भारताने ठोकलं, तेही हॅटट्रिक आणि धावांच्या जीवावर जिंकलं

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 19 December 2019

कुलदीपने एकदिवसीय क्रिकेटमधील आपली दुसरी हॅटट्रिक केली. त्याने आपल्या आठव्या षटकात शेय होप, जेसन होल्डर आणि अलझारी जोसेफ यांना सलग तीन चेंडूंवर बाद केले.

विशाखापट्टणम : धावांचा पाऊस अन्‌ विक्रमांचा पूर त्यानंतर कुलदीपच्या हॅटट्रिकचा दणका...भारतीयांच्या या अफलातून कामगिरीसमोर वेस्ट इंडीजचा वाताहत झाली. भारताने हा दुसरा सामना 107 धावांनी जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

रोहित शर्माचे दीडशतक; त्याने शतकवीर केएल राहुलसह केलेली द्विशतकी सलामी, त्यानंतर श्रेयस अय्यरचे सलग चौथे अर्धशतक, रिषभ पंतची तुफानी टोलेबाजी या दोघांचीही घणाघाती भागीदारी; अशा प्रकारे भारताने धावांचे इमले उभे केले त्यावर कुलदीपने हॅटट्रिकचा कळस चढवला.

मालिकेतले आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय अनिवार्य असलेल्या भारतान 5 बाद 387 धावा केल्या. त्यानंतर विंडीजला 43.3 षटकांत गुंडाळले, कुलदीपने एकदिवसीय क्रिकेटमधील आपली दुसरी हॅटट्रिक केली. त्याने आपल्या आठव्या षटकात शेय होप, जेसन होल्डर आणि अलझारी जोसेफ यांना सलग तीन चेंडूंवर बाद केले. पहिल्या सामन्यात 288 धावांचे लक्ष्य विंडीजने सहज पार केले होते. आज मात्र शेय होप आणि निकोलन पुरन यांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी शरणागती स्वीकारली.

त्या अगोदर रोहित शर्मा (138 चेंडूत 159), केएल राहुल (104 चेंडूत 102) या दोघांची 230 चेंडूत 227 धावांची सलामी. 

श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत (16 चेंडूत 39) यांची 25 चेंडूत तब्बल 73 धावांच्या भागीदारीचा घणाघात. त्यामुळे भारताच्या धावांचा आलेख सुसाट वेगाने पळत राहिला. विराट कोहली शून्यावर बाद झाला, तरीही एवढा मोठा धकामा सादर झाला हे विशेष. 

श्रेयस अय्यर सुरुवातीला रोहितला स्ट्राईक देत होता, पण त्याने डावाच्या 47 व्या षटकात कमाल केली. रॉस्टन चेसच्या या षटकात पहिल्या नोबॉल चेंडूवर पंतने एकेरी धाव काढली त्यानंतर श्रेयसने चार षटकार आणि एका चौकार मारला. या षटकात एकूण 31 धावा काढल्या. हा विक्रम ठरला. त्याअगोदरच्या कॉट्रेलच्या षटकात पंतने 24 धावा कुटल्या होत्या.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News