या शहरात स्वर्ग दिसतो, जाण्यापुर्वी हे लक्षात ठेवा

Sunday, 26 May 2019

कित्येक वर्षांपूर्वी मी देवाला एक अर्ज देऊन ठेवला होता, ‘देवा, माझं निवृत्तीनंतरचं आयुष्य मला काश्मीरमधील खोऱ्यामध्ये घालवायचं आहे; विशेषतः युशमर्गमध्ये किंवा गेलाबाजार दूधपथरी पण चालेल. हे परमेश्वरा तू त्याची तरतूद कर.’ गेल्या अनेक वर्षांत या अर्जामध्ये बदल करावा असं मला कधीच वाटलं नव्हतं. अगदी अमेरिकेतील महत्वाची सगळी शहरं पाहून झाल्यावरही अर्जात बदल झाला नव्हता. पण युरोप खंडातील विविध देश पाहून बहुतेक मला अर्ज पुन्हा नव्याने खरडावा लागेल असं स्पष्ट दिसतंय.

कित्येक वर्षांपूर्वी मी देवाला एक अर्ज देऊन ठेवला होता, ‘देवा, माझं निवृत्तीनंतरचं आयुष्य मला काश्मीरमधील खोऱ्यामध्ये घालवायचं आहे; विशेषतः युशमर्गमध्ये किंवा गेलाबाजार दूधपथरी पण चालेल. हे परमेश्वरा तू त्याची तरतूद कर.’ गेल्या अनेक वर्षांत या अर्जामध्ये बदल करावा असं मला कधीच वाटलं नव्हतं. अगदी अमेरिकेतील महत्वाची सगळी शहरं पाहून झाल्यावरही अर्जात बदल झाला नव्हता. पण युरोप खंडातील विविध देश पाहून बहुतेक मला अर्ज पुन्हा नव्याने खरडावा लागेल असं स्पष्ट दिसतंय. युरोपमधील फ्रान्स, बेल्जियम, नेदरलँड्स, जर्मनी, ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड असे एकूण सहा देश पाहून युरोपच्या अगदी प्रेमात पडायला झालय.
    
अमेरिका कितीही भव्य, स्वच्छ, सुंदर, आधुनिक असला, जगाचा ‘मेल्टिंग पॉइंट’ असला, ‘संधींचा देश’ असला, तरी तिथलं मुक्त वातावरण माझ्यासारख्या मध्यमवर्गीय मानसिकतेला मानवणारं नाही. हे मला तो देश फिरतानाच लक्षात आलं होतं. त्यामुळे ‘गड्या आपुला देश बरा’ या भूमिकेतून पुन्हा मायभूमीची ओढ लागली होती. 
    
युरोपिअन देशांचं मात्र वेळगच जग आहे. आपला इतिहास आणि संस्कृती जपत, प्राचीन वारसा जिवंत ठेवत थोडसं रुढीप्रिय शालीन पारंपारिक जीवन माझ्या प्रकृतीला एकदम मानवलं. परमेश्वराने मुक्त हस्ते भरभरून भौगोलीक सौंदर्य यांना बहाल केलं हे जरी खरं असलं तरी अविरत मेहनत, चिकाटी, देशाला प्रगतीपथावर नेण्याची आंतरिक इच्छा, स्वच्छतेचं अंगातच भिनलेलं सहजपण यामुळे हे देश आपल्याला एकदम प्रभावित करतात. तनामनावर जादू करतात हे मात्र खरं! या देशांची गणना विकसित राष्ट्रांत का होते ते विकसित देश जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत लक्षात येत नाही. 

एका काळात जगावर सत्ता गाजवणारे देश आज आर्थिक मंदीत असले तरी त्यांची एकूण शान पाहता, सामान्य माणसाचे उच्च पातळीवरचे जीवनमान पाहता चाळीशी पन्नाशीच्या उंबरठ्यावर उभी असलेली सौंदर्यवती माद्निकेची आठवण येते. अगदी विशी – बावीशितले रूप नसले तरी सौंदर्याच्या खुणा चेहऱ्यावर सहज शोधता येतात. तशीच ही राष्ट्र. वैभवशाली परंपरेची साक्ष देत आजही दिमाखात डौलात उभी आहेत.
  
