भारताची दुसरी फाळणी अनिवार्य

धनंजय गांगल
Tuesday, 3 March 2020

नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत धर्माधारित अत्यंत विखारी प्रचार झाला. स्वतंत्र भारताच्या इतिहासात असा विखारी प्रचार पूर्वी कधी झाला नसावा. जागांच्या गणितात जरी केजरीवाल यांचा आप पक्ष जिंकला आणि भाजपाचा सपशेल पराभव झाला असं दिसत असलं तरी भाजपाच्या मतांचा टक्का ३२ हून ३८ असा घसघशीत ६ टक्क्यांनी वाढलाय. याची वस्तुनिष्ठ दखल घेतली गेली पाहिजे. याचा अर्थ जवळपास ४० टक्के मतदारांना हा विखारी प्रचार मान्य आहे; किंबहुना ह्यातल्या अनेकांचा त्याला पाठिंबाच आहे!

नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत धर्माधारित अत्यंत विखारी प्रचार झाला. स्वतंत्र भारताच्या इतिहासात असा विखारी प्रचार पूर्वी कधी झाला नसावा. जागांच्या गणितात जरी केजरीवाल यांचा आप पक्ष जिंकला आणि भाजपाचा सपशेल पराभव झाला असं दिसत असलं तरी भाजपाच्या मतांचा टक्का ३२ हून ३८ असा घसघशीत ६ टक्क्यांनी वाढलाय. याची वस्तुनिष्ठ दखल घेतली गेली पाहिजे. याचा अर्थ जवळपास ४० टक्के मतदारांना हा विखारी प्रचार मान्य आहे; किंबहुना ह्यातल्या अनेकांचा त्याला पाठिंबाच आहे!

डावे उदारमतवादी यांचा मुख्य शत्रू भाजपा नसून ते स्वःताच आहेत. सेक्यूलर राहण्याच्या नादात इस्लाममध्ये ते टोकाचे रोमँटिकली रमलेले असतात आणि हिंदुत्वाचा सौम्य गंध जरी दुरून आला तरी त्यांना ते पाप वाटते - ते लगेच रुमाल नाकावर धरतात आणि याचा फायदा भाजपाने उचलला नाही तर नवल ते काय? केजरीवाल यांनी असा फायदा भाजपाला होणार नाही याची कमालीची काळजी घेतली. विकास आणि आर्थिक मुद्दे भाजपच्या हातातून कधीच निसटलेत. 

विकासाचे गुजरात मॉडेल आणि मोदी मॅजिक इतिहास जमा झाले आहेत आणि दुर्दैवाने हाच अत्यंत चिंतेचा विषय आहे.  ह्यापुढे हा विखारी प्रचार वाढतच जाणार कारण त्याशिवाय भाजपाकडे पर्यायही नाहीये. त्यांना ३० ते ४० टक्के मतदारांचा पाठिंबा मिळणार कारण एवढे मतदार गेली सहा एक वर्ष भाजप विचारांच्या मागे ठामपणे उभे आहेत. त्यामुळे निवडणुकीआधी किंवा महाराष्ट्राप्रमाणे नंतर उर्वरित पक्ष एकत्र आले तर आणि तरच भाजपाचा पराभव शक्य आहे.

हिंदुत्ववाद्यांच्या  या विखाराला   स्वातंत्र्यापूर्वी पासूनची पार्श्वभूमी आहे.  स्वातंत्र्या आधी दशकभर धर्माच्या नावावर वेगळी  अशी पाकिस्तानची मागणी जोर धरू लागली. ४५ नंतर फाळणीची अपरिहार्यता टप्याटप्याने लक्षात येऊ लागली. तेव्हा धर्माच्या नावावर राष्ट्र मागणारे ते पाकिस्तानात आणि बाकी सगळे सेक्यूलर (धर्म निरपेक्ष) भारतात अशी मांडणी करण्यात आली. त्यावेळीही भारत हे हिंदू धर्माधारित राष्ट्र किंवा हिंदू धर्माचे असे स्वतःचे स्वतंत्र राष्ट्र असावे ही इच्छा असणारे मोठ्या प्रमाणात होते. इतर धर्माप्रमाणे हिंदू धर्माची नीटशी संरचना नाही. त्यामुळे त्याचे पाठीराखे हे कडवेपणाच्या वेगवेगळ्या छटात विखुरलेले. यातल्या  राजेंद्र प्रसादांसारख्या अनेकांना काँग्रेसने सत्तेत सामावून घेतले होते. शिवाय आंबेडकरांच्या नेतृत्वाने जागृत झालेले स्वतःला अहिंदू आणि ह्या स्वातंत्र्याला खरे स्वातंत्र्य न मानणारे दलित पददलित. 

