हिमोग्लोबिनअभावी तरुणींच्या आजारांत वाढ
शहरातील जवळपास पन्नास टक्क्यांहून अधिक महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असल्याचे आढळून येत आहे. चुकीची आहारपद्धती, अतिश्रमाची कामे, अनियमित आहार, व्रतवैकल्य करणे, पालेभाज्या कमी खाणे या कारणाने हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते
मुंबई : काही वर्षांत तरुणींच्या आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. शरीरातील अत्यावश्यक घटकांची कमतरता यामुळे सिकलसेल, ॲनेमिया, कर्करोग, गर्भाशयाचे आजार यांचेही प्रमाण वाढलेले दिसून येते. हिमोग्लोबिन, लोह, प्रथिने यांसारख्या घटकांच्या कमतरतेमुळे महिलांच्या आजारात वाढ होत आहे. बदलती जीवनशैली व आहाराच्या चुकीच्या सवयी यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावण्यास सुरवात झाली आहे.
शहरातील जवळपास पन्नास टक्क्यांहून अधिक महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असल्याचे आढळून येत आहे. चुकीची आहारपद्धती, अतिश्रमाची कामे, अनियमित आहार, व्रतवैकल्य करणे, पालेभाज्या कमी खाणे या कारणाने हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. स्त्रियांत हिमोग्लोबीन १२ टक्के, तर पुरुषांमध्ये १३ टक्के असणे आवश्यक असते. हे प्रमाण कमी झाल्यास त्वरित उपचार घेणे आवश्यक आहे. स्त्रियांमध्ये मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्राव होणे, गर्भाशयातील हार्मोन्स कमी-जास्त होणे, गर्भाशयातील गाठी यामुळे रक्तस्त्रव जास्त झाल्यामुळे अशा समस्या उद्भवतात. तर काही वेळा कर्करोगासारख्या आजाराची लागण होत असल्याने हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. खासकरून महाविद्यालयीन तरुणी, कामगार महिलावर्ग, श्रमाची कामे करणाऱ्या महिला यांचे प्रमाण अधिक वाढले आहे.
हिमोग्लोबिन कमी होण्याची लक्षणे
धाप लागणे, धडधड वाढणे, श्वास घ्यायला त्रास होणे, अशक्तपणा येणे, शरीराच्या अवयवांचे दुखणे, कामात मन न लागणे, काम करण्याची इच्छा न होणे.
"महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. नियमित व पौष्टिक आहार घेणे यादृष्टीने लक्ष देणे काळाजी गरज आहे. विशेषतः त्या महिला ज्यांना अतिश्रमाची कामे करावी लागतात. हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे."
-डॉ. निवेदिता पवार, स्त्रीरोगतज्ज्ञ