मुंबईनजीक आशियातल्या सर्वात मोठ्या डेटा सेंटरचे उद्घाटन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 7 July 2020

हिरानंदानी ग्रुपने बदलत्या काळाची पाऊले ओळखून मुंबईनजीक आशियातले सर्वात मोठे डेटा सेंटर उभारल्याने निश्चितच राज्याला याचा फायदा होईल. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आपली आगेकूच अशीच व्हावी. डाटाचे महत्व लक्षात घेऊन पुढील काळात सुद्धा राज्य शासन विशेषत: डाटा सेंटर्सना प्रोत्साहन देईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले

मुंबई (प्रतिनिधी): हिरानंदानी ग्रुपने बदलत्या काळाची पाऊले ओळखून मुंबईनजीक आशियातले सर्वात मोठे डेटा सेंटर उभारल्याने निश्चितच राज्याला याचा फायदा होईल. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आपली आगेकूच अशीच व्हावी. डाटाचे महत्व लक्षात घेऊन पुढील काळात सुद्धा राज्य शासन विशेषत: डाटा सेंटर्सना प्रोत्साहन देईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते आज पनवेल येथील 600एकर हिरानंदानी फोर्च्युन सिटीमध्ये 8.2 लाख स्क्वेफूट जागेवर उभारलेल्या योट्टा डेटा सेंटरचे ऑनलाईन उद्घाटन करीत होते.

यावेळी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद, उद्योगमंत्री सुभाष देसाई हेही सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने डेटावर आधारित अर्थव्यवस्थेला प्राधान्य द्यायचे ठरविले आहे. त्यादृष्टीने राज्यात डेटा सेन्टर्स उभारण्याला प्राधान्य देत आहोत. या स्टेट ऑफ दि आर्ट डेटा सेन्टर्समुळे जागतिक स्तरावरही महाराष्ट्राची छाप पडणार आहे. मुळातच डेटा सेन्टर्स गुंतवणुकीस उत्तेजन देतात तसेच त्यांचे आयुष्यही मोठे असते. त्यांचा दीर्घकालीन फायदा राज्यातील अभियांत्रिकी, बांधकाम उद्योगाला विशेषत: जागतिक स्तरावरील सेवा देतांना होतो.  

महाजॉब्स पोर्टलची सुरुवात करून महाराष्ट्राने मोठी झेप घेतली आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्याला सर्व प्रकारच्या मनुष्यबळाची गरज असते. उद्योगांची गरज आणि नोकरी इच्छुक व्यक्ती यांची सांगड घालणारे महाजॉब्स हे एक वैशिष्ट्यपूर्ण पोर्टल आहे. पूर्वी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज च्या माध्यमातून फक्त बेरोजगारांची माहिती कळायची. पण किती लोकांना रोजगार मिळाला हे कळायचेच नाही. तसे या पोर्टलच्या बाबतीत अजिबात होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. या पोर्टलचा नोकरी, रोजगार देण्यासाठी किती उपयोग होतो याचा नियमित आढावा घेतला जाईल. अडचणींची दखल घेऊन पोर्टलच्या माध्यमातून किती रोजगार उपलब्ध करून दिले गेले हे ही सांगितले जाईल. 

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आज कोरोनाशी आम्ही लढतो आहोत तेव्हा तंत्रज्ञान आमच्या खूप मदतीला येतेय. टेलीमेडिसिन असो, टेलीआयसीयू किंवा आमच्या वरळी येथील कोविड केंद्रावर तर रोबो हे डॉक्टरांना मदत करीत आहेत. केंद्र सरकारचे मोबाईल एप आरोग्य सेतू , किंवा रुग्णांसाठी बेड्सची रिअल टाईम माहिती देणारे आमचे डॅशबोर्ड असो किंवा वैद्यकीय उपकरणे असोत. आताच्या युगातले हे तंत्रज्ञान जीवन देणारे आणि आयुष्य समृद्ध करणारे आहे. मुंबईत कशा रीतीने आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर दिला आहे याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. सध्याच्या या कोविड परिस्थितीत दाता आणि डाटा या दोघांनाही खूप महत्व आले आहे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

याप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद म्हणाले की आमचे सरकार येण्यापूर्वी केवळ 2 मोबाईल कंपन्या देशात होत्या ,आता 260 कंपन्या आहेत. इंत्र्नेत वापर जगाच्या तुलनेत 20टक्के असला तरी डेटा उपयोग केवळ 2टक्के आहे. येणाऱ्या काळात कृत्रिम बुद्धीमत्ता, मोबाईल इकॉनॉमी , डेटा व्यवस्थापन, डेटा साठवणूक आणि सुरक्षा याला प्रचंड महत्व येणार आहे. डेटा संरक्षण कायदाही आपण मंजूर केला आहे अशी माहिती त्यांनी दिली. प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दर्शन हिरानंदानी यांनी प्रास्ताविक करून या डेटा सेंटरची माहिती दिली. हिरानंदानी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष डॉ निरंजन हिरानंदानी व योट्टा इन्फ्रास्ट्रक्चरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील गुप्ता यांनी आभार मानले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News