तो एक वेगळा स्वतंत्र विषय. 19 व्या शतकाअखेरीस, स्वातंत्र्य, समता, बंधुता, व्यक्ती-स्वातंत्र्य, व्यक्ती-उत्कर्ष  या आधुनिक, पाश्चिमात्य कल्पना आणि अनुकंपा याची बेमालून सांगड घालत विवेकानंदानी हिंदू नावाच्या विस्कळीत अस्ताव्यस्त पसरलेल्या धर्माची एकप्रकारे पुनः मांडणी केली आणि नवसंजीवनी दिली. गेल्या कित्येक शतकातील हिंदू धर्माची ती पहिली (आणि एकुलती-एक) मांडणी आहे. त्या मांडणीचा सर्व जनमानसावर प्रभाव असणे साहजिकच होते. बहुसंख्य लोक हिंदू राष्ट्रमागे न जाता काँग्रेसच्या "धर्मनिरपेक्ष" ते मागे जाण्यात हा प्रभावही कारणीभूत आहे. असो. कारणे काहीही असोत, आपली  हिंदू राष्ट्राची मागणी पूढे रेटण्यात हिंदुत्ववादी त्यावेळी कमी पडले. एकप्रकारे हा "सेक्युलर" एजेंडा या हिंदुत्ववाद्यांवर लादण्यात आला. अन्न, वस्त्र, निवारा यापलीकडे माणसाच्या ज्या अनेक मानसिक गरजा असतात त्यात अत्यंत प्रभावी असते ती "व्हिक्टीमहूड"ची. या व्यवस्थेत आपल्यावर सतत "अन्याय" होतोय या कल्पनेची. हिंदुत्ववाद्यांसाठी त्याचे सहज साधे सोपे कारण होते ते म्हणजे मुसलमान आणि त्यांचा सतत "अनुनय" करणारे काँग्रेस आणि समाजवादी डावे पक्ष. ही भळभळती जखम घेऊन ते स्वातंत्र्यानंतर अनेक दशके जगले. एकाच आशा की या खलनायकांना "धडा" शिकवणारा कोणीतरी अवतार जन्माला येईल.

काळाच्या ओघात काही काळ इंदिरेत त्यांनी पाकिस्तान्यांना धडा शिकवणारी दुर्गा पहिली आणि तुर्कमान गेटसाठी संजय वर फिदा झाले. राजीवच्या निमित्ताने नवे सरळ सुगम राजकारण येणार या स्वप्नात त्यांच्या भळभळत्या जखमेवर खपली धरत्ये असं वाटत असतानाच. 21व्या शतकात नेणाऱ्या त्या राजीव कडून शहाबानो घडले आणि पुढचा इतिहास वाजपेयींनच्या त्या प्रसिद्ध पंच प्रमाणे "ना बानो होती, ना मंडल होता; और ना मंडल होता, ना कमंडल होता"!

रथ यात्रेच्या निमित्ताने तयार झालेल्या त्या उन्मदाच्या दशकातही निवडणुकीच्या संख्येच्या राजकारणात, निर्णायक क्षणी, भाजपा आणि पर्यायाने हिंदुत्ववादी स्वबळावर सत्तेपर्यंत पोचण्यात कमी पडले. शेवटी वाजपेयींनच्या मुखवटा पुढे करून, अन्य पक्ष्यांबरोबर हातमिळवणी करत एकदाची सत्ता स्थापन केली. आता हिंदुत्वाचे रामराज्य येणार अशा आनंदात असताना त्यांच्या रामानेच त्यांना वाऱ्यावर सोडल. त्यांच्या एजेंड्याला दोन हात दूर ठेवण्याचा व्यवहारी चाणाक्षपणा वाजपेयींनी दाखवला. सत्ता मिळूनही हिंदुत्ववाद्यांचे सगळं मुसळ केरात गेले. पदरी पडला तो फक्त भ्रमनिरास. बरं हा मुखवटा पाहता पाहता मुकुट बनला.

