शिवसेनेचा युवा चेहरा; भारतीय विद्यार्थी सेना

संदीप काळे / सुरज पाटील (सकाळ वृत्तसेवा, यिनबझ)
Saturday, 4 May 2019

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर प्रेम करणारी तरुणाई 1980 ते 1985च्या दरम्यान प्रचंड स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. हिंदू धर्माचे पुरस्कर्ते असा शिक्का बाळासाहेबांवर बसला. त्यातून पुढे युवकांचा एक गट तयार झाला. ज्या गटात काम करणारे तरुण महाविद्यालयातील होते. शिवसेनेमध्ये काम करणारा शिवसैनिक आणि युवकांच्या प्रश्‍नांवर काम करणारा विद्यार्थी, सेनेचा पदाधिकारी अशी एक वेगळी ओळख विद्यार्थी सेना म्हणून, शिवसेनेचा तरुण चेहरा म्हणून पुढे आली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर प्रेम करणारी तरुणाई 1980 ते 1985च्या दरम्यान प्रचंड स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. हिंदू धर्माचे पुरस्कर्ते असा शिक्का बाळासाहेबांवर बसला. त्यातून पुढे युवकांचा एक गट तयार झाला. ज्या गटात काम करणारे तरुण महाविद्यालयातील होते. शिवसेनेमध्ये काम करणारा शिवसैनिक आणि युवकांच्या प्रश्‍नांवर काम करणारा विद्यार्थी, सेनेचा पदाधिकारी अशी एक वेगळी ओळख विद्यार्थी सेना म्हणून, शिवसेनेचा तरुण चेहरा म्हणून पुढे आली.

ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कर्ता हा विचार महाविद्यालयीन तरुणांमध्ये जोडला जावा, या हेतूने खरेतर अस्तित्वात आली. शास्त्रीय पद्धतीने शिवसेनेने विद्यार्थ्यांचे प्रश्‍न सोडवणे, महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवणे, आशा अनेक विषयांना घेऊन संघटना सक्रिय केली. आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल, ते म्हणजे हिंदूंच्या मुलींवर अत्याचार होतात आणि ते अत्याचार करणारे एका विशिष्ट धर्माचे आहेत. आपल्या हिंदूंच्या मुलींना वाचवले पाहिजे हा विचार घेऊनही संघटना सातत्याने पुढे आल्याचे आपल्याला पाहायला मिळते. तेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे घराण्याच्या तिसऱ्या पिढीने विद्यार्थी सेनेला बळ देण्याचे काम केल्याचेही आपल्याला पाहायला मिळते. आज प्रबोधनकार ठाकरेंनंतर ठाकरेंची चौथी पिढी म्हणजे आदित्य ठाकरे विद्यार्थी सेनेला वेगळा आयाम देण्याचे काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. भाषणकौशल्य आणि उत्तम नियोजन याची जबरदस्त पकड असणारा व्यक्ती म्हणजे राज ठाकरे. आज विद्यार्थी सेना खूप वाढली, त्याचे श्रेय कधीतरी या फळीचे नेतृत्व करणाऱ्या राज ठाकरे यांना नक्की द्यावे लागेल. गाव कोसातील तरुण चेहरा शिवसेनेच्या भगव्या दस्तीला रुमालाला खांद्यावर घेऊन बाळासाहेब ठाकरे की जय, शिवसेना जिंदाबाद अशा घोषणा देताना त्याकाळी दिसत होता; पण शिक्षित विद्यार्थ्यांचे प्रमाण शिवसेनेत येण्याचे कमी होते, त्यातूनही विद्यार्थी सेनेचा अधिक बोलबाला होत गेला. मेळावे, संमेलने, विद्यापीठ पातळीवरच्या निवडणुका, बाळासाहेब आणि राज ठाकरे यांची मोहिनी घालणारी भाषणे, यातून विद्यार्थी सेनेचा छोटासा असलेला वेलू गगनावर चढायला लागला. कॉलेजवर असलेली विद्यार्थी सेनेची शाखा जिल्हा आणि राज्य पातळीच्या अनेक संघटनांमध्ये आपले स्थान निर्माण करायला लागली. या विद्यार्थी सेनेच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत या विद्यार्थी सेनेला, त्यांच्या कामाला, त्यांच्या स्टाईलला कोणीही आवर घालण्याचा प्रयत्न केला नाही. कारण सेनेची पूर्ण ताकद त्यांच्या मागे होती. जेव्हा-जेव्हा शिवसेना सत्तेमध्ये आली, तेव्हा-तेव्हा विद्यार्थी सेनेच्या कामाला अधिक बळ मिळत गेले.

