी. राजगोपाल यांनी देशात शांती विश्‍वविद्यालय स्‍थापित करण्‍यासाठी सरकारने प्रयत्‍न केले पाहिजे अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली. यात्रेचे विवरण प्रस्‍तुत करतांना पी. वी. राजगोपाल म्‍हणाले की, अहिंसेच्‍या मार्गाने अन्‍य समस्‍यांचे निवारण केले जावे. भारत अहिंसेची प्रयोगशाळा व शांतता पर्यटनासाठी एक महत्‍वपूर्ण केंद्र झाले पाहिजे असेही ते म्‍हणाले. दीप प्रज्‍ज्‍वलन व जय जगत गीताने चर्चासत्राची सुरूवात झाली. यावेळी कुलगुरू प्रो. रजनीश कुमार शुक्‍ल यांनी राज्‍यमंत्री श्री पटेल यांचे चरखा, अंगवस्‍त्र व सुत माला देवून स्‍वागत केले.  

उदघाटनानंतर केरळचे राज्‍यपाल आरिफ मोहम्‍मद खान यांनी स्‍काईपच्‍या माध्‍यमातून आपला संदेश दिला. गांधी आमची विरासत आहे. जय जगत यात्रेतून समाज व जगात चेतना निर्माण होईल असे ते म्‍हणाले. कार्यक्रमाचे संचालन रमेश जी यांनी केले व आभार विश्‍वविद्यालयाचे प्रकुलगुरू प्रो. चंद्रकांत रागीट यांनी मानले. योवळी देश-विदेशांतील गांधी चिंतक यांच्‍यासह डॉ. विभा गुप्‍ता, अजित सक्‍सेना, डॉ. भरत महोदय, बसव राज, महेंद्र पांडे, सुभाष लोमटे, अनुराधा, विश्‍वविद्यालयातील अध्‍यापक आणि विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News