धरलं तर चावताय आणि सोडलं तर पळताय अशी हिंदुत्ववाद्यांची अवस्था झाली.  पुढच्या निवडणुकीत हे सरकार जावं अशी "श्रीं"ची इच्छा झाली! आणि देशात सोनियाचे दिवस आले. त्यानंतर 10 वर्ष बरंच पाणी वाहून गेलं. एके काळचा रथ यात्रेचा सारथी विकास पुरुषच जानी दुश्मन जिनांविषयी कौतुके बोलू लागला. हेच फळ काय मम् तपाला अशी हिंदुत्ववाद्यांची अवस्था झाली. 

या सर्व 6/7 दशकांच्या अंधाऱ्या पार्श्वभूमीवर गोव्यात विष्णूच्या पुढच्या अवताराचा जन्म झाला! या अवताराने मग कुठलीही कसर सोडली नाही. रात्रीचा दिवस आणि आकाश पाताळ एक करून एक उत्कृष्ट सिस्मित करणारा प्रचार केला. देशाला भेडसावणाऱ्या सगळ्या प्रश्नांची आणि उत्तरांची उत्कृष्ट मांडणी केली आणि कुंपणावर बसलेल्यांचीही मन जिंकून घेतली. गेली अनेक दशके हुलकावणी देणारी ती विजयश्री अक्षरशः एक-हाती खेचून आणली. एक अर्थाने ४७ साली ते हुकलेलं हिंदू राष्ट्राचं स्वप्नं साकार होण्यास सुरवात झाली आणि तेही फेक्युलरांच्या नाकावर टिचून!  

अवताराला सत्तेच्या मर्यादांची जाणीव होती. पण हिंदुत्वाच्या वाघावर तो स्वार झाला होता. तोच त्याचा कोअर व्होटर होता. त्यांना वाऱ्यावर सोडलं तर वाजपेयींनसारखी आपली अवस्था होईल हे तो जाणून होता. दर दोन तीन महिन्यांनी आपल्या जादूच्या पोतडीतून नवीन नवीन जादू काढून तो वाघाला गुंगवू लागला. प्रत्यक्ष व्यवहारात हिंदू राष्ट्र संकल्पनेला विशेष गती मिळत नव्हती. तरी भक्तांना अवताराच्या हेतूबद्दल शंका नव्हती. अर्थात त्यांना दुसरा पर्यायही नव्हता!! पुढे राजाच्या जोडीला प्रधानही सत्तेत आला आणि मग एकाच  धमाल चालू झाली. लोकसभेत अधिक मताधिक्याने पुन्हा निवड, ३७०, ट्रिपल तलाक, राम मंदिर, माजी "खोंग्रेशी" अर्थमंत्री तुरुंगात, कोणावर ई डी, कोणावर सीबीआय अशी घोडदौड चालू झाली. आपली बटनं तुटली  पण "त्यांची" चड्डी फाटली ना, यातला आनंद वेगळाच!  

उशिरा का होईना "त्यांची" कशी "वाट" लावली आणि आता हळूहळू  पण आपल्या स्वप्नातले हिंदू राष्ट्र साकार होणार या आनंदी-आनंदात असताना  अचानक विपरीत घडले! अवताराच्या मानलेल्या राजकीय गुरूंनी ई डीला शिंगावर घेतले आणि गल्ली ते दिल्ली एकाच पळापळ झाली. अचानक जणू ग्रहच बदलले! सर्वात जुन्या विश्वासू हिंदुत्ववादी पक्षानेच घात केला आणि अगदी हमखास आपलीच मानलेली मोठ्या राज्यातील सत्ता हातची गेली. मिळेल तो "आधार" घेऊन या "घाता" वर "मात" करण्याचा प्रयत्न एका रात्रीत झाला पण ते औट घटकेचेच ठरले. आणि सहज सरळ वाटणाऱ्या सी ए बी, एन आर सी च्या निमित्ताने विरोधाने अचानक उचल खाल्ली. ते मूठभर फेक्युलर अर्बन नक्शल्स आहेत म्हणावे तर आता सहकारी पक्षही एन आर सी च्या विरोधात बोलू लागले आहेत. 

