राज्यातील अस्थिरता दूर करण्यासाठी सरकारचा महत्त्वपुर्ण निर्णय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 28 April 2020
  • यावैळी मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले निर्णय पुढील प्रमाणे

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता.26) सह्याद्री अतिथिगृह येथे मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेच्या रिक्त एका जागेवर आमदार करण्याच्या यापुर्वी मंत्रीमंडळाने केलेल्या शिफारशीवर राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी तत्काळ कार्यवाही करावी. याबाबत पुनरुच्चार करण्याची विनंती करण्यात आली आहे.

विधानपरिषद रिक्त जागेबाबत राज्यपालांना केलेल्या विनंतीचा पुनरुच्चार

महाराष्ट्र विधान परिषदेच्या एका रिक्त जागेवर विद्यमान मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची नियुक्ती करण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेतला होता व तशी शिफारस माननीय राज्यपाल महोदयांकडे करण्यात आली होती.

सध्या कोरोनाच्या संकटकाळात शासन-प्रशासन जोमाने संकटाचा मुकाबला करत आहे. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील अस्थिरता दूर होणे अत्यावश्‍यक आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाने आज महाराष्ट्र विधान परिषदेच्या एका रिक्त जागेवर विद्यमान मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची नियुक्ती करण्याच्या शिफारशींवर माननीय राज्यपाल महोदयांनी तातडीने कार्यवाही करावी या विनंतीचा पुनरुच्चार केला आहे.

मागील काही दिवसापासून सत्ताधारी आणी विरोधक यांच्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी राहणार का? यावरून जुंपली आहे.यातच राज्यपालांचे कार्यालय अद्याप कोणतीही भुमिका घेत नाही.त्यामुळे संदिग्धता वाढत आहे.यातच भाजपने हा वाद न्यायालयात नेला असता तिथे अपयशच पदरी पडलै आहे.भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,चंद्रकांत पटील,प्रविण दरेकर,किरीट सोमय्या,आशिष शेलार आदींनी तर शिवसेनेचे संजय राऊत यांनी या वादात उडी घेतली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र संयमी,व शांत चित्ताने राज्यातील कोरोना संकटाचा सामना करत आहेत.त्यांनी याबाबत कोणतेही भाष्य केले नाही.

यावैळी मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले निर्णय पुढील प्रमाणे

4 कोटी लिटर दुधाचे रुपांतर भुकटीत करून दुध उत्पादकांना दिलासा*

कोरोनामुळे बाजारात पिशवीबंद दुधाच्या मागणीत घट आली असून दुधाची विक्री 17 लाख लिटरने कमी झाली आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट, मिठाई भांडार मोठ्या प्रमाणावर बंद आहेत. त्यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून 1 महिन्याकरिता 4 कोटी लिटर दुधाचे रुपांतर दुध भुकटीत करण्यास मान्यता देण्यात आली. ही योजना राबविण्यासाठी 127कोटी रुपये इतका निधी आकस्मिकता निधीद्वारे खर्च करण्यात येईल.
अतिरिक्त दुध भुकटी व लोणी एनसीडीएफआयच्या ई पोर्टलवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यास आणि त्यासाठी सेवा शुल्कापोटी 0 .3% खर्चास देखील मान्यता देण्यात आली.
ही योजना महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ (महानंद) यांच्यामार्फत राबविली जाईल. शासन आणि सहकारी संथा यांच्याकडून दुध संकलित केले जाईल. अतिरिक्त दुधाचे रूपांतरण करण्यासाठी दुध भुकटी प्रकल्पांना पॅकिंग व जीएसटीसहा 25 रुपये प्रती किलो व लोण्याच्या पॅकिंगसाठी 15रुपये असा दर देण्यात येईल.

