प्रदूषण टाळण्यासाठी युवतीचा अभिनव उपक्रम 

मिलिंद देसाई
Saturday, 4 January 2020

मानसी भातकांडेचा पुढाकार; प्लास्टिक बाटलीला फाटा, इतरांतही करतेय जागृती 

बेळगाव: आपल्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला दिसून येतो. यात प्लास्टिक बाटल्यांची संख्या लक्षणीय असते. प्लास्टिक बाटलीमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी बेळगावातील युवतीने खारीचा वाटा उचलला आहे. हिंदवाडीतील मानसी राजेश भातकांडे असे तिचे नाव असून तिने वर्षापासून स्टील बाटलीचा वापर करण्यास सुरवात केली आहे. तसेच इतरांनीही प्लास्टिक बाटलीचा वापर बंद करावा यासाठी जनजागृती सुरु केली आहे. 
प्लास्टिक बाटल्यांचा पडणारा ढीग पाहून पर्यावरणाची हानी होत असल्याची जाणीव मानसीला झाली.

प्लास्टिक बाटल्यांचा वापर वाढत गेल्यास भविष्यात गंभीर परिणाम होतील, याची जाणीव सर्वांना करुन देण्यास सुरुवात केली आहे. मानसीचे मामा वेंगुर्ला परिसरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे विघटन व्हावे यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेत मानसीने पाणी पिण्यासाठी वर्षभर एकाच बाटलीचा वापर केला आहे. आर्किटेक्‍टचे शिक्षण घेणाऱ्या मानसीने शिक्षण थांबवून काही महिन्यांपासून मातीच्या घरांबाबत संशोधन करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तिला सातत्याने फिरावे लागते. त्यावेळीही प्लास्टिक बाटलीचा वापर न करता जनजागृती करण्यावर ती भर देत आहे. 

हॉटेलमध्ये गेल्यानंतर अनेकजण बाटलीबंद पाणी वापरतात. प्रवासीही प्रवासावेळी बाटली बंद पाण्याची खरेदी करतात. त्यामुळे दररोज मोठ्या संख्येने प्लास्टिक बाटल्याचा खच पाहावयास मिळतो. अधिकत्तर बाटल्या कचरा डेपो किंवा पाण्यातून वाहताना दिसतात. त्यामुळे प्लास्टिक बाटल्यांमुळे प्रचंड समस्या निर्माण होणार आहेत, याचा विचार करत मानसीने प्लास्टिक बाटलीचा वापर करणे बंद केले आहे. ती सोशल मीडियाचा वापर करुन प्लास्टिक बाटल्यांचा वापर टाळण्याचे आवाहन करत आहे. 
 
लहानमोठ्या गोष्टीची सुरुवात स्वत:पासून केली, तर समाजात चांगला संदेश जातो. त्यामुळे वर्षभरापासून प्लास्टिक बाटली वापरायची नाही, असे ठरविले. याचे अनुकरण इतरांनीही करावे यासाठी सोशल मीडियावर जागृती करत आहे. त्याला प्रतिसादही मिळत आहे
- मानसी भातकांडे, हिंदवाडी

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News