ऑनलाईन फसवणुकीपासून वाचवण्यासाठी सरकारचे हे महत्त्वाचे पाऊल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 August 2020
  • आता मोठ्याप्रमाणात ऑनलाईन गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे.
  • बँक खातेधारकांच्या फसवणुकीचे, ऑनलाईन गुन्ह्यांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढते आहे,  त्याचा फटका अनेकांना बसतो.  

मुंबई :-  आता मोठ्याप्रमाणात ऑनलाईन गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. बँक खातेधारकांच्या फसवणुकीचे, ऑनलाईन गुन्ह्यांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढते आहे,  त्याचा फटका अनेकांना बसतो.  ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाची नियमावली आणली आहे. त्यामुळे ग्राहकांना स्वत:च्या बँक खात्याचे संरक्षण करता येईल. केंद्रीय गृह मंत्रालयाने सायबर सुरक्षा आणि जागरूकतेसाठी 'सायबर दोस्त' नावाच्या ट्विटर हँडलवरून ग्राहकांना विविध सूचना देण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकांनी बँकेच्या कामासाठी दोन ई-मेल अकाऊंट्स वापरण्याचा सल्ला सायबर दोस्तने दिला आहे. ग्राहकांनी एका ई-मेल खात्याचा वापर संवाद साधण्यासाठी,  तर दुसऱ्या खात्याचा वापर व्यवहारांसाठी करावा,  असे आवाहन करण्यात आले आहे.

'नेहमी दोन वेगवेगळी ई-मेल खाती वापरावीत. त्यातील एका ई-मेल तुम्ही तुमच्या व्यक्तिक कामासाठी वापरावा आणि दुसऱ्या ई-मेलचा वापर आर्थिक व्यवहारांसाठी करा. सोशल नेटवर्किंग साईट्ससाठी वेगळे ई-मेल खाते वापरा. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन फसवणुकीपासून सुरक्षित राहू शकता,' असे सायबर दोस्तने ट्विटमध्ये म्हटले आहे.

ऑनलाईन फसवणूक करणारे अनेकदा ई-मेल पाहून ग्राहकांना आमिष दाखवतात. त्यानंतर ग्राहकांना त्यांच्या बँक खात्याची,  क्रेडिट कार्ड्सची माहिती देऊन आपल्या जाळ्यात ओढतात. त्यामुळेच सरकारने सायबर दोस्तच्या माध्यमातून ग्राहकांच्या बँक खात्याच्या सुरक्षेसाठी उपयुक्त टिप्स देण्यास सुरुवात केली आहे. 'तुम्ही आर्थिक व्यवहारांसाठी वापरत असलेल्या ई-मेल खात्याचा उल्लेख सोशल मीडियावर कुठेही करू नका. सोशल मीडियावर अकाऊंट सुरू करताना आर्थिक व्यवहारांसाठी वापरत असलेल्या ई-मेल खात्याचा उपयोग करणे टाळा,' असा सल्ला सायबर दोस्तने दिला आहे.

विविध प्रकारची वेब ब्राऊजर्स वापरताना सीव्हीव्ही, एक्स्पायरी डेट, कार्ड नंबर, बँक खाते क्रमांक अशी अतिशय संवेदनशील स्वरुपाची माहिती प्रत्येकवेळी टाईप करा. त्यासाठी ऑटो-फिलचा पर्याय निवडू नका, असे आवाहन सायबर दोस्तने केले आहे. ऑनलाईन फसवणूक करणारे सोशल मीडियाच्या माध्यमातूनही फसवणूक करू शकतात. त्यामुळे सतर्क राहण्याचा सल्लादेखील याआधी सायबर दोस्तने दिला होता. 'सोशल मीडिया अकाऊंट हॅक करून तुमच्या कुटुंबातील सदस्य, मित्र परिवाराकडून आर्थिक मदत मागितली जाऊ शकते. त्यामुळे सावध राहा,' असे सायबर दोस्तने म्हटले होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News