तरुणाईला हृदयविकारापासून वाचवणार नवतंत्रज्ञान

ऋषिराज तायडे
Monday, 14 October 2019

रुग्णाच्या शरीरात किरकोळ शस्त्रक्रियेद्वारे ‘इम्प्लांट’ बसवून डॉक्‍टरांना हृदयाच्या कामकाजावर लक्ष ठेवता येते. या साधनाद्वारे मिळालेल्या माहितीवरून आजाराचे निदान होते आणि उपचार निश्‍चित केले जातात. रक्त आणि जनुकीय तपासणीतूनही डॉक्‍टरांना हृदयविकाराचे निदान करणे शक्‍य झाले आहे.

रुग्णाच्या शरीरात किरकोळ शस्त्रक्रियेद्वारे ‘इम्प्लांट’ बसवून डॉक्‍टरांना हृदयाच्या कामकाजावर लक्ष ठेवता येते. या साधनाद्वारे मिळालेल्या माहितीवरून आजाराचे निदान होते आणि उपचार निश्‍चित केले जातात. रक्त आणि जनुकीय तपासणीतूनही डॉक्‍टरांना हृदयविकाराचे निदान करणे शक्‍य झाले आहे. हार्ट फेल्युअर म्हणजे हृदय विफलतेवरील (हृदयाची कार्यक्षमता कमी होणे) औषधोपचारांमुळे रुग्णाला जीवदान मिळतेच; शिवाय पुढील आयुष्य निरोगीपणे जगता येते. वाढलेला रक्तदाब कमी करण्यासाठी किंवा हृदयाची धडधड नियंत्रित करण्यासाठी बीटा ब्लॉकर्स, एसीई इनहिबिटर्स, अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर्स (एआरबी), अल्डोस्टेरॉन अँटागॉनिस्ट्‌स आदी अधिक प्रभावी औषधांचा वापर केला जातो.

प्रभावी औषधे
इव्हाब्रॅडिन : हृदयशूल (अंजायना), हृदय विफलता आणि हृदयाची गती प्रमाणाबाहेर वाढणे आदी आजारांवरील उपचारांत या औषधाचा वापर केला जातो. हे औषध हृदयाची गती कमी करते. त्यामुळे हृदय प्रत्येक ठोक्‍याद्वारे शरीरातील अवयवांना अधिक रक्त पुरवू शकते. बिटा ब्लॉकर्स औषधांचा वापर शक्‍य नसलेल्या रुग्णांना त्यामुळे दिलासा मिळतो.

सॅक्‍युबिट्रील-वॅल्सार्टन : रक्तदाब नियंत्रित करणारे हे संयुक्त औषध दीर्घकालीन हृदय विफलतेचा त्रास असलेल्या रुग्णांना दिले जाते. त्यामुळे रुग्णाला होणारा त्रास वाढल्यास वारंवार रुग्णालयात दाखल करण्याची गरज राहत नाही; तसेच हार्ट फेल्युअरमुळे मृत्यूची शक्‍यताही कमी होते.
अत्याधुनिक उपकरणे

इम्प्लांटेबल कार्डिओव्हर्टर डीफिब्रिलेटर (आयसीडी) : हृदयातील तळाचे कप्पे म्हणजे जवनिकांची (व्हेंट्रिकल) लय बिघडून काम ठप्प झाल्यास हे पेजरच्या आकाराचे उपकरण रुग्णाचा जीव वाचवू शकते. रुग्णाच्या छातीत बसवलेल्या या उपकरणाद्वारे विजेचा धक्का देऊन हृदयाचे कामकाज पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जातो. त्वचेखाली बसवलेल्या या उपकरणाला बाहेरून तार जोडण्याची गरज नसते.

कार्डिॲक रिसिंक्रोनायझेशन थेरपी (सीआरटी) : रुग्णाच्या हृदयातील चारही कप्प्यांचे काम समन्वयाने होण्यासाठी पेसमेकर नावाचे लहानसे उपकरण छातीत बसवले जाते. या प्रक्रियेला ‘सीआरटी’ म्हणतात. या उपकरणातून जवनिकांना वीजप्रवाहातून एकाच वेळेत आकुंचित होण्याचा संदेश दिला जातो. त्यामुळे हृदयातून बाहेर फेकल्या जाणाऱ्या रक्ताचे प्रमाण वाढते आणि हृदयाची गती सुरळीत होते. लहान आकाराचे अत्याधुनिक पेसमेकर पूर्वीप्रमाणे छातीत न बसवता मांडीतील शिरेतून हृदयापर्यंत पोहोचवता येतात.

लेफ्ट व्हेंट्रिक्‍युलर असिस्ट डिव्हाईस (एलव्हीएडी) : हृदयातील सर्वात मोठा कप्पा असलेल्या डाव्या जवनिकेच्या (लेफ्ट व्हेंट्रिकल) कार्यात अडचणी निर्माण झाल्यास रुग्णाच्या छातीत ‘एलव्हीएडी’ उपकरण बसवले जाते. हे उपकरण हृदयाला शरीरात रक्त पम्प करण्यास मदत करते. शरीराच्या बाह्य भागावर बसवलेल्या बॅटरीद्वारे हे यंत्र कार्यान्वित केले जाते.

इम्प्लांटेबल कार्डिॲक मॉनिटर (आयसीएम) : रुग्णाच्या हृदयाचे कामकाज व उपचारांना मिळणाऱ्या प्रतिसादावर लक्ष ठेवण्यासाठी आयसीएम उपकरणाचा उपयोग होतो. कागदाच्या लहान तुकड्याच्या आकाराचे हे उपकरण रक्तवाहिनीतून शरीरात सोडले जाते. त्यामुळे रुग्णाच्या रक्तवाहिन्यांवरील दाब आणि हृदयाच्या गतीवर घरातच देखरेख करता येते.

कृत्रिम हृदय प्रत्यारोपण : गंभीर हार्ट फेल्युअरचा त्रास असलेल्या रुग्णांना हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेशिवाय अन्य पर्याय नसतो. या शस्त्रक्रियेत रुग्णाचे हृदय पूर्णपणे न बदलता रक्त पम्प करण्याची क्षमता कमी झालेले खालचे दोन कप्पे बदलले जातात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News