भारतीय ऑलिंपिक संघटनेचा वाद चव्हाट्यावर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 13 June 2020
  • आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅश यांची लक्ष वेधले

नवी दिल्ली : भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅश यांचे भारतीय ऑलिंपिक संघटनेतील संघर्षाकडे लक्ष वेधले आहे; तसेच त्यांनी भारतीय संघटनेचे अध्यक्ष सुधांशू मित्तल यांच्यावर चुकीची माहिती देत असल्याबद्दल कारवाई करण्याची मागणी केली आहे.

बत्रा यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अडीच वर्षांनी मित्तल यांनी याबाबत आक्षेप घेतले आहेत, याकडे सुमारीवाला यांनी लक्ष वेधले आहे. बत्रा यांच्या निवडीच्या वेळी नियमांचे पालन न झाल्याचा आरोप मित्तल यांनी केला आहे. बत्रा यांनी हे आरोप फेटाळले आहेत. आता सुमारीवाला यांना मित्तल यांना लक्ष्य केले आहे.

भारतीय ऑलिंपिक संघटनेत ऑलिंपियन असलेला मी एकमेव उपाध्यक्ष आहे. अध्यक्षांवरील बिनबुडाचे आरोप पाहून मला यातना होत आहेत. हे आरोप करणारे मित्तल हे 2017 पासून संघटनेच्या कार्यकारिणीत आहेत. त्यांनी यापूर्वी कधीही बत्रा यांच्याबद्दलचे आक्षेप कार्यकारिणीत अथवा वार्षिक सर्वसाधारण सभेत मांडले नव्हते, याकडे सुमारीवाला यांनी लक्ष वेधले. मी भारतीय ऍथलेटिक्‍स संघटनेचा अध्यक्ष आहे तसेच जागतिक ऍथलेटिक्‍स परिषदेवरही आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेची निवडणूक नजीक आल्याने आपली अध्यक्षपदाची उमेदवारी भक्कम करण्यासाठी मित्तल हे आरोप करीत आहे, असेही सुमारीवाला यांनी पत्रात नमूद केले आहे.

मित्तल यांचेही आंतरराष्ट्रीय समितीस पुन्हा पत्र

सुधांशू मित्तल यांनी पुन्हा आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडे बत्रा यांच्या भारतीय ऑलिंपिक संघटना अध्यक्ष निवडीबद्दल तक्रार केली आहे. त्याचबरोबर बत्रा यांनी केलेल्या नियमांचा दुरुपयोग केला असल्याचे सिद्ध करणारे पुरावे आहेत, असे म्हंटले आहे. बत्रा यांना आपल्याला पत्र लिहिताना हॉकी इंडियाचे तहहयात सदस्य असे नमूद केले आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या घटनेत तहहयात सदस्यांना मतदानाचा अधिकार नाही. मी संघटनेच्या अध्यक्षपदास उत्सुक नाही; पण बत्रा यांनी नियमाचे पालन केले नसल्याचे मी लक्षात आणून देत आहे. बत्रा यांच्या उत्तरानंतर आपण सर्व काही खुले करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅश यांनी मित्तल तसेच सुमारीवाला यांच्या पत्रास अद्याप उत्तर दिलेले नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News