लग्नसराईत निवडा इंडो-वेस्टर्न 'गाऊन'चा नवा पर्याय.. 

सकाळ वृत्तसंस्था (यिनबझ)
Wednesday, 27 March 2019

हल्ली कोणतंही जवळचं किंवा लांबचं लग्न असलं, तरी आजकालच्या तरुणींची पसंती इंडो-वेस्टर्न "गाऊन्स'ना मिळत आहे. साडी आणि ओढणी सांभाळण्याच्या व्यापातून सुटका देणारे हे गाऊन्स अधिक सुटसुटीत वाटतात आणि यांच्या रंगांमुळे ते अगदी सहज खुलूनही दिसतात. 

दिवस लग्नसराईचे आहेत. गेली दोन वर्षे लग्नसराई आणि सणांच्या काळामध्ये पायघोळ, घेरेदार अनारकली सुट्‌सनी आपले स्थान अबाधित ठेवले होते. पण यंदा मात्र पारंपरिक वस्त्रांना वेस्टर्न कलाटणी देऊन विविध प्रकारचे "गाऊन' सध्या बाजारात उपलब्ध आहेत. तरुणाईला या गाऊनने भुरळ घातली आहे. त्यामुळे यंदा लग्नसराईच्या मोसमात लेहेंगा-चोलीला आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी या वेडिंग गाऊनशी स्पर्धा करावी लागतेय. 

नेट, शिफॉन, जॉर्जेटपासून थेट कॉटनपर्यंत विविध कापडांमध्ये हे गाऊन उपलब्ध आहेत. त्यामुळे मोठ्या लग्नांपासून ते छोट्या समारंभांपर्यंत विविध प्रसंगी ते घालता येतात. सुरुवातीला त्यांच्या उंची आणि घेरामुळे हे गाऊन केवळ उंच आणि सडपातळ मुलींनाच घालता येतील, असा समज होता. पण कालांतराने विविध वयोगटांच्या स्त्रियांना हे पसंत पडू लागले. त्यामुळे लग्नसराई आणि सणांच्या दिवशी या लॉंग गाऊन्सनी बड्या दुकानांपासून ते रस्त्यावरील बाजारपेठा सजल्या आहेत. 
"गाऊन' हा प्रकार फार पूर्वीपासून ख्रिस्ती समाजात पाहायला मिळायचा. चित्रपट, फॅशन शो यांमधून हे गाऊन कलाकार आणि उच्चवर्गीय समाजामध्ये लोकप्रिय झाले आणि बाजारातही पाहायला मिळू लागले. लेहेंगा-चोली आणि दुपट्टा असे तीन प्रकार परिधान करण्याऐवजी एक "गाऊन' लग्न समारंभामध्ये परिपूर्ण ठरतो. सध्या पार्टी आणि लग्न समारंभासाठी असंख्य प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. सध्या बाजारामध्ये, दोन हजार रुपयांपासून गाऊनच्या किमतीला सुरुवात होते; तर डिझायनर दुकानांमध्ये तीस हजारांहून अधिक किमतीचे गाऊन उपलब्ध आहेत.

लग्नाच्या मोसमात यांना जास्त मागणी असून दिवसाला 10 ते 15 गाऊनची विक्री सहजपणे होत असल्याचे ठाण्यातील "पायल' दुकानाच्या विक्रत्याने सांगितले. साडी किंवा लेहेंगा सांभाळता न येणाऱ्या मुली या अशा प्रकारच्या गाऊन्सना अधिक पसंती देऊ लागल्या आहेत, असे ते सांगतात. 

इंडो-वेस्टर्न साडी गाऊन्स या लग्नाच्या सीझनमध्ये महिलांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. नवरा-नवरीच्या आजूबाजूला असणाऱ्या करवल्या आणि सख्यांच्या अंगावर असे पायघोळ गाऊन्स सध्या जास्त पाहायला मिळत आहेत. कॉकटेल पार्टीसाठी इंडियन साडी गाऊन, अनारकली गाऊनची निवड करतात. या समीकरणांमध्ये आपल्याला हवा तसा भारतीय पेहराव करायला मिळतो. खास लग्नासाठी नेव्ही ब्लू, बरगंडी, मजिंडा, मरून या रंगांची अधिक चलती आहे. तसेच इतर वेळी गाऊन्समध्ये पिच कलर, स्काय ब्लू कलर, यलो कलर अशा र्लाट शेड्‌सची जास्त चलती आहे. 

गाऊनचे काही मुख्य प्रकार.. 
बॉल गाऊन 

या प्रकारचा गाऊन खांद्यापासून कमरेपर्यंत घट्ट असून त्याखाली संपूर्ण छत्रीच्या आकारासारखा फुललेला असतो. यामध्ये ऑफ शोल्डर, स्ट्रीपलेस, मेगा स्लिवस्‌ अशा प्रकारांमध्ये हे गाऊन उपलब्ध आहेत. 

ए-लाईन 
हे गाऊन साधारण अनाकली ड्रेससारखे असतात. खांद्यापासून कमरेपर्यंत घट्ट; त्याखाली साधारण घेर असलेल्या पायघोळ गाऊनला "ए-लाईन' गाऊन म्हणतात. सडपातळ मुलींना हा सर्वांधिक शोभून दिसतो. 

मर्मेड 
परीकथेतील जलपरीच्या पेहरावाप्रमाणे हा गाऊन तयार करण्यात आला आहे. खांद्यापासून ते गुडघ्यापर्यंत घट्ट; नंतर साधारण घोळ पायाच्या मागच्या बाजूला गालीचा अंथरल्याप्रमाणे कापड असते. 

या प्रकारांमध्ये थोडेफार बदल करून विविध रंगछटा वापरून असंख्य प्रकार सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. 

कुठे ? : भुलेश्‍वर मार्केट, रानडे रोड आणि हिंदमाता- दादर, गावदेवी मार्केट, राममारुती रोड, कोरम मॉल, विविआना मॉल- ठाणे. 
किंमत : 1000 ते 50,000

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News