थोडे पाऊलभर (स्टेप बॅक) मागे येऊन बघितले तर भक्तांच्या  दृष्टीनेही परिस्थिती गंभीर आहे. नोटबंदी नंतर आर्थिंक गाडी घसरली ती घसरलीच. "मोदी मॅजिक" तर दूर, आता आहे तेवढे तरी सांभाळण्यासाठी कसरत करावी लागतेय. काश्मीर मधलं ३७० काढले त्या "टीव टीव करणाऱ्याची कशी वाट लावली" हा आनंद किती दिवस पुरणार?  काश्मीरचे भक्तांच्या जीवनातले स्थान ते कितीसे ?  आयुष्यात एक-दोनदा तिथे जाऊन स्वतःच्या बायकोबरोबर झबली घालून फोटो काढणे इतकेच!!  पण आता सत्ता येऊन सहा वर्ष झाली - इथल्या बाजूच्या मशिदीतली अजान काही बंद होत नाही!!! 

ती त्या "खोंग्रेस"च्या काळातही होती आणि आताही आहे - हे मोठं दुख्ख आहे!!! परत वर परदेशी राजदूतांना बोलवून काश्मीरमध्ये मुसलमान कसे आनंदी आहेत ते दाखवण्याची वेळ आली!  नेहरू-गांधी कुटुंबातील सदस्य आणि मुख्य म्हणजे त्यांचे जावई, तो दिग्गी राजा, मणी, ओवेसी, राजदीप, बरखा वगैरे सगळे खलनायक मजेत आहेत - कोणीही तुरुंगात नाही!  "खोंग्रेस"च्या त्या माजी अर्थमंत्र्याविरुद्ध धड "चार्ज शीट" ही अजून नाही!   "इंटरनॅशनल ब्रँड" असल्याने गांधींना सोडता येत नाहीये!   देश "खोंग्रेस"मुक्त होता होईना. आणि "डावे फेकूलर अर्बन नक्शलस" संपता संपेनात!  त्यावर उपाय म्हणून  शास्त्रींना इंदिरेने, नेताजींना नेहेरुनी आणि प्रज्ञाला करकरेनी कसा त्रास दिला,  कोण किती भ्रष्टाचारी आहेत याच्या सूचक पोष्टी टाकून मन रमवतात.  कारवाई शून्य!  सतत  कोणाचे आजे पणजे मुसलमान किंवा व्हॅटिकन मधून आहेत अश्या फक्त सूचक पोष्टी फिरव्हायच्या! त्यातच आनंद! त्यावर कारवाई शून्य!

हिंदुत्ववादीच्या आदर्श राम राज्याच्या कल्पना फार सरळ आणि सोप्या आहेत. व्यक्ती हे एकक आणि स्वतंत्र अस्तित्व त्यांना मान्य नाही . त्यांच्या दृष्टीने महत्व आहे ते समाज-पुरुषाला, राष्ट्र उभारणीला. एकदा व्यक्ती हे एकक नाकारलं की त्याचं स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य वगैरे सगळे दुय्यम ठरते किंबहुना त्याला अस्तित्वच असता कामा नये! राष्ट्र उभारणीसठी प्रत्येकाने स्वतःचा "मी" विसरून झोकून दिले पाहिजेत आणि ठरवलेली कर्तव्ये (जाती निहाय) कुरकुर न करता केली पाहिजेत. धु म्हंटले की धुवायचे... बाकी सगळा   विचार करण्यास राजा आणि प्रधान समर्थ आहेत!  त्यांना विरोध सोडाच पण साधे प्रश्न,शंका विचारण्याचे कारणंच काय? हया  राष्ट्रात इतर धर्मियांना विशेषतः, मुसलमानांना खरे तर स्थानच नाही आणि  अगदी असेलच तर अगदी दुय्यम!  हिटलरने ज्यू ना जसे मारले तसे खरे तर मुसलमानांना आणि त्यांचा अनुनय करणाऱ्या फेक्युलर,अर्बन नक्षल डाव्यांना मारण्याची हिंदुत्ववाद्यांची इचछा असते पण अजून ते उघडपणे तसे बोलत नाहीत.  पण त्यांच्या भाषेतला विखार अप्रत्यक्षपणे तेच दर्शवतो. नेहरू-गांधी कुटुंबापासून प्रत्येक प्रश्न विचारणाऱ्याचा आजा, पणजा  मुसलमान असल्याचे आणि म्हणून अप्रत्यक्षपणे (बाय इम्प्लिकशन) त्यांना जगण्याचा हक्क नाही असं ते सूचित करत असतात!

