आंतरराष्ट्रीय नृत्यदिन: अभिनय आणि नृत्य दोन्ही कसे बॅलन्स ठेवायचे?

संतोष भिंगार्डे
Tuesday, 28 April 2020

अनेक चित्रपटांत अभिनयासोबतच नृत्याभिनय करणारी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे ऊर्मिला मातोंडकर! त्यांनी त्यांची चित्रपटसृष्टीतील कारकीर्द नृत्य आणि अभिनयाने विणली आणि प्रेक्षकांच्या मनात ती कायमची वसवली आहे. बुधवारी (29 एप्रिल) आंतरराष्ट्रीय नृत्यदिन आहे. त्यानिमित्त या रसिकप्रिय अभिनेत्रीशी केलेली बातचीत...

नृत्याची आवड तुमच्या मनामध्ये कशी आणि केव्हा निर्माण झाली. त्याकरिता तुम्ही काय काय मेहनत घेतली?

नृत्याची आवड तशी मला लहानपणापासून होती; परंतु माझी पसंती अधिक होती अभिनयाला. मला असे वाटते की नृत्य काय किंवा अभिनय काय... दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्ही गोष्टी समसमान आहेत आणि चित्रपटसृष्टीत दोन्ही गोष्टींना तितकेच महत्त्व आहे. मी लहान असताना अरविंद देशपांडे व सुलभा देशपांडे यांच्या "आविष्कार'मध्ये जायचे. तेथे "चंद्रशाळा' नावाचे लहान मुलांकरिता थिएटर होते. तेथे मी "दुर्गा झाली गौरी' वगैरे बालनाट्यांमध्ये काम केले, तसेच एक-दोन नृत्यनाटकांतही काम केले. अर्थात नृत्याची आवड तेव्हापासूनच मला होती.

नृत्यातील तुमच्या गुरू कोण आणि तुम्ही त्यांच्याकडून नेमके काय काय शिकलात

आविष्कारमध्ये मी जेव्हा जायचे त्यावेळी तेथे भरतनाट्यममधील महान गुरू पार्वतीकुमार यांना तेथे पाहिले, पण त्यावेळी फारसे नृत्य शिकता आले नाही. कारण तेव्हा काही चित्रपट आणि माझे शिक्षण सुरू होते. आमच्या घरच्या मंडळींनी नेहमीच शिक्षणाला महत्त्व दिले. कारण अभ्यासातही चांगले मार्क आणणे तितकेच आवश्‍यक होते. आज जरी मी चित्रपट आणि नृत्यामध्ये पारंगत दिसत असले तरी शास्त्रोक्त नृत्याचे प्रशिक्षण घेतलेले नाही. त्याची खंत आहे, परंतु आज माझे चित्रपटातील नृत्य पाहून प्रेक्षक वाहव्वा करतात, कौतुक करतात तेव्हा नक्कीच आनंद होतो. मला वाटते की नृत्य हा अमूल्य ठेवा आहे.

तुम्ही एक सुप्रसिद्ध अभिनेत्री, तसेच नृत्यांगना आहात. कलाकार म्हणून काम करताना दोन्ही गोष्टींचे बॅलन्स कसे करता?

या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी काही वेगळ्या नाहीत. त्या माझ्यासाठी एकच आहेत. माझ्या पहिल्याच चित्रपटापासून मला उत्कृष्ट नर्तिका असे नाव मिळाले. त्याला एकच कारण, ते म्हणजे मी नृत्याला अभिनयाचेच एक अंग मानते. कारण नृत्यातूनच आपण अभिनय करीत असतो. काही गोष्टी आपण नृत्याच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो. माझ्यापेक्षा तांत्रिकदृष्ट्या उजवे असलेले डान्सर आजही आहेत आणि पूर्वीही होते. अगदी थोडक्‍यात सांगायचे तर ब्लॅक ऍण्ड व्हॉईट जमान्यातील मोठे नाव म्हणजे भगवानदादा, त्यानंतर गीता बाली, शम्मी कपूर अशी काही मंडळी होती की त्यांनीदेखील शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेतलेले नव्हते. तरीही त्यांचे नृत्य डोळ्यांना व मनाला भावणारे होते. त्यांनी आपल्या नृत्याची वेगळी छाप उमटविली. लोकांना त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांची नृत्येही भावली.

डान्स रिऍलिटी शोमध्येही तुम्ही परीक्षक म्हणून काम पाहिले आहे. नृत्य परीक्षक म्हणून काम पाहत असताना तुम्ही नेमक्‍या कोणत्या गोष्टी पाहता आणि तुम्ही स्पर्धकांकडून कोणत्या नव्या गोष्टी आत्मसात करता?

"झलक दिखला जा'मधील जे स्पर्धक होते ते बहुतांशी काही उत्तम डान्सर होतेच असे नाही; परंतु त्यांच्यामधील जिद्द वाखाणण्याजोगी होती. नृत्याबद्दल त्यांना असलेले प्रेम सुंदर होते. त्या स्पर्धकांमध्ये मी हेच पाहायचे किंवा त्यांना सांगायचे की नृत्य हा तुमचा कदाचित प्लस पॉइंट नसला तरी नृत्यातून तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते व्यवस्थितरीत्या विविध हावभावांतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचले पाहिजे. नृत्यामध्ये तुम्ही जरी थोडे डावे असलात तरी तुमच्या हावभावातून एकत्रित तो आविष्कार पोहोचला पाहिजे. ज्या गृहिणी मंगळागौरमध्ये नाचतात, गणेशोत्सव किंवा दहीहंडी या सणवारांमध्ये नृत्य करणारी मंडळी काही उत्तम डान्सर असतात, असे नाही; परंतु ही मंडळी एका तालावर किंवा संगीतावर जो ठेका धरतात ते पाहण्यासारखे असते.

