तुम्हाला समजलं नाही तर इन्स्टाग्राम आहे ना मदत करायला

दीपाली सोनकवडे
Wednesday, 30 September 2020

जर माणसाला माणसाचं मन कळत नाही तर ते इन्स्टाग्रामला कसं कळालं? हे कोडं तर उलगडण्यापलिकडेचेच आहे. 

तुम्हाला समजलं नाही तर इन्स्टाग्राम आहे ना मदत करायला

आजची सकाळ नेहमीसारखीच होती.. सकाळी सकाळी उठून इन्स्टाग्राम आणि व्हाॅट्सअॅप चेक... पण काहीतरी वेगळं वाटत होतं.. नेमकं काय ते समजेना... एका मित्राची पोस्ट पाहिल्यानंतर कुठेतरी अचानक क्लिक झालं आणि इन्स्टाग्रामने डायरेक्ट डिप्रेशनची माहिती डोळ्यासमोर ठेवली..  त्यामुळे असेल कदाचित पण मला वाटलं की याबद्दल थोडी माहिती घेतली पाहिजे. ही माहिती घेईपर्यंत अस्वस्थता जाणवत होती, पण त्यानंतर मात्र मन मोकळं झालं.

सध्या आपल्या सर्वांच्या जीवनात कमी-अधिक प्रमाणात नैराश्याने शिरकाव केला आहेच.. काही जणांच्या वागण्या-बोलण्यातून ते स्पष्ट जाणवते तर काहींच्या लक्षातही येत नाही. पर्सनल, प्रोफेशनल आणि सोशल लाईफमध्ये येणाऱ्या चढ-उतारांमुळे असेल पण डिप्रेशनचा अनुभव बहुतांश जणांना येतो. तसं आकडेवारीकडे पाहिले तर जगभरात 30 कोटीहून अधिक लोक नैराश्याने ग्रस्त आहेत. त्यात ८.७५ टक्के मुली किंवा महिला आणि ५.३ टक्के मुले किंवा पुरुष आहेत. असं म्हणतात की जवळपास १५ टक्के प्रौढ व्यक्ती त्यांच्या जीवनातील एखाद्या वेळी नैराश्याने ग्रस्त असतात किंवा आहेत.

जगाची ही आकडेवारी वाचली आणि माझ्या मित्राच्या पोस्टचा विचार केला तेव्हा जाणवलं की हे प्रकरण साधं सोपं नाही. एकतर कोणी डिप्रेशनमध्ये असलं तरी पटकन मनमोकळं बोलून दाखवत नाही आणि ते समजण्यासाठी ज्या संकल्पना स्पष्टपणे माहिती पाहिजेत त्या आपल्याला माहिती नाहीत.

जर माणसाला माणसाचं मन कळत नाही तर ते इन्स्टाग्रामला कसं कळालं? हे कोडं तर उलगडण्यापलिकडेचेच आहे. इन्स्टाग्रामवर आजच्या घडीला एक अब्ज युजर्स आहेत जे दररोज त्यांचे फोटो किंवा स्टोरीज शेअर करत असतात. या आकड्यांवरूनच इन्स्टाग्रामची तरुणाईमधील क्रेझ लक्षात येते. ही क्रेझ संभाळून तरुणाईच्या मनातील नैराश्य समजून घेण्यासाठी आणि त्याबाबत त्यांच्या फाॅलोवर्सला किंवा मित्र-मैत्रिणींना जाणीव करून देण्यासाठी इन्स्टाग्रामने नवीन फिचर लाँच केले आहे. 

काय आहे हे फिचरइंस्टाग्राम आपल्या युजर्सविषयी फारच पोझेसिव्ह असावं बहुतेक. नाहीतर युजर्सच्या आवडी-निवडींविषयी माहिती गोळा करून ती जाहिरात कंपन्यांना विकण्यापलिकडे कोण कशाला विचार करेल? अर्थात मानसिक स्वास्थ्याविषयीची माहिती गोळा करून ती विकण्याचा धंदा इन्स्टाग्राम करणार नाही याची कोणी खात्री देऊ शकत नाही हेसुद्धा तितकेच खरे...

हा कमर्शियल भाग तात्पुरता बाजूला ठेवू आणि या नव्या फिचरविषयी आपण जाणून घेऊ. आपण जेव्हा डिप्रेशन हा शब्द  किंवा त्याच्याशी संबंधित अशी माहिती (उदाहरणार्थ, उदासीनता किंवा आत्महत्येशी संबंधित माहिती) जर आपण शोधली तर आपल्याला overcoming depression,
anti depression world, #depression awareness, _depression help, _depression_meme_irl, _ depression_help_and_support यासारखे पॉपअप इन्स्टाग्रामवर झळकते. अर्थात ती पोस्ट वाचण्यापूर्वी हा पाॅपअप येतो. त्यासोबत इन्स्टाग्रामने तीन पर्याय दिले आहेत.

१. मदत मिळविणे (get support)
नैराश्याने त्रस्त असलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत मिळवून देणाऱ्या या टॅबमध्ये इन्स्टाग्राम त्वरित मदत उपलब्ध करून देते.
या टॅबवर क्लिक केल्यावर आपल्याला अशा एका वेबपेजवर रिडिरेक्ट केले जाते जिथे आपल्याला सकारात्मक विचारांनी नैराश्यातून बाहेर पडण्याचे मार्ग सांगितले जातात. एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीशी बोलण्याचा पर्यायही उपलब्ध करून दिला जातो. आपल्या मानसिक आरोग्यासंबंधी बोलण्यास लाजणाऱ्या व्यक्ती एकांतात ही सेवा वापरू शकतात आणि नैराश्यातून बाहेर पडू शकतात.

२. पोस्ट दाखवा: (show post)
एखाद्याने ठरवलंच असेल की त्याला किंवा तिला डिप्रेशनशी संबंधित सर्व पोस्ट, फोटो बघायच्या आहेत तर इन्स्टाग्राम त्या निर्णयाचा आदर राखून तशा सर्व पोस्ट युजरला दाखवल्या जातात.

३. रद्द करा: (cancel)
एखाद्या युजरने चुकून डिप्रेशनशी संबंधित कोणत्या पोस्टवर क्लिक केले असेल आणि त्याला त्या फंदात न पडता पुन्हा आपल्या फिडवर माघारी जायचं असेल तर त्यांनी कॅन्सल या टॅबवर क्ल्कि करण्याची सोय इन्स्टाग्रामने दिली आहे.

इन्स्टाग्राममध्ये असं काही फिचर येईल असं ध्यानीमनी पण नव्हतं. पण असं काहीतरी सोशल मीडियावर होऊ शकतं, एखादी कंपनी त्यांच्या प्लॅटफाॅर्मवर अशा सकारात्मक गोष्टी घडवू शकत असेल तर ती भारीच गोष्ट आहे. तुम्हाला पण अशा कोणत्या पोस्ट दिसल्या तर घाबरू नका किंवा लाजू नका.. बिनधास्त त्याविषयी बोला आणि मन मोकळं करा.. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News