भारतीय विद्यार्थी सेनेची स्थापना कशी झाली - संपादक संदीप काळे

90 चा काळ होता. हिंदुत्ववादी विषयांवर मोठ्या प्रमाणात वाद-विवाद सुरू होते. या वेळी तरुणांना एकत्र करून त्यांच्या मनात असलेल्या अफवांचे निरसन करणे खूप महत्त्वाचे होते. हा विचार बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात आला आणि त्यांनी अखेर तरुणांना एका छताखाली एकत्र करण्याचे काम सुरू केले. देशात जर कोणी व्यवस्था बदलू शकेल तर तो म्हणजे सुशिक्षित तरुण. त्यामुळे महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या सर्व तरुणांना त्यांच्या हक्कांची, विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाची जाणीव करून देण्यास सुरुवात केली. शिवसेनेने सुरू केलेले राज्यभरातील काम, बाळासाहेबांच्या भाषणांनी प्रेरित होऊन देशसेवेसाठी, धर्मासाठी तसेच भाषेसाठी लढा देण्यासाठी भारतीय विद्यार्थी सेना ही नक्कीच अग्रेसर आहे, हे गमक जाणून घेऊन महाराष्ट्रातील विविध विद्यार्थी भाविसेमध्ये सहभागी होऊ लागले.

भारतीय विद्यार्थी सेना सध्या काय करत आहे - संपादक संदीप काळे

महाराष्ट्रात प्रत्येक वेळी जातीला घेऊन राजकारण करण्यात येत होत, त्याला शैक्षणिक क्षेत्रही कधीच अपवाद ठरलं नाही. हिंदू मुलींचा छळ करणे, कॉपीच्या नावाने मुलींना त्रास देणे अशा नाहक समस्यांना बळी जाणाऱ्या हजारो मुली होत्या. त्यांच्या बाजूने हरवक्ताला सेना उभे राहताना आपल्याला दिसत असते. बी.एड.च्या विद्यार्थ्यांचा विषय म्हणजे देशातल्या शिक्षण व्यवस्थेतल्या सगळ्यात मोठा आणि अनिर्णायक विषय समजला जात आहे, ज्यावर कोणत्याच सरकारने ठोस पावले उचलताना आपल्याला पाहायला दिसत नाही, अशा प्रश्नांना घेऊन भारतीय विद्यार्थी सेना उभी आहे. आज घडीला भारतीय विद्यार्थी सेनेच्या बाजूने हजारो विद्यार्थी उभे आहेत; मात्र त्या विद्यार्थ्यांना एकच अपेक्षा आहे की, इडा-पिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे. कारण महाराष्ट्रात उच्चपदावर जाणाऱ्या हर एक तरुणाचे वडील हे शेतकरीच आहे आणि जोपर्यंत शेतकरी बाप या समाजात जगणार नाही, तोपर्यंत त्याची ध्येय वेडी मुलं समाजात आणि स्पर्धेच्या युगात पुढे जाऊच शकणार नाहीत. हेच गमक बाळासाहेबांनी जाणलं आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी सेनेच्या माध्यमातून उभे केला जाणाऱ्या लढ्याला ग्रामीण भागातून मजबूती दिली.

2005 साली जगभरात आंतरराष्ट्रीय भौगोलिक वर्ष म्हणून साजरा करण्यात आले. त्या वेळी युरोपीयन राष्ट्राकडून सर्व देशांचे नकाशे सादर करण्यात आले. त्यात भारताच्या नकाशाला घेऊन मोठ्या चुका आढळल्या होत्या. त्या अशा की, भारताच्या नकाशात जम्मू काश्‍मीर आणि हिमाचल प्रदेशचा समावेश केला नव्हता, त्यामुळे त्याच्या विरुद्ध महाराष्ट्रातून बंड पुकारण्यास सुरुवात झाली. बाळासाहेबांच्या मजकूरासह पंतप्रधान, तसेच राष्ट्रपतींना पत्र देण्यात आले. त्याचप्रकारे महाराष्ट्रात ठिकठिकाणी या संदर्भात निदर्शने करण्यात आली.

