आयपीएलसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ नवीन कालावधीच्या शोधात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 19 April 2020
  • कॅरेबियन प्रीमियर लीगच्या सीईओचे मत 
     

नवी दिल्ली ः पुढील सूचना मिळेपर्यंत लांबवण्यात आलेली आयपीएल कधी होणार, याचे ठोकेताळे बांधले जात असताना कॅरेबियन प्रीमियर लीगचे सीईओ पीट रसेल यांच्या टिप्पणीमुळे आयपीएल विश्वकरंडक ट्‌वेंटी 20 स्पर्धेपूर्वी होण्याच्या चर्चेस पुन्हा सुरुवात झाली आहे.

रसेल यांनी कॅरेबियन लीग सप्टेंबरमध्ये होईल, अशी आशा व्यक्त करताना आयपीएलसाठी भारतीय मंडळ नवा कालावधी शोधेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आयपीएलसाठी कमालीचे आग्रही आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील पहिला टप्पा आयपीएल असेल, असे जवळपास ठरले असल्याचे भारतीय मंडळाच्या सूत्रांनी सांगितले आहे. मडळातील काही वरिष्ठ पदाधिकारी भारतीय क्रिकेटपटूंचे पुनरागमन आयपीएलनेच व्हावे, यासाठी आग्रही आहेत. विश्वकरंडक ट्‌वेटी 20 स्पर्धे पूर्वी आयपीएल खेळवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे; पण त्यात आशिया कप स्पर्धेचा अडथळा आहे.

आशिया कप स्पर्धा रद्द केली आणि विश्वकरंडक ट्‌वेंटी 20 स्पर्धा माफक लांबणीवर टाकली, तर आयपीएल सहज होऊ शकेल, या दृष्टीने विचार होत आहे. मात्र आता याच प्रस्तावित कालावधीत कॅरेबियन प्रीमियर लीग आहे. ही लीग 19 ऑगस्ट ते 26 सप्टेंबरदरम्यान अपेक्षित आहे. त्यामुळे कॅरेबियन लीग आणि आयपीएलचा संघर्ष होण्याची शक्‍यता आहे.

आयपीएलच्या विरोधात जाण्याचा आम्ही विचारही करू शकत नाही. लीग घेण्याबाबत भारतीय क्रिकेट मंडळ चांगलेच भक्कम स्थितीत आहे. मात्र त्याच वेळी भारतीय मंडळाने खेळाडू तसेच अन्य लीगचाही विचार करावा, अशी अपेक्षा रसेल यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, आयपीएलमध्ये सर्व वेस्ट इंडिज खेळाडूंचा सहभाग असावा, ही अपेक्षा असणारच. कॅरेबियन लीग असताना आयपीएल खेळवणे योग्य होणार नाही. वेस्ट इंडिजचे बहुतेक स्टार खेळाडू त्या वेळी आमच्या लीगमध्ये खेळत असतील. दोन लीग एका वेळी झाल्यास त्यात खेळाडूंचेच नुकसान होईल. हा नक्कीच भारतीय मंडळाचा हेतू नसेल. ते नक्कीच त्यातून मार्ग काढतील, असे रसेल म्हणाले.

कॅरेबियन देशातील कोरोनाची साथ अमेरिका तसेच युरोप इतकी तीव्र नाही. कॅरेबियनमधील सहा देशातील मृतांची संख्या जास्त नाही. कॅरेबियन देशात लवकर लॉकडाऊन सुरू झाले, त्यामुळे या परिसरात कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणावर पसरली नाही, असे सांगतानाच रसेल यांनी कॅरेबियन लीगमध्ये कोरोनाचा नक्कीच अडथळा येणार नाही. त्या वेळी सर्व काही सुरक्षित असेल. अनेक देशांनी लीगबाबत विचारणा केली आहे. या लीगद्वारे कॅरेबियन देश आर्थिक व्यवहारासाठी पुन्हा खुले झाल्याचेही दिसून येईल, असेही त्यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News