'.. तर भारतही बनू शकतो खेळांची महासत्ता', भारताच्या कर्णधारानेच मांडले विचार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 31 July 2019

छेत्री म्हणाला...

  • स्वप्नात जे पाहिले, त्यापेक्षा मी खूप काही मिळविले
  • आता फुटबॉलसाठी सर्वोत्तम योगदान देणे ही माझी जबाबदारी
  • निवृत्तीनंतर जेव्हा माझी चर्चा होईल, तेव्हा याने फुटबॉलसाठी काही तरी केले असे कुणी बोलले तर मला आवडेल
  • नवे प्रशिक्षक चांगले आहेत. खेळाडूंशी त्यांनी झटपट जुळवून घेतले आहे. 
  • इंटरकाँटिनेंटल स्पर्धेत बरेच खेळाडू जखमी असल्यामुळेच आम्हाला अपयश आले
  • विश्‍वकरंडक पात्रता स्पर्धेत भारतीय संघ चमकदार कामगिरी करेल.

नवी दिल्ली : गेल्या दहा वर्षांत भारताची फुटबॉलमध्ये प्रगती झाली असली, तरी अजूनही खूप काही करण्याचे बाकी असल्याचे मत भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्री याने व्यक्त केले आहे.

आशियात पहिल्या दहांत येण्यासाठी प्रत्यक्ष फुटबॉल आणि त्याचे व्यवस्थापन यामध्ये असलेली दरी कमी करण्याची गरज असल्याचे सांगून छेत्री म्हणाला, ‘‘भारतीय फुटबॉलला केवळ तळापासून प्रगती करायची नाही, तर सर्वांगीण प्रगतीची गरज आहे. आपण फक्त प्रगतीच्या मार्गावर आहोत. आशियातही पहिल्या दहांमध्ये नाही. अन्य आशियाई देशांपेक्षा आपला प्रगतीचा वेग खूपच कमी आहे. आपल्याला जिथपर्यंत पोचायचे आहे, तेथे पोचण्याचा मार्ग आपल्याला सापडला आहे. गरज आहे ती तेथेपर्यंत पोचण्यासाठी आवश्‍यक असलेला वेग वाढविण्याची.’’

भारताच्या प्रगतीविषयी बोलताना सुनील म्हणाला, ‘‘आपल्याकडे गुणवत्तेचा शोध अचूक होत नाही, पायाभूत सुविधांचा अभाव आहे, खेळाडूंना योग्य आहार मिळतो का नाही ? ही माहितीदेखील आपल्याला नाही. प्रगतीच्या मार्गावर असलो, तरी उद्दिष्टापासून आपण खूप लांब आहोत.  गेल्या दहा वर्षांपेक्षा परिस्थिती सुधारली आहे, इतकेच आपल्याला समाधान आहे.’’

आपल्याकडे गुणवत्तेचा शोध अचूक होत नाही. योग्य वेळी आणि वयात खेळाडू शोधायला हवा, असे त्याने सांगितले. तो म्हणाला, ‘‘अकरा वर्षांचा मुलगा आणि १४व्या वर्षीचा मुलगा यात खूप मोठा फरक आहे. मुलगा ११ वर्षांचा असतानाच त्याला प्रगतीच्या कार्यक्रमात ओढायला हवे. कोट्यवधीची लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात गुणत्ता नाहीच आणि गुणवान खेळाडूही नाही, अशी स्थिती कधीच येणार नाही. येत असेल, तर ते दुर्दैव म्हणावे लागेल. आपल्याला या आघाडीवरदेखील प्रगती करायची आहे.’’

भारताच्या १७ वर्षांखालील संघाचा कर्णधार अमरजित सिंग आणि नरिंदर गेहलोत हे खेळाडू आता वरिष्ठ संघातून खेळू लागले आहेत हे भारतातील फुटबॉलच्या प्रगतीचे उदाहरण देता येईल, असेही त्याने सांगितले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News