भारतीय विध्यार्थी सेनाचा अभ्यास करताना आलेले अनुभव - सुरज पाटील

केजी ते पीजीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावं, विद्यार्थ्यांच्या दफ्तराचे ओझे कमी करावं, मुंबई शहरात ज्याप्रकारे शिवसेनेच्या प्रयत्नातून स्मार्ट शिक्षण सुरू झाले आहे, त्याप्रकारे स्मार्ट शिक्षण प्रत्येक विद्यालयात सुरू करावं, विद्यार्थ्यांचे असलेले तत्कालीन प्रश्न, हॉस्टेलमध्ये येणारे दूषित पाणी, त्यामुळे होणारे विद्यार्थ्यांना आजार आणि याकडे महाविद्यालयाने आणि विद्यापीठाने केलेले दुर्लक्ष अशा सर्व प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी आणि संबंधित व्यवस्थेची कानउघाडणी करण्यासाठी भारतीय विद्यार्थी सेनेने आग्रही भूमिका बजावली आहे.

भाविसेबद्दल बोलताना तुकाराम सराफ (विद्यापीठ प्रमुख, भाविसे)
मी पत्रकारितेसाठी मराठवाडा विद्यापीठात शिकत होतो, त्या वेळी महाविद्यालयात शिवसेनेचे पदाधिकारी चंद्रकांत खैरे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. त्यांचे प्राचार्यांशी बोलणे झाल्यानंतर विद्यापीठामध्ये भाविसेचे नेतृत्व करण्यासाठी माझी निवड झाली. मलाही समाजकार्याची आवड असल्याने आणि बाळासाहेबांच्या भाषणाने मनात निर्माण झालेल्या क्रांतिकारी प्रेरणेने मी भाविसेनेत सामील झालो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तसेच विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांत असणाऱ्या शैक्षणिक समस्या, प्रवेश मार्गदर्शन, विद्यार्थ्यांना दरदिवशी येणाऱ्या अडीअडचणी, विद्यापीठामार्फत वाढवण्यात येणाऱ्या अवाजवी फी या सगळ्यांवरती आवाज उठवण्यासाठी भाविसेने आपला लढा उभारला.

औरंगाबाद, बीड, धाराशीव आणि जालना या चार जिल्ह्यांमधून मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमधील मुलांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींना घेऊन जनजागृती करणे, महाविद्यालयाच्या वसतिगृहांचे प्रश्‍न, परीक्षेच्या दरम्यान येणारे सर्व प्रश्‍न, तपासणीच्या नावाखाली विद्यार्थिनींची केली जाणारी तपासणी असे सर्व प्रश्‍न भाविसेने मांडले आणि काही ठिकाणी प्रतिकारात्मक निदर्शने देखील केली.

भाविसेबद्दल बोलताना अभिजीत पानसे (माजी अध्यक्ष भाविसे)
देशात आणि महाराष्ट्रात हिंदुत्वाची लाट पसरत असताना त्यामागची भूमिका शिवसेनेची असल्याचे स्पष्ट झाले होते. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांना नेतृत्वाची जाणीव करून देण्यासाठी भारतीय विद्यार्थी सेनेने पाया रोवला. स्टुडंटचा कारखाना देशात राजकारणासाठी खूप मोठं योगदान देऊ शकतो आणि याचे उदाहरण म्हणजे विद्यार्थीदशेतच राजकारणाची कास धरणारे अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि असंख्य नामवंत नेते आहेत.

तरुणांचे, विद्यार्थ्यांचे आणि राजकारणात आलेल्या युवकांचे प्रश्‍न मांडण्यासाठी प्रथमत: नेतृत्वाची गरज आहे. फक्त या नेतृत्वाला जोड देण्याचे काम भारतीय विद्यार्थी सेनेने केले आणि आजही ते करत आहे. कॉलेजमध्ये होणाऱ्या निवडणुका बंद झाल्याने विद्यार्थ्यांना राजकारण, समाजकारणाची ओळख होत नसल्याने पुढाकार घेऊन प्रश्‍न सोडवण्याची कमतरता तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यामुळे भारतीय विद्यार्थी सेना ही प्रमुख संघटना म्हणून नावारूपाला आली, ज्या सेनेने युवा चळवळींना, तरुण-तडफदार संघटनांना, नव्या चेहऱ्यांना पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढण्याची ताकद दिली.

या संघटनेमध्ये मी 19 जून 2006 रोजी समन्वयक म्हणून दाखल झालो. तरुणांचे केलेले नेतृत्व, पुकारलेली आंदोलने, यशस्वी केलेली निदर्शने ही माझ्या कामाची ओळख बनत गेली आणि राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर भारतीय विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपणाची धुरा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या हाती सोपवली. माझ्या कारकिर्दीत विद्यालयात होणाऱ्या समेटच्या निवडणुकीत भाविसेचे बहुमत येण्यासाठी आम्ही कसरत करत होतो. त्यामुळे 10 पैकी आठ जागा तरी भाविसेच्या येत असत. त्याचबरोबर समेटचं पहिलं पद आणि चेअरमनची भूमिका ही भाविसेकडेच असायची हे नक्की.

