कौशल्याचे प्रवेशद्वार आयटीआय

मधुकर घायदार
Saturday, 8 June 2019

पारंपरिक शिक्षणातून रोजगाराच्या कोणत्याही संधी उपलब्ध होत नसल्यामुळे आयटीआय अर्थात, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांत प्रवेश घेण्याचा कल सध्या वाढत आहे.

राज्यात एकूण ४१७ शासकीय आणि ४५४ खासगी आयटीआय आहेत. यातील शासकीय आयटीआयमध्ये ९३ हजार ६७२, तर खासगी आयटीआयमध्ये ४२ हजार ५२१ जागा उपलब्ध आहेत. केंद्र शासनानेसुद्धा मेक इन इंडिया, स्किल इंडिया यांसारखे उपक्रम सुरू करून कौशल्य शिक्षणाला प्रोत्साहन दिले आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाने कौशल्य विकास मंत्रालय सुरू केले आहे. शासनाने समग्र शिक्षाअंतर्गत व्यवसाय शिक्षण योजना सुरू केली आहे.

पारंपरिक शिक्षणातून रोजगाराच्या कोणत्याही संधी उपलब्ध होत नसल्यामुळे आयटीआय अर्थात, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांत प्रवेश घेण्याचा कल सध्या वाढत आहे.

राज्यात एकूण ४१७ शासकीय आणि ४५४ खासगी आयटीआय आहेत. यातील शासकीय आयटीआयमध्ये ९३ हजार ६७२, तर खासगी आयटीआयमध्ये ४२ हजार ५२१ जागा उपलब्ध आहेत. केंद्र शासनानेसुद्धा मेक इन इंडिया, स्किल इंडिया यांसारखे उपक्रम सुरू करून कौशल्य शिक्षणाला प्रोत्साहन दिले आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाने कौशल्य विकास मंत्रालय सुरू केले आहे. शासनाने समग्र शिक्षाअंतर्गत व्यवसाय शिक्षण योजना सुरू केली आहे.

या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे मूलभूत तांत्रिक शिक्षण दिले जाते. यात मल्टी स्किलअंतर्गत कार्यशाळा व अभियांत्रिकी तंत्रज्ञान हा विषय शिकविला जातो. यात प्रामुख्याने अभियांत्रिकी हत्यारे, साधनांची ओळख आणि सुरक्षित वापर, ड्रीलिंग, थ्रेडिंग आणि टॅपिंग, वेल्डिंग, सोल्डरिंग, सुतारकाम, भिंत बांधकाम, आरसीसी बांधकाम, प्लास्टरिंग, रंगकाम, अभियांत्रिकी आरेखन, पेट्रोल व डिझेल इंजिन, बायोगॅस संकल्पना आदी विषयांचे प्रशिक्षण दिले जाते.     

आयटीआयच्या विविध अभ्यासक्रमांमधील प्रवेशक्षमता एक लाख ३७ हजार ६१० पर्यंत वाढवली आहे. राज्य शासनाने कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय सुरू करून ‘कुशल महाराष्ट्र- रोजगारयुक्त महाराष्ट्र’चा नारा दिला आहे.  सध्या दहावीत कमी गुण मिळाल्यास पालक डोनेशन भरून पाल्याला एखाद्या महाविद्यालयात प्रवेश घेतात. रोजगाराच्या संधी असलेल्या कौशल्य व व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे ते दुर्लक्ष करतात. अनेक पालकांना ही ‘ब्लू कॉलर’ नोकरी कमीपणाची वाटते. तथापि, प्रत्यक्षात व्यावसायिक कौशल्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना देशांतर्गत, तसेच जागतिक बाजारपेठेत मोठी संधी आहे.

ऑस्ट्रेलियात इलेक्‍ट्रिशियन आणि एसी मेकॅनिकची मोठी कमतरता जाणवते. या ट्रेडच्या विद्यार्थ्यांना तेथे मोठी मागणी आहे. आखाती आणि आफ्रिकी देशांत वेल्डर, प्लंबर, फिटर क्षेत्रातील युवकांना मोठी संधी आहे. आयटीआयच्या विद्यार्थ्यांना आता मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या प्लेसमेंट आणि विशेष म्हणजे परदेशवारीच्या संधीमुळे आयटीआयमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आजची आकडेवारी बघता दर आठवड्याला तीसहून अधिक विद्यार्थ्यांना परदेशात प्लेसमेंट मिळत आहे. वर्क व्हिसासाठी येणाऱ्या अर्जांच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. परदेशातील औद्योगिक प्रगतीत भारतीय युवकांचे मोठे योगदान आहे. नव्याने सुरू होणाऱ्या कारखान्यात प्रशिक्षित युवकांना मोठी मागणी आहे.

आयटीआयमध्ये थेअरीपेक्षा प्रॅक्‍टिकलवर जास्त भर दिला जात असल्याने इथे मिळणारा कामाचा अनुभव त्यांना इतर शाखेतील विद्यार्थ्यांपेक्षा उजवा ठरतो. आयटीआय केलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा उद्योग जगताची प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्‍यकता अधिक असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला नोकरी मिळतेच. 

आयटीआयमधून शिक्षण पूर्ण करून परदेशी गेलेल्या विद्यार्थ्यांना पगारही उत्तम मिळत आहे. विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी निवडलेला देश, कामाचे स्वरूप, कामाचा अनुभव यानुसार पगार वेगवेगळा असतो. सरासरी वार्षिक पाच ते आठ लाख रुपये विदेशात पगार दिला जातो. मुंबई, पुणे, नाशिक येथील कंपन्यांमध्ये अनुभवानुसार दरमहा पंधरा ते चाळीस हजारांपर्यंत पगार दिला जातो.

आयटीआयमधील सर्व अभ्यासक्रम एक किंवा दोन वर्षांचे आहेत. त्यात मुलांसाठी इलेक्‍ट्रिशियन, फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, कॉम्प्युटर ऑपरेटर, टर्नर, मोटार मेकॅनिक्‍स, वायरमन, पेंटर, नळ कारागीर, गवंडी, सुतारकाम, पत्रे कारागीर, फाउंड्रीमन, प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर, सेंटर ऑफ एक्‍सलन्स- प्रॉडक्‍शन आणि मॅन्युफॅक्‍चारिंग सेक्‍टर, यांत्रिकी कृषी व यंत्रसामग्री, रेफ्रिजरेशन आणि एअरकंडिशन, रेडिओ आणि टीव्ही, ग्राइंडर, मेकॅनिकल मशिन टुल्स मेन्टेनन्स, टुल्स आणि डायमेकर आदी, तसेच मुलींसाठी सेक्रेटरियल प्रॅक्‍टिस, ड्रेसमेकिंग, बेसिक कॉस्मेटोलॉजी, बेकर कन्फेन्शनर, फ्रूट्‌स आणि व्हिजिटेबल प्रोसेसिंग, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट, इन्टेरिअल डेकोरेशन आणि डिझाइन, फॅशन डिझाइन आणि टेक्‍नॉलॉजी, इन्फोर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्‍नॉलॉजी सिस्टिम्स, इलेक्‍ट्रॉनिक्‍स यांसारखे ७९ अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

मुलांसाठी असलेल्या अभ्यासक्रमांत मुलींना ३३ टक्के आरक्षणही ठेवण्यात आले आहे. माध्यमिक शाळेतच व्यवसाय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना आयटीआयतील सर्व अभ्यासक्रमांत २५ टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे.
आयटीआयची प्रवेशप्रक्रिया दहावीच्या निकालाच्या दिवशी सुरू होते. www.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरून विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेत सहभागी  होऊ शकतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News