फ्रान्सची राजधानी पॅरीस शहर म्हणजे कोणत्यातरी अनामिक शिल्पकाराने कोरून काढलेले शहर आहे. फ्रेंच राज्यक्रांतीने जगभराला नवीन विचारांची दिशा दिली. पॅरीस शहर फिरताना इतिहासाच्या  साक्षीदार असलेल्या या प्राचीन वास्तू पावलोपावली दिसतात. शहरातील सगळ्या इमारतींची रचना जवळजवळ सारखीच आहे. रंगही सारखाच, पेस्टल शेड्स. सहा ते पाच मजली इमारती. बहुतेकवेळा दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर नक्षीदार बाल्कनी हे या इमारतीचं  वैशिष्ट्य. वरती निमुळत्या होत जाऊन मग गोलाकारात बंद होणाऱ्या त्यांच्या गच्च्या त्या इमारतींना एकदम रजवाडी रूप प्रदान करतात. बंद गच्चीच्या छपरावर धुरांडे किंवा बाथरूम पाईपचे आउटलेट. त्यामुळे बाहेर कुठे पाईप लटकताना दिसत नाहीत. सगळी इमारतच फेंच युवतींसारखी देखणी वाटते. सगळं शहर कसं एकरूप वाटतं. 
 
आयफेल टॉवर म्हणजे फ्रेंच लोकांच्या अस्मितेचं आणि संस्कृतीचं प्रतीक. १८८७ साली बांधकाम करायला सुरवात झालेला हा मनोरा १८८९ मध्ये बांधून पूर्ण झाला. अलेक्झांडर गुस्ताव आयफेल यांच्या कल्पनेतून साकारलेला हा मनोरा जागतिक प्रदर्शन भरवण्यासाठी बांधण्यात आलेला तात्पुरता मनोरा होता. २० वर्षांनी तो नष्ट करायचा असं ठरलेलं होतं. हा मनोरा आधी कलाकार, विचारवंत यांच्या टीकेचा लक्ष्य बनला होता. कारण हा मनोरा धातूचा होता आणि फ्रान्समध्ये बहुतांश प्राचीन वास्तू या लाकडातील आहेत किंवा दगडातील. त्यामुळे शहराच्या रचनेशी विसंगत असलेल्या या मनोऱ्याला अनेकांनी नाके मुरडली पण आज हाच टॉवर बघायला जगभरातून लोकं येतात. पॅरीसचं नाईट लाईफ मात्र लास वेगासच्या झंजावातापुढे एकदम कुक्कुलं बाळ! 
 
गॉथिक रचनेत उभारलेले अत्यंत पवित्र असं नोत्रे दाम चर्च(Gothic Notre-Dam Cathedral) ही अंतरात्म्याला शांतता, आनंद देणारी वास्तू . काहीच महिन्यांपूर्वी यावर दहशवादी हल्ला झाला होता ज्याने फ्रान्सला हादरवून सोडले. आज त्याची डागडुजी करण्याचं काम जोरदारपणे सुरू आहे. एवढी सुंदर वास्तू नष्ट करण्यामागे कोणती मानसिकता कारणीभूत आहे हे समजणे कठीण आहे. पॅरीसच्या सीन नदीमध्ये बसून या शहराचं दर्शन घेणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. अप्रतिम कोरीवकाम असलेल्या अनेक कमानीखालून आपली क्रुझ जाताना या कमानींवर उभे असणारे, हात हलवत टाटा करणारे आबालवृद्ध या पाण्यावरील सफरीची मजा अजूनच द्विगुणित करतात. नदीचे गटारात रुपांतर कसे करावे ही कला अजून युरोपिअन लोकांना अवगत नाही.  शहराच्या सौंदर्यात नदीमुळे कशी भर पडू शकते ते मात्र युरोपिअन देशांना अवगत आहे. आपण नद्यांना एकतर देवत्व बहाल केलं किंवा मुंबईच्या मिठी नदीसारखे त्याचे नाल्यात रुपांतर केलं. या सीन नदीवर विहरणाऱ्या क्रुझमध्ये बसून शहराचं विहंगम दृश्य पाहता येतं. अस्ताला जाणारा सूर्य, त्याच्या किरणांनी सीन नदीचे चमचमणारे सोनेरी पाणी, नदीमधील क्रुझमधून विहार करणारे आपण प्रवासी आणि दोन्ही किनाऱ्याला उभ्या असणाऱ्या प्राचीन नक्षीदार इमारती, त्यांचे आकाशात थेट घुसलेले सुळके ही अनुभूती म्हणजे आनंदाची परमावधी. किती डोळ्यात साठवू आणि पंचेद्रियानी किती पिऊन घेऊ अशी मनाची द्विधा समाधीस्थ अवस्था. 