भाविसेबद्दल बोलताना राजेंद्र जंजाल (महाराष्ट्र निमंत्रक भाविसे)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद अंतर्गत देवगिरी महाविद्यालयात मी माझं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत होतो. त्या वेळी मी महाविद्यालयाचा जीएस म्हणून काम पाहत होतो. माझ्यावर तसा शिवसेनेच्या कामाचा आणि त्यांच्या विचारांचा पगडा होताच; पण त्याचबरोबर बाळासाहेबांच्या भाषणांनी माझ्या आयुष्यात वेगळे बदल घडवून आणले. बाळासाहेबांची मराठी अस्मिता, महाराष्ट्रासाठी असलेली तळमळ, मराठी माणसांबद्दलचा कळवळा, गरीब, होतकरू विद्यार्थ्यांसाठी केली जाणारी धडपड अशा सर्व गुणांनी त्याकाळी युवा पिढी त्यांच्याकडे आकर्षित होत होती, तसा मीही झालो आणि 2000 साली माझी विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून शिवसेनेशी नाळ जोडली गेली.

2000 साली महाराष्ट्रात रिड्रेसल नावाची पद्धत विद्यार्थ्यांना लागू करण्यात आली होती. त्याच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणपत्रिकांना घेऊन संशय आहे, त्यांनी रिड्रेसल पद्धतीच्यामार्फत आपल्या उत्तरपत्रिकेची झेरॉक्‍स घेऊन त्या विषयासंबंधित एक्‍स्पर्टशी तपासणी केल्यानंतर ती उत्तरपत्रिका पुन्हा विद्यापीठात जमा करणे. या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता, त्याचबरोबर ही पद्धत विद्यार्थ्यांच्या माथी मारून शिक्षकांवर असलेला बोजा कमी करण्याचं काम त्या वेळी सरकारकडून केला जात होता. त्यामुळे त्याच्या विरोधात जाऊन भारतीय विद्यार्थी सेनेने आक्रमक भूमिका बजावत मराठवाडा विद्यापीठावर 4 हजार विद्यार्थ्यांच्या ताफ्यासह आंदोलन सुरू केले. त्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले होते. त्यांच्या माध्यमातून सरकारला या रिड्रेसल पद्धतीला बंद करण्याचे आवाहन पत्र शासनदरबारीही पाठवण्यात आले होते.

एकंदरीत माझ्या विचारांना आणि निर्णायक भूमिकेला शिवसेनेने आणि भारतीय विद्यार्थी सेनेने प्रत्येक वेळी मानाचे स्थान दिलेच. त्याहीपेक्षा मला भाविसेचे व्यासपीठ देऊन माझ्या नेतृत्व करण्याच्या उद्देशाला योग्य वळण दिले. त्यामुळे मी आयुष्यभर भारतीय विद्यार्थी सेनेचा ऋणी असेन.

भाविसेच्या समारोपाकडे जाताना...
सत्ता असली की, सगळ्या गोष्टी परफेक्‍ट होतात. तसेच झालेय विद्यार्थी सेनेबद्दल. सत्ता, पैसा आणि बाळासाहेबांच्या विचारांवर प्रेम करणारे अनेक युवक यांचा परफेक्‍ट संगम कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतोय. मुंबईमध्ये काही शाखांपुरती आणि काही महाविद्यालयांपुरती मर्यादित असलेली विद्यार्थी सेना आज महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात गेली आहे. गाव पातळीवर असणारा युवा चेहरा आज या संघटनेचा भाग होताना आपल्याला दिसतोय. हिंदुत्वाचा विचार आणि बाळासाहेबांचे विचार असे उत्तम समीकरण विद्यार्थी सेनेमध्ये काम करणाऱ्या युवासेनेमध्ये जुळून आलेय. भविष्यातही विद्यार्थी सेनेचा खराखुरा चेहरा, जो लोकाभिमुखतेसाठी, युवकांसाठी काम करेल, यात शंका नाही. एका विचाराने प्रेरित झालेल्या आणि युवकांचा चांगुलपणा उराशी बाळगून त्यांना मदत करायच्या हेतूने सतत पुढे असणाऱ्या विद्यार्थी सेनेच्या प्रत्येक शिलेदाराला, सरदाराला आमचा सलाम.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News