नृत्य क्षेत्रातही आता स्पर्धा खूप वाढत आहे. तुम्ही याकडे कसे पाहता आणि या क्षेत्राकडे येऊ इच्छिणाऱ्या तरुणाईला काय सांगाल?

सध्या सोशल मीडियावर ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्या पूर्वी नव्हत्या. मी जेव्हा "मराठी पाऊल पडते पुढे' या शोची परीक्षक होते तेव्हा कितीतरी टॅलेंट आणि तेदेखील छोट्या छोट्या भागातून आलेले पाहिले आहेत. ती पथके असा काही परफॉर्मन्स करायचे की तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा असायचा. त्यावेळी खूप अत्यानंद व्हायचा. त्यांचा परफॉर्मन्स पाहून आश्‍चर्यचकितही व्हायचे. खरे तर या क्षेत्रात स्पर्धा खूप आहे; परंतु एकूणच वास्तवाचे आणि परिस्थितीचे भान ठेवून आपण या क्षेत्रामध्ये उतरले पाहिजे. आयुष्यात पुढे जाताना कुठलेही एक क्षेत्र निवडून पुढे जायला हवे. या क्षेत्रामध्ये खूप आव्हान आहे. त्यामुळे खूप खूप विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्‍यक आहे.

नवीन नृत्यकलाकारांमध्ये कुठली बलस्थानं आहेत आणि कुठल्या उणिवा जाणवतात

बलस्थानं खूप आहेत आणि तितक्‍याच उणिवाही आहेत. तांत्रिकदृष्ट्या चांगले असलेले डान्सर सध्या खूप दिसतात. पण लोकांशी त्यांचा कनेक्‍ट कमी झालेला दिसतो. आज जेव्हा आपण जुनी गाणी रिक्रिट केलेली पाहतो तेव्हा नृत्यापेक्षा त्यांच्या कपड्यांवर विशेषकरून कमी कपड्यांवर अधिक लक्ष दिले गेले आहे असे दिसते. साहजिकच मग नृत्यापासून कुठे तरी दूर गेलो आहे, असे वाटते. काहीअंशी ग्लॅमरस आहे म्हणून थोडा वेळ आपल्याला ते चांगले वाटते, पण त्या व्यतिरिक्त त्याच्यावर अतिशयोक्ती करू नये असे वाटते.

सध्या काही जण सोशल मीडियाद्वारे नृत्य शिकवत आहेत. त्याबद्दल तुमचे मत काय

सोशल मीडियाद्वारे नृत्य शिकविणाऱ्या मंडळींना माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. खूप लोकांना नृत्य शिकण्याची इच्छा असते. पण अशा लोकांकडे पैसा नसतो, शाळा-कॉलेजमुळे वा ऑफिसमुळे नृत्य शिकण्यास वेळ नसतो. अशा लोकांसाठी सोशल मीडिया हे खूप चांगले माध्यम आहे. नृत्य हा प्रकार किती आत्मानंद देणारा आहे हे नृत्य शिकलेले आहेत, त्यांना माहीत आहे. तो आत्मानंद सोशल मीडियाद्वारे मिळत असेल तर ते उपयोगाचे आहे. सोशल मीडियाद्वारे नृत्य शिकवणारे एकप्रकारे समाजकार्याच करत आहेत असे मी म्हणेन. मी रिचर्ड गेअर यांचा एक चित्रपट पाहिला होता. त्याच्यामध्ये तो एक रटाळ आयुष्य जगणारा एका मुलीचा बाप असतो. तो रेल्वेतून जात असताना रोज त्याला एक नृत्य क्‍लासची जाहिरात दिसते. तो मजा म्हणून त्या क्‍लासमध्ये जातो आणि त्याला त्याच्या आयुष्याचे विभिन्न अंग दिसतात. सांगायचा मुद्दा असा की, अशा कितीतरी लोकांच्या मनात आनंदाचा झरा फुलविणारे सोशल मीडियावरील क्‍लासेस असतील तर ती चांगली बाब आहे.

सध्या लॉकडाऊनमध्ये तुम्ही तुमचा वेळ कसा घालवित आहात? लॉकडाऊन वाढत असल्यामुळे लोकांमध्ये काहीसा नर्व्हसनेस आला आहे. त्यांचे मानसिक संतुलन ढळू नये याकरिता तुम्ही काय सांगाल?

खरे तर लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे आणि त्यामुळेच कदाचित नाराजी किंवा अस्वस्थता निर्माण झाली आहे. ही साहजिक बाब आहे; परंतु घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. काळजी करण्यासारखेदेखील काही नाही. सगळे व्यवस्थित होईल हे नक्की. अन्य देशांपेक्षा आपल्या देशाची परिस्थिती खूप चांगली आहे. ती पुढेही चांगलीच राहील, असा आपण विचार केला पाहिजे. आपण महाराष्ट्रासारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत राज्यामध्ये राहात आहोत. आपली संस्कृती ही एकमेकांना मदत व साह्य करण्याची आहे. दिवसातून दोन वेळा तरी परमेश्‍वराचे आभार माना किंवा स्मरण करा. याने नक्कीच आपला मानसिक ताण कमी होईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News