कोरोना योद्ध्यांना प्रोत्साहन भत्ता दिला जाणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 5 June 2020
  • ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणाऱ्या आरोग्य विभागाच्या आशा गटप्रवर्तक तसेच अर्धवेळ स्त्री परिचर यांना त्यांच्या कामाची दखल घेऊन प्रत्येकी एक हजार रुपये इतकी प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

राज्यातील गावांमध्ये सर्व यंत्रणा जीवाची पर्वा न करता दिवस-रात्र कोरोना महामारीच्या संकटाचा मुकाबला करीत आहेत. गावपातळीवरील हे कर्मचारी म्हणजे कोरोना विषाणूविरुद्ध लढणारे योद्धेच आहेत. या कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रत्येकी एक हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, पण यामध्ये आशा गटप्रवर्तक तसेच अर्धवेळ स्त्री परिचर बाकी होते. 

आता या कर्मचाऱ्यांनाही प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सुमारे 13 हजार 500 आशा गटप्रवर्तक आणि अर्धवेळ स्त्री परिचरांना याचा लाभ होणार आहे. चालू महिन्यातच या कर्मचाऱ्यांना रकमेचे वाटप करण्याचे निर्देश जिल्हा परिषदांना देण्यात आले आहेत असे त्यांनी सांगितले. राज्यात आतापर्यंत कोरोनाला रोखण्यासाठी काम करणाऱ्या एकूण दोन लाख 74 हजार इतक्‍या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यात आली आहे; तर कोरोनाविरुद्ध काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही वेतनासाठी असलेली ग्रामपंचायत करवसुलीची अट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे चालू वर्षात त्यांचे संपूर्ण वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News