भारताचा दक्षिण अाफ्रिकेला दणका

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019
  • विश्‍वकरंडक स्पर्धेत भारताची दक्षिण अाफ्रिकेवर मात

साऊदम्टन - तमाम भारतीयांचे लक्ष लागलेल्या विश्‍वकंरडक क्रिकेट स्पर्धेत बुधवारी भारताने विजयाने सुरुवात केली. पराभवाच्या खाईत गटांगळ्या खाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेवर विजय तसा अपेक्षित होता, परंतु भारतीयांना त्यासाठी पराकाष्ठा करावी लागली. यजुवेंद्र चहलचे चार विकेट आणि रोहित शर्माचे शतक (नाबाद १२२) या विजयाचे महत्त्वाचे पैलू ठरले.

गोलंदाजांचे वर्चस्व राहिलेल्या या सामन्यात भारतीयांनी दक्षिण आफ्रिका फलंदाजीचे कंबरडे मोडले होते, परंतु मॉरिस आणि रबाडा यांच्या भागीदारीमुळे त्यांनी २२७ धावांचा टप्पा गाठला. हे आव्हान भारतीयांनी १५ चेंडू राखून पार केले. अडखळत सुरुवात करणाऱ्या आणि एका धावेवर असताना जीवदान मिळालेल्या रोहित शर्माने तंबू ठोकला आणि शतक झळकावत विजयी रेषा पार करेपर्यंत तो मैदानात राहिला. तोच टीम इंडियाचा संकटमोचक ठरला.

सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी प्रथम शिखर धवन आणि त्यानंतर किंग विराट कोहली यांना बाद केले, त्या वेळी अवघे अर्धशतकच झाले होते. संकटाची चाहूल लागत होती, पण गेल्याच महिन्यात आयपीएलची ट्रॉफी जिंकणाऱ्या रोहित शर्माने सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली.

एक बाजू आपण सांभाळणार असल्याची खात्री त्याने दिली. के. एल. राहुलही साथ सोडून गेल्यावर महेंद्रसिंग धोनीचा अनुभव रोहितच्या मदतीला आला. या दोघांनी ७४ धावांची भागीदारी केली, पण त्या वेळी आवश्‍यक धावांच्या सरासरीचा विचार केला नाही. धोनी बाद झाल्यानंतर आलेल्या हार्दिक पंड्याने थेट टॉप गीअरमध्येच गाडी पळवली. त्यामुळे अखेरच्या षटकापर्यंत लढावे लागले नाही.

रोहितचा तडाखा
रोहित शर्माने भारताचे विश्‍वकरंडक स्पर्धेतील २६ वे शतक झळकावले स्पर्धा इतिहासातील हे १६८ वे शतक
विश्‍वकरंडक स्पर्धेत सर्वाधिक शतकवीरांच्या क्रमवारीत भारत आता ऑस्ट्रेलियासह अव्वल
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News