भारतापुढे माजी जगजेत्यांचे आव्हान

सुनंदन लेले 
Sunday, 9 June 2019
  • भारत-ऑस्ट्रेलिया आज श्रेष्ठत्वाची लढाई
  • तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांमुळे कडव्या लढतीची प्रतीक्षा

लंडन - यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया किंवा भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांना भावनिकदृष्ट्या जास्त महत्त्व असेल, पण शुद्ध क्रिकेटच्या बाबतीत बोलायचे झाले, तर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याला नक्कीच जास्त धार वाटते. गेल्या काही वर्षांत भारतीय संघ ऑस्ट्रेलियन संघाला भिडतो तेव्हा सर्वोत्तम क्रिकेट बघायला मिळते. अर्थातच रविवारी लंडनच्या ओव्हल मैदानावर होणाऱ्या सामन्याकडून क्रिकेट रसिकांच्या जास्त अपेक्षा आहेत.

दोन सामने जिंकून ऑस्ट्रेलियन संघ लंडनला आला आहे आणि साउदम्पटनला दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून भारतीय संघ ओव्हल मैदानावर हजर झाला आहे. कागदावर कोणत्याही संघाला उजवे-डावे करता येणार नाही इतके दोन्ही संघ बलवान आहेत. दोन्ही संघांची बलस्थान वेगवान गोलंदाजी आहे. मिचेल स्टार्कने गेल्याच सामन्यात पाच फलंदाजांना बाद करताना केलेल्या गोलंदाजीची आठवण ताजी आहे. ऑस्ट्रेलियन संघाकरता जसप्रीत बुमरा आणि कुलदीप यादव मुख्य प्रतिस्पर्धी असतील.

वेस्ट इंडीज संघाने ऑस्ट्रेलियाचे पहिले पाच फलंदाज झटपट बाद करण्यात यश मिळवले होते. ऑस्ट्रेलियन संघाची खरी ताकद त्यानंतर दिसून आली. ५ बाद ७९ धावसंख्येवरून स्टीव्ह स्मिथने राहिलेल्या फलंदाजांना हाताशी धरून नुसता तोल सावरला नाही, तर पार २८८ धावांची मजल गाठून दाखवली. थोडक्‍यात, ऑस्ट्रेलियन संघ कधीच हार मानत नाही हे भारतीय खेळाडूंना पक्के माहीत आहे.

ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करायचे झाल्यास भारतीय फलंदाजांना दर्जेदार गोलंदाजीचा सामना करत मोठी धावसंख्या उभारून दाखवावीच लागेल. वेगवान गोलंदाजांसोबत ॲडम झॅम्पाची लेगस्पीन फलंदाजांना त्रास देत आहे. पहिल्या सामन्यात शिखर धवनला चांगला खेळ करता आला नव्हता. विराट कोहलीने जम बसल्यावर विकेट बहाल केली होती. ऑस्ट्रेलियन संघासमोर अशा चुका करणे महागात पडेल हे कोहली जाणून आहे.

टेलिव्हिजन प्रेक्षकांचे गणित लक्षात ठेवून भारताचे सामने स्थानिक वेळेनुसार सकाळी १०.३० ला चालू करत आहेत. लंडनची हवा अजून तशी गार आहे. सकाळी १०.३० वाजता सूर्य जास्त प्रखर नसल्याने मैदानावरचा ताजेपणा जाणवतो. ओव्हल मैदानाची खेळपट्टी मोठ्या सामन्याकरता चांगली तयारी गेली आहे. तरीही पहिली गोलंदाजी करणाऱ्या संघाला सुरुवातीचा एक तास मदत होण्याची शक्‍यता नाकारता येत नाहीय.

भारतातून मोठ्या संख्येने क्रिकेट रसिक रविवारचा सामना अनुभवायला लंडनला दाखल झाले आहेत. प्रेक्षागृह खचाखच भरले जाणार यात काडीमात्र शंका नसेल. ऑस्ट्रेलियाचा मिसेल स्टार्क आणि भारताचा जसप्रित बुमरा यांच्या यशावर सामन्याचे भवितव्य.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News