कोविडच्या पार्श्वभूमीवर व्यापारी वर्गाला दिलासा
जीएसटी कायद्यात आवश्‍यक त्या सुधारणा करणार

कोविड 19 साथीच्या प्रादुर्भावामुळे वस्तू व सेवा कर कायद्यातील काही तरतुदींचे विहित मुदतीत कायदेशीर पालन करणे व्यापारी व कर प्रशासनास अवघड झाले असल्याने महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायदा 2017 यामध्ये 168 अ हे कलम नव्याने समाविष्ट करण्यास आज मान्यता देण्यात आली. यासंदर्भात राज्यपालांच्या मान्यतेने अध्यादेश काढला जाईल.

सदरहू 168 अ हे कलम केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियम2017 मध्ये 31 मार्च 2020 रोजीच दाखल करून घेण्यात आले आहे.
यानुसार कुठल्याही आपत्तीत जसे की युद्ध, साथ रोग, पूर, दुष्काळ, आग, वादळ, भूकंप यामध्ये सरकार विविध कर भरणा व इतर सेवांच्या बाबतीत निश्‍चित केलेल्या वेळेची मुदत वाढवू शकते.
ooo

कोविडमुळे सहकारी संस्थांच्या बाबतीत अधिनियमात सुधारणा

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमांच्या विविध कलमांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. कोविडच्या आजारामुळे सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा वेळेवर होऊ शकणार नाही आणि त्यामुळे सभासद क्रियाशील वर्गवारीत न आल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागेल. निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात शासन आदेश व अधिनियमात सुसूत्रता आणणे, लेखा परीक्षण विहित वेळेत करणे शक्‍य नसणे, यासाठी विविध पोटकलमांमध्ये सुधारणा आवश्‍यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला. 18 मार्च 2020पासून सहकारी संस्थांच्या निवडणुकाही 3 महिन्यांसाठी स्थगित आहेत. 5 वर्षांची मुदत संपलेल्या संस्थांच्या समितीच्या सदस्यांना तरतुदीनुसार अधिकार पदे रिक्त करावी लागतील. आणि प्रशासक नेमावे लागतील. संस्थांचे लेखापरीक्षण कोरोनामुळे शक्‍य नाही. ते पूर्ण करण्यासाठी कालावधीत सूट द्यावी लागेल मात्र ते अधिकार शासनास नसल्याने देखील या सुधारणा करणे गरजेचे होते

खरीपासाठी बॅंकांनी शेतकऱ्यांना थकबाकीदार न समजता पिक कर्ज द्यावे

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 मधील पात्र परंतु सध्या निधी अभावी लाभ मिळू न शकलेल्या खातेदारांना बॅंकांनी थकबाकीदार न मानता खरीप 202 साठी नवीन पिक कर्ज द्यावे अशी विनंती केंद्र शासनाच्या माध्यमातून भारतीय रिझर्व्ह बॅंकेस करण्याचा निर्णय झाला.

कोविडमुळे 2019-20 मध्ये घेतलेल्या पिक कर्जाची परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांच्या पिक कर्जाचे पुनर्गठन करणे व या पुनर्गठीत पिक कर्जाच्या परतफेडीच्या पहिल्या ह्प्÷याला एक वर्षाची मुदतवाढ द्यावी, आणि ज्यांचे पुनर्गठन झालेले नाही अशांच्या कर्जास देखील 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ द्यावी अशी विनंती करण्याचा निर्णय झाला. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत आत्तापर्यंत18.94 लाख शेतकऱ्यांना 11 हजार 989 कोटी रुपये लाभ देण्यात आला आहे. अद्यापही 11.59 लाख शेतकऱ्यांना 9 हजार 866 कोटी रुपये लाभ देणे बाकी आहे. आकस्मिकता निधीतून या योजनेसाठी 12 हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

नांदेड महापौर, उपमहापौर निवडणुका पुढे ढकलल्या

नांदेड महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर यांच्या निवडणुका कोविडच्या संक्रमणामुळे महिने किंवा राज्य शासन ठरवेल त्या तारखेपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भातील अध्यादेश मान्यतेसाठी राज्यपालांकडे पाठविण्यात येईल.
या महापौर व उपमहापौर यांचा कालावधी तरतुदीनुसार अडीच वर्षे आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News