शाँज–ए-लिझे’ची कमान असू दे (जगप्रसिद्ध ‘टूर द फ्रान्स’ या सायकल रेसचा आरंभबिंदू) की नेपोलिअन काळात बांधलेलं जखमी सैनिकांचे हॉस्पिटल असू दे.. त्यांचा मुझिक ऑपेरा असू दे की (जिथे कोणीही उभं राहून गाऊ शकतो, आपली कला सादर करू शकतो) ल्यूरे संग्रहालय असू दे (ज्यात लिओनार्डो-दा-विंची या चित्रकाराने चितारलेले मोनालिसाचे जगप्रसिद्ध पेंटिंग आहे)... या सगळ्याच वास्तू फेंच लोकांच्या उच्च अभिरुचीचे प्रतीक आहेत. हे शहर फिरताना इथे कलाकार का जन्माला आले हे अपोआप उमगत जातं आणि कलेला मुक्त स्वातंत्र्य देणाऱ्या या लोकांचं मनोमन कौतुक वाटतं. जगभरातील बालकांना वेड लावणारं ‘डिस्नी वर्ल्ड’ याचा मूळ जन्म पॅरीसमधील आहे हे सत्य बऱ्याच लोकांना ठाऊक नाहीये. 

युरोपिअयन शहरातील रस्त्यांचे वर्णन म्या पामराने काय करावे? आपल्याकडे रस्त्याला तडा गेला की आधी दुर्लक्ष करायचं. काही दिवसांनी दोन चार बाईक स्वार आडवे झाल्यावर मग त्या भेगेवर आधी खडी पसरवायची. त्यानंतर त्यावर डांबर किवा सिमेंटचा लेप द्यायचा. त्या लेपाच्या फुगीर फुगवटयाचे मग एकच काम! ते म्हणजे वाहन चालकांच्या कमरेचे आटे ढिले करणे. तिथे मात्र एवढं सोपं तंत्र त्यांनी अजून भारतीयांकडून आत्मसात केलं नाहीये... तिथे रस्त्याला तडा गेला की त्याच्या काही मीटर आसपास सगळाच रस्ता खोदून चौकोनी किंवा गोलाकार खड्डा तयार करणार आणि मग पूर्ण रस्त्याला सामांतर अशी त्याची भरणी करणार. तीच गत रस्त्यावरील गटारांच्या झाकणाची. तशीच रचना रस्त्यावरून आपल्या बाजूने धावणाऱ्या ट्राम्सच्या रुळांची. सगळे कसे रस्त्यांच्या समांतर पातळीत. मूळ रस्त्याच्या एक इंच वर नाही की एक इंच खाली नाही. सायकल काय, मोटरकार काय कोणत्याही गाड्या त्या रुळांवरून, गटाराच्या झाकणांवरून गेल्या तरी पोटातील पाणीही हलणार नाही.  

सायकलींसाठी वेगळी वाट राखून ठेवलेली. त्यामुळे सायकलीचा नुसता राबता असतो. सूट, बूट, टाय घालून सायकलवरून ऑफिसमध्ये येणारी माणसं पाहून नवल वाटतं. लहानपणी एक छोटी स्कूटर आपण सगळेच चालवायचो. एक पाय रस्त्याला मारत ती पुढे ढकलायला लागायची. अश्या छोट्या स्कूटरसचा तर नुसता सुळसुळाट आहे. फरक इतकाच की तिकडे त्या बॅटरीवर चालतात आणि इकडे आपण त्या पाय रस्त्यावर मारत चालवतो. किती इंधन हे लोकं वाचतात !  

बेल्जियमची राजधानी ब्रूसेल्स पहिली. ‘अणुरेणुया थोकडा | तुका आकाशाएवढा || ‘असं म्हणणाऱ्या संत तुकारामांना अणुचं अस्तिव कळलेलं होतं. आपण मात्र त्यांचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन दुर्लक्षित केला. ब्रुसेल्सला या अणु रचनेची भव्य प्रतिकृती पहिली. मंदिरं, देवालयं यांच्या बांधकामात पैसा ओतणारी आपली भारतीय मानसिकता. अगदी प्रसिद्ध व्यावसायिक घराण्यातील लोकांनीही प्रचंड पैसा ओतून भारतात ठिकठिकाणी मंदिरे बांधली. पण अश्या विज्ञानपूरक वास्तू उभारून वैज्ञानिक दृष्टिकोन लहान वयातच रुजवणे, त्याविषयी आकर्षण निर्माण करणे यात नेमके आपण मागे पडतो. एका नेहरू सायन्स सेन्टरवर मुंबईच्या पिढ्यानपिढ्या पोसल्या गेल्या. पण नवीन विज्ञान मंदिरं उभं करणं काही आपल्याला जमलं नाही. भारतातील एका सर्वेक्षणानुसार शैक्षणिक वास्तूंपेक्षा आपल्याकडे मंदिरांची (सगळ्या धर्मांची मिळून) संख्या जास्त आहे. युरोपात औद्योगिक क्रांती जन्माला आली तेंव्हा आपण देव देव करत अध्यात्म्याची वाट धरली होती. त्यांनी प्रयोगशाळेत देव शोधला आपण देवालयांमध्ये देवाला शोधात होतो.
 
