आशियाई स्पर्धेत भारताचा दबदबा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 February 2020
  • खाशाबा जाधव संकुलातील या स्पर्धेतील महिलांच्या स्पर्धेतील पहिल्या दिवसाची मानकरी दिव्याच होती.
  • तिने स्पर्धेतील चारही लढतींत प्रतिस्पर्धींना एकतर्फी लढतीत चीतपट केले

मुंबई : दिव्या काक्रणने आशियाई कुस्ती स्पर्धेतील भारतीय महिला कुस्तीगीरांच्या मोहिमेस सुवर्ण सुरुवात केली आणि भारताने महिलांच्या स्पर्धेतील पहिल्या दिवशी पाचपैकी तीन गटात सुवर्णपदके जिंकली. दिव्याने भारताचा या स्पर्धेतील महिला कुस्तीगीरांचा सुवर्णपदकाचा दुष्काळ संपवला, तर सरिता मोर आणि पिंकीने त्यात भर टाकली. 

महिला कुस्तीत जपानची हुकूमत असते आणि चीनही ताकदवान आहे. त्यातच उत्तर कोरियाही हादरे देत असतात. जपानने आघाडीच्या कुस्तीगीरांना ब्रेक दिला आहे, तर चीनला प्रवेश नाकारण्यात आला आणि उत्तर कोरियाने माघार घेतली. याचा फायदा घेत दिव्या (६५ किलो), पिंकी (५५ किलो) आणि सरिता (५९ किलो) या त्यांच्या गटात अव्वल ठरल्या; तर निर्मला देवीला ५० किलो गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताचे या स्पर्धेतील यापूर्वीचे एकमेव सुवर्णपदक नवनीत कौरने जिंकले होते. तिने ही कामगिरी २०१८ च्या स्पर्धेत ६५ किलो गटात केली होती. 

खाशाबा जाधव संकुलातील या स्पर्धेतील महिलांच्या स्पर्धेतील पहिल्या दिवसाची मानकरी दिव्याच होती. तिने स्पर्धेतील चारही लढतींत प्रतिस्पर्धींना एकतर्फी लढतीत चीतपट केले. तिची जागतिक कुमारी विजेत्या नारुहा मात्सुयुकी हिच्याविरुद्धची लढतच माफक रंगतदार झाली. त्यात ४-४ बरोबरी होती. त्याचवेळी दिव्याने प्रतिस्पर्धीवर पकड घेतली आणि तिला उचलून खाली पाडले आणि ४.२० मिनिटे वेळ असतानाच निर्णायक विजय मिळवला. कमी स्पर्धकांमुळे दिव्याच्या गटाची स्पर्धा साखळी पद्धतीने झाली आणि संध्याकाळचे सत्र सुरू होण्यापूर्वीच दिव्याचे सुवर्णपदकही निश्‍चित झाले होते. 

सरिताने निर्णायक लढतीत मंगोलियाच्या बॅत्तेसेत्सेग ॲतलांत्सेत्सेग हिला ३-२ असे पराजित केले. सरिताने २०१७ च्या स्पर्धेत रौप्य जिंकले होते, पण त्यानंतर ती आंतरराष्ट्रीय स्पर्धांपासून दूर होती. पिंकीने मंगोलियाच्या दुलगून बोलोर्मा हिला हरवून बाजी मारली. सरिताने जपानच्या प्रतिस्पर्धीस हरवून उपांत्य फेरी गाठली होती, पण पिंकी जपानी प्रतिस्पर्धीविरुद्ध पराजित झाली होती; पण तिने मारीना झुयेवा हिला हरवून अंतिम फेरी गाठली. दरम्यान, अकरा राष्ट्रीय स्पर्धा जिंकलेली निर्मला देवी निर्णायक लढतीत जपानच्या मिहो इगाराशी हिच्याविरुद्ध २-३ अशी पराभूत झाली. 

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News