या पार्श्वभूमीवर   गेली ६/७ वर्ष मोदी भक्त आणि मोदी त्रस्त यांच्या परस्परविरुद्ध "नॅरेटिव्हस" नी देशातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अवकाश व्यापून राहिले आहे. देशाची प्रगती एक-प्रकारे कुंठित झाली आहे. अनेक दशकांनंतर स्वबळावर सत्तेत आल्याचा उन्माद खरंतर काही महिन्यात विरून जायला पाहिजे होता. पण तसं झालं नाही उलट उत्तोरत्तर हा उन्माद वाढतच चाललंय.  याचं कारण स्वातंत्र्या पूर्वीपासूनच ही दरी अदृश्य पण खोलवर रुजलेली होती. मोदींच्या विजयाने ती दृश्य स्वरूपात व्यक्त होऊ लागली. गेली ६/७ दशके डाव्यांच्या प्रभावाखाली दबलेले उजव्यांना मोदींच्या निवडीने आवाज आणि क्रेडिबिलिटी मिळाली!   हिंदू राष्ट्र म्हणजे व्यवहारात नक्की काय याची  सामाजिक, राजकीय , आर्थिक, सांस्कृतिक कुठलीही ब्लूप्रिंट त्यांच्याकडे तयार नाही.  मुसलमान आणि त्यांचा "अनुनय" करणारे  "खोंग्रेस", "डावे",  "फेकूलर", "अर्बन नक्शलस"  यांचा "सूड" उगवायचा या एकाच एकेकाने त्यांना बांधलेले आहे. मोदी शाह आणि मोदी-शहाच ते करतील अशी त्यांची श्रध्दा आहे.  पण या   "सूड" उगवण्यावर मर्यादा आहेत.  

कितीही झालं तरी तेलासाठी आपण आखाती देशांवर अवलंबून आहोत.  दिल्लीत सत्तेत असणाऱ्यांवर आंतरराष्ट्रीय राजकारणाचा प्रचंड दबाव असतो तो समजून घेणे हे प्राचीन इतिहासात सतत रमलेल्या हिंदुत्ववाद्यांच्या बुध्धीच्या पलीकडचं आहे.  समान नागरी कायदा आणल्यानंतर जस-जश्या  मोदी शहांच्या पोतडीतल्या जादू संपतील! तसतसे हिंदुत्ववाद्यांना निराशा, वैफल्य-ग्रस्ततेला सामोरे जावे लागेल. ते जास्त-जास्त हिंसक बनतील.  यापुढे काहींना काही खुसपट काढत दंगलीं सतत घडत राहतील. अजून विखारी प्रचार होईल.  त्याचा परिणाम देशाच्या अर्थकारणावर आणि बेरोजगारीवर होईल. त्यातून पुन्हा दंगलींना प्रोत्साहन मिळेल.  यावर उपाय एकाच - पटत नसेल तर वेगळे होणे.   आता ही दरी मिटणे अशक्य!  हिंदुत्ववाद्यांचा  हिंदु राष्ट्र मागणीचा अधिकार मान्य करून - त्यांचे आणि  इतर भारतीय अशी फाळणी करून, वेगवेगळी राष्ट्र बनवणे.     त्यामुळे भारताची दुसरी फाळणी अनिवार्य     हे अर्थातच वेडगळपणाचे, मूर्खपणाचे, अत्यंत प्रक्षोभक, अतिरेकी, देश-विरोधी वगैरे वाटेल. ते अत्यंत गुंतागुंतीचे आणि अवघड आहे  नक्कीच.  एकदा मुद्दलात विभक्त होण्याची गरज पातळी तर ते जास्तच जास्त शांततामय पद्धतीने कसे करता येईल वगैरे हा सगळा विचार पुढें करता येईल . पण आत्तातरी भारताची दुसरी फाळणी अनिवार्य दिसतेय!

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News