अकरावीचे विनाअनुदानित वर्ग चालविण्यासाठी संस्थाचालकांची कसरत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 August 2020

वाडा, विक्रमगड तालुक्यात साधारण २२ कनिष्ठ महाविद्यालय आहेत.

अकरावीचे विनाअनुदानित वर्ग चालविण्यासाठी संस्थाचालकांची कसरत

वाडा - यंदाचा दहावीचा निकाल सरासरीपेक्षा अधिक लागल्याने सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी गर्दी होणार हे निश्चित होतं. अकरावीच्या प्रवेशासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी अर्ज खरेदी केले आहेत. वाडा, विक्रमगड तालुक्यात अजूनही अनेकवर्ग विनाअनुदानित पध्दतीने चालवले जात आहेत. विशेष म्हणजे यावर्षी अकरावीचे आणखी वर्ग वाढणार असल्याने संचालकांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

वाडा, विक्रमगड तालुक्यात साधारण २२ कनिष्ठ महाविद्यालय आहेत. या महाविद्यालयात तिन्ही शाखांसाठी मान्यताप्राप्त असलेल्या वर्गांची संख्या अत्यंत कमी आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून संस्था संचालकांना विनाअनुदानित वर्गांना सुध्दा शिक्षण द्यावे लागत आहे. यावर्षी वाढलेल्या वर्गाचा खर्च कसा भागवायचा या विचारात संस्थापक सापडले आहेत.

वाडा, विक्रमगड तालुक्यात ५१९१ विद्यार्थी १० वीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. तसेच एटीकेटी मधून पास झालेल्या विद्यार्थींची संख्या ८०० हून अधिक आहे. दोन्ही तालुक्यात ६००० हून अधिक विद्यार्थी आणि त्यासाठी २२ महाविद्यालये आहेत. अनुदानित वर्गाची प्रवेशक्षमता साधारण ३००० हजार विद्यार्थ्यांचीच आहे.

मागील अनेकवर्षांपासून विनाअनुदानित तुकड्या चालवण्यासाठी शिक्षकांचा पगार, खोल्या, अन्य साहित्य पुरवताना संस्था संचालक हतबल झाले आहेत. तसेच विनाअनुदानित वर्ग चालविण्यासाठी सरकारकडून संस्था चालकांना कसलीच मदत होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्काच्या माध्यमातून हा खर्च भागवला जात आहे. दोन्ही तालुक्यातील विद्यार्थी हे ग्रामीण आणि आदिवासी पाड्यातील असल्याने वर्ग शिकवण्यासाठी ज्या शिक्षकाची निवड केली जाते. त्या शिक्षकाला तुटपुंज्या पगारावर काम करावे लागते.

दीडशेहून अधिक शिक्षक मागील अनेक वर्षांपासून ८ हजार रूपये पगारावरती काम करीत आहेत. विद्यार्थ्यांसाठी विनाअनुदानित वर्ग चालविताना शिक्षकांचा पगार, वर्गखोल्या, विद्यार्थ्यींची आसन व्यवस्था या गोष्टींसाठी संस्था चालकांना मोठी कसरत करावी लागते. – श्रीकृष्ण सोनटक्के, उपाध्यक्ष, वाडा सहकारी शिक्षण संस्था वाडा

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News