भारतीय सैन्यदलासाठी बीडमध्ये सैन्यभरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 18 January 2020

युवकांच्या सोयीसाठी नियोजन
सैन्यभरतीसाठी बीड व लगतच्या चार जिल्ह्यांतील उमेदवार मोठ्या संख्येने शहरात दाखल होणार आहेत. सैन्यभरती ठिकाण सैनिकी शाळा, म्हसोबा फाट्याजवळ, कॉलेज ऑफ फार्मसीच्या मागे, नगर रोड, बीड येथे असून शहरापासून काही अंतरावर असल्याने या भरतीसाठी येणाऱ्या युवकांच्या सोयीसाठी आवश्‍यक नियोजन व तयारी करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

बीड : पोलिस, सैन्यदलात भरतीसाठी सराव करणाऱ्या तरुणांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय सैन्यदलासाठी बीडला तीन ते १३ फेब्रुवारी या कालावधीत भरती होणार आहे. भरतीच्या पूर्वतयारीची बैठक जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. १७) झाली.

पाच वर्षांतून एकदा सैन्यदल भरती होत असल्याने दीर्घकाळानंतर जिल्ह्यात ही संधी प्राप्त झाली आहे. सैन्यभरतीच्या अनुषंगाने शासनाच्या विविध विभागांना देण्यात आलेल्या जबाबदारीचे पालन काटेकोरपणे व्हावे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी कुंभार यांनी व्यक्त केली.

सैन्यभरती अधिकारी कर्नल दीनानाथ सिंग यांनी सैन्यदल भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने सुरू असलेली नोंदणी १९ जानेवारीपर्यंत सुरू राहणार असून, आत्तापर्यंत ४६ हजार उमेदवारांनी यासाठी नोंदणी केली आहे, तसेच ही भरती प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेनुसार असून युवकांनी भरतीचे प्रलोभन व फसवणूक करणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहावे, असे सांगितले.

तीन फेब्रुवारीपासून सलग दहा दिवस ही भरती प्रक्रिया सुरू राहणार असून दररोज जवळपास पाच हजारांपेक्षा जास्त उमेदवारांची क्षमता चाचणी घेतली जाईल. या दहा दिवस चाललेल्या भरती प्रक्रियेतून अंतिम दीड हजारपेक्षा जास्त उमेदवार निवडले जातील. याअनुषंगाने करावयाच्या पूर्वतयारीसाठी आवश्‍यक त्या सूचनाही कर्नल सिंग यांनी दिल्या आहेत.

पूर्वतयारी बैठकीस सैन्यदलाचे कॅप्टन एस. राजू, उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव-पाटील, महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय सरग, पोलिस उपअधीक्षक स्वप्नील राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. सानप, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी एस. एन. कराळे, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे श्री. काळे यासह बीएसएनएल, सैनिकी शाळा, नगरपालिका आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News