आयपीएल भारताबाहेर होणार असल्याचे संकेत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 8 July 2020

कोरोना महामारीचा भारतास या वर्षाच्या अखेरपर्यंत किमान सामना करावा लागणार आहे, असे सांगत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आयपीएल भारताबाहेरच होणार असल्याचे संकेत दिले.

नवी दिल्ली:  कोरोना महामारीचा भारतास या वर्षाच्या अखेरपर्यंत किमान सामना करावा लागणार आहे, असे सांगत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आयपीएल भारताबाहेरच होणार असल्याचे संकेत दिले. गेल्या काही दिवसांपासून आयपीएल भारताबाहेर होणार असल्याचे भारतीय क्रिकेट मंडळाचे पदाधिकारी सूचित करीत आहेत, त्यासच जणू गांगुली यांनी दुजोरा दिला.

सलामीवीर मयांक अगरवालने सध्या एक क्रिकेट टॉक शो सुरू केला आहे. त्यात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेटच्या भविष्याबाबत गांगुली बोलत होते. ते म्हणाले, ""आगामी दोन- तीन- चार महिने खूपच खडतर असतील, असा माझा कयास आहे. त्यास आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. आता या वर्षाच्या अखेरीस किंवा नव्या वर्षाच्या सुरुवातीस जनजीवन सुरळीत होईल, असा माझा अंदाज आहे." भारतीय क्रिकेट नियामक मंडळ सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान आयपीएल घेण्याचा विचार करीत आहे. या पार्श्वभूमीवर गांगुली यांची टिप्पणी मोलाची आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची आयपीएल भारतात घेण्यासच जास्त पसंती आहे; पण हे घडण्याची शक्‍यता कमी आहे. सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या यादीत अमेरिका आणि ब्राझील यांच्यापाठोपाठ भारत तिसरा आहे. त्यामुळे देशात आयपीएल घेण्यास मंजुरी मिळण्याची शक्‍यता कमी आहे. श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिरातीपाठोपाठ आता न्यूझीलंडने आयपीएल घेण्याची तयारी दाखवली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दादा ओपन विथ मयांक या कार्यक्रमात गांगुलीने व्यक्त केलेले मत मोलाचे आहे.

कोरोनावरील लस येईपर्यंत मी प्रतीक्षा करण्यास तयार आहे. तोपर्यंत आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. सध्या काय घडत आहे, हे आपण जाणतो. कोणालाही आजारी पडण्याची इच्छा नाही. क्रिकेटमध्ये लाळेचा प्रश्न आहे. एकदा कोरोनावरील लस आली, की सर्व काही सुरळीत होईल.

देशांतर्गत स्पर्धांचा प्रश्न बिकट
कोरोनामुळे देशातील क्रिकेट या वर्षाअखेर सुरू होऊ न शकल्यास राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांना त्याचा फटका बसेल. या परिस्थितीत देशातील सर्वच स्पर्धा घेण्याबाबत प्रश्न येतील. गतमोसमात देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत दोन हजारहून जास्त सामने झाले होते. त्यातील किती स्पर्धा यंदा होऊ शकतील, हा प्रश्नच आहे.

कोरोनामुळे सतत बदलणारी परिस्थिती ही फलंदाजीसारखी आहे. सर्वच खेळपट्ट्यांवर एकाच प्रकारे फलंदाजी करून चालत नाही. चेंडू कमी वेगाने येणाऱ्या खेळपट्टीवर, फिरक घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर फलंदाजी वेगळी असते आणि फलंदाजीस अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर त्याहून वेगळी. कोरोना सध्या याच स्थितीत आहे, आपण त्यातून सावरत आहोत.
- सौरव गांगुली, भारतीय मंडळाचे अध्यक्ष

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News