सायबर गुन्ह्यात वाढ; इंटरनेट वापरताना अशी घ्या काळजी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 19 May 2020

एखाद्या चुकीच्या किंवा फेक संकेतस्थळावरील मोफत वेबसीरिज, नाटक, चित्रपट बघण्यासाठी त्यावर क्‍लिक केल्यास तुमचा संगणक अथवा मोबाईलवर एखादे घातक मालवेअर डाऊनलोड होऊन ते हॅक होऊ शकतात, असा इशारा सायबर विभागाने दिला आहे.

मुंबई : लॉकडाऊनमध्ये वेबसीरिज, नाटक, चित्रपट, गाणी डाऊनलोड करत असाल तर सावधानता बाळगा, अशा सूचना राज्य सायबर विभागाने दिल्या आहेत. अनधिकृत लिंक आणि सबस्क्रिप्शनच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक होण्याची शक्‍यता सायबर विभागाने वर्तवली आहे.

लॉकडाऊनमध्ये घराघरांत इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बरेच नागरिक वेबसीरिज, नाटक, चित्रपट व गाणी मोठ्या प्रमाणात डाऊनलोड करत आहेत. एखाद्या चुकीच्या किंवा फेक संकेतस्थळावरील मोफत वेबसीरिज, नाटक, चित्रपट बघण्यासाठी त्यावर क्‍लिक केल्यास तुमचा संगणक अथवा मोबाईलवर एखादे घातक मालवेअर डाऊनलोड होऊन ते हॅक होऊ शकतात, असा इशारा सायबर विभागाने दिला आहे. त्यामुळे असे मोफत वेबसीरिज, नाटक, चित्रपट, गाणी ऐकण्यापूर्वी किंवा संकेतस्थळावर सबस्क्रिप्शन भरण्याआधी ते संकेतस्थळ अधिकृत आहे का, याची खात्री करून घ्या, अथवा तुमच्या डेबिट अथवा क्रेडिट कार्डची माहिती सायबर भामट्यांच्या हाती लागू शकते, असे सायबर विभागाने म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्व वेबसीरिज, नाटक, चित्रपट हे अधिकृत वेबसाईटवरच बघावे, तसेच गाणीही अधिकृत वेबसाईटवरूनच डाऊनलोड करावीत, असे आवाहन सायबर विभागाने केले आहे.

राज्यात 395 सायबर गुन्हे

लॉकडाऊनच्या काळात इंटरनेटवरील गुन्हे रोखण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पावले उचलली असून राज्यात 395 गुन्हे दाखल केले आहेत. टिकटॉक, फेसबुक, ट्‌विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारासंदर्भात राज्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल 395 गुन्ह्यांपैकी 17 अदखलपात्र गुन्ह्यांचा समावेश आहे.

आक्षेपार्ह व्हाट्‌सऍप मेसेजेस - 169 गुन्हे
आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्‌स - 154 गुन्हे
टिकटॉक व्हिडीओ - 18 गुन्हे
आक्षेपार्ह ट्‌विट - 7 गुन्हे
आक्षेपार्ह इन्स्टाग्राम पोस्ट - 4 गुन्हे
अन्य समाज माध्यमांचा (ऑडिओ क्‍लिप्स, युट्युब) गैरवापर केल्या प्रकरणी 43 गुन्हे दाखल.
- आतापर्यंत 211 आरोपींना अटक
- एकूण 102 आक्षेपार्ह पोस्ट्‌स हटवल्या

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News