आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय मिश्र रिले संघाला सुवर्णपदक 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 24 July 2020

दोन वर्षांपूर्वीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय मिश्र रिले संघाने सुवर्णपदक जिंकले असल्याची घोषणा अखेर करण्यात आली आहे.

मुंबई:  दोन वर्षांपूर्वीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय मिश्र रिले संघाने सुवर्णपदक जिंकले असल्याची घोषणा अखेर करण्यात आली आहे. बहारिनची धावपटू केमी अदेकोया हा उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्यामुळे मिश्र रिले संघाच्या रौप्यपदकाचे सुवर्णपदकात रूपांतर झाले; तसेच अनू राघवन हिला 400 मीटर अडथळा शर्यतीतील ब्रॉंझपदक मिळणार आहे.

मोहम्मद अनास, एम. आर. पूवाम्मा, हिमा दास, अरोकिया राजीव यांनी चार बाय 400 मीटरच्या मिश्र रिले शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते. त्या वेळी त्यांनी 3 मिनीट 15.17 सेकंद अशी वेळ दिली होती. मात्र या शर्यतीत बहारिनची ओलुवाकेमी अदेकोया ही हिमा धावत असताना तिच्यासमोर पडली होती, त्यामुळे भारताचे सुवर्णपदक हुकले, असा भारताचा दावा होता. प्रत्यक्षात हिमा त्यानंतर पडल्यामुळे कझाकस्तानने भारताविरुद्ध तक्रार केली आणि त्या वेळी हिमाची चूक नव्हती. यासाठीच भारतास संघर्ष करावा लागला होता; मात्र आता अखेर भारतास हे सुवर्णपदक मिळाले आहे. आता ओलुवाकेमी अदेकोया ही उत्तेजक चाचणीत दोषी ठरली आहे. मूळची नायजेरियाची असलेली, पण बहारिनकडून खेळणारी ओलुवाकेमी अदेकोया ही केमी अदेकोया या नावानेही ओळखली जाते.

उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्यामुळे अदेकोया ही आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदके गमावणार असल्याचे जागतिक ऍथलेटिक्‍स महासंघाच्या समितीने यापूर्वीच जाहीर केले होते; पण त्यावर आता शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. जागतिक ऍथलेटिक्‍स महासंघाने या स्पर्धेचा निकाल नव्याने प्रसिद्ध करताना भारतास मिश्र रिले शर्यतीतील सुवर्णपदक विजेता जाहीर केले आहे.

रिलेतील रौप्यचे सुवर्णपदकात रूपांतर झाले, त्याचबरोबर अनूच्या चौथ्या क्रमांकाचे ब्रॉंझमध्ये रूपांतर झाले. त्या वेळी अनूने 56.77 सेकंद ही प्रभावी वेळ दिली होती. ही तिची त्या वर्षातील सर्वोत्तम वेळ होती.

मिश्र रिलेतील सुवर्णपदक तसेच ब्रॉंझ पदकामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय ऍथलीटस्‌नी जिंकलेली पदके आता 20 झाली आहेत. त्यात 8 सुवर्ण आणि 9 रौप्यपदकांचा समावेश आहे. रिलेतील दोन सुवर्ण आणि एका रौप्यपदक या कामगिरीमुळे संघाचा आत्मविश्वास जास्तच उंचावला आहे. आता संघ जास्त जोमाने ऑलिंपिकसाठी पूर्वतयारी करेल.
- आदिल सुमारीवाला, भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाचे अध्यक्ष

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News