नेदरलँड्स मधील सुंदर शहर अर्थात अॅमस्टरडॅम. 
ट्युलिप शेती हे या शहराचं वैशिष्ट्यं. सगळ्याप्रकारच्या ट्युलिपच्या जाती एकत्रिपणे ट्युलिप गार्डनमध्ये पहायला मिळतात. ज्याला क्युकुन्हाफ गार्डन असही म्हणतात. या शहरात वाहणाऱ्या नदीच्या मार्गातून जहाज जात असेल आणि मध्येच रस्ता आला तर रस्ता अलगत वरच्या दिशेला उघडला जाणार आणि मोकळ्या जागेतून जहाज त्यातून पार होणार. जहाज गेलं की परत रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत होणार. हे सगळं शहर कालव्यांवर वसलंय. जवळपास एक हजार सातशे कालवे शहरातून वाहतात. त्याच्या बाजूला चौदाव्या- पंधराव्या शतकातील अप्रतिम घरं! कालव्यांच्या बाजूला छोट्या छोट्या बागा आहेत. त्यावर खेळणारी लहान मुलं, त्याला लागून सायकलसाठी रस्ते. संध्याकाळी सगळेच शहर या कालव्यालगत असलेल्या बागांमध्ये पहुडलेलं असतं. रस्त्यात ठिकठिकाणी सायकली उभ्या असतात. कोणतीही उचला हवं तिथे जा. आणि पुन्हा सायकल कुठल्याही रस्त्यावर सोडून द्या. अख्ख शहर सायकलीवर फिरतं. त्यामुळे जाडेपण नावालाही सापडत नाही. हवी तर स्वतःची सायकल चालवा किंवा सरकारी! या सायकली चालवणारी आबालवृद्ध माणसं पाहिली की वय बीय या सगळ्या गोष्टी अंधश्रद्धा वाटतात.  

असंच एक इतिहास गोठवून ठेवलेलं शहर म्हणजे कलोन
‘कलोन’ हे  जर्मनीतील अत्यंत प्राचीन गाव आहे. बाराव्या शतकातील रेनीसंन्स काळातील प्राचीन कलोन कॅथेड्रल डोम चर्च हा स्थापत्य शास्त्राचा अप्रतिम नमुना आहे. युनेस्को कडून त्याला world heritage दर्जा प्राप्त झालाय. औषध म्हणून वापरल्या जाणाऱ्या कोलन वॉटरचा जन्म इथलाच. जर्मनीतील हापनहाईम या गावात चौदाव्या आणि पंधराव्या शतकातील घरं आजही तशीच सुंदर अवस्थेत आहेत. लोक आजही त्या घरांमध्ये राहतात. सगळ्या युरोपिअन गावांची रचना म्हणजे टुमदार घरं, त्याच्या भोवती असलेल्या छोट्या बागा आणि भव्य सामुदायिक शेती. बऱ्याच ठिकाणी एका गावाची मिळून एकच शेती.  शेतमाल थेट सरकार विकत घेते. हमीभावाची खात्री. त्यामुळे शेतकरी बऱ्यापैकी सुस्थितीत. मका, राई , बटाटा, गहू आणि दुग्धजन्य पदार्थांची रेलचेल आहे. शंभर-शंभर एकरांची शेती आणि एकच माणूस काम करतोय तेही कोणतीही अडचण न येता! यंत्रांचा इतका परफेक्ट वापर की माणसांची गरजच नाही. त्यामुळे कापणीही एकदम आखीव- रेखीव, नांगरणीही कोणीतरी जमिनीवर सुबक रेषा ओढाव्या इतकी पद्धतशीर. कापणी झाल्यानंतर उरलेली धाटं इतस्तः न पसरता त्यांचा मोठा ड्रमच्या आकारात बांधलेला गोलाकार लंबगोल तो ही तितकाच देखणा. या हिरव्यागार शेतांमध्येच पवनचक्क्या आणि सौर उर्जा निर्माण करणारे प्लांट्स दिसतात.
 
विस्तीर्ण पसरलेली शंभर शंभर एकरांची शेती ही युरोपियन गावांची वैशिष्ट्यं आहेत. ऑस्ट्रिया ते स्वित्झरलंड हा प्रवास म्हणजे स्वर्गाकडे जाणारी वाट होती. मैलोनमैल पसरलेली पिवळी मोहरीची शेते, सूर्यफुलाची शेते तर कधी हिरवागार गव्हाच्या शेताचा प्रचंड मोठा पसरलेला, नजरेतही न मावेल असा गालीचा! मोकळी जमीन म्हणून कुठे दिसत नाही. अगदीच पिक काढून झालं असेल तर दुसऱ्या पेरणीसाठी नांगरलेली जमीन दिसते. तेवढाच काय तो जमिनीचा रंग कळतो. बाकी सगळं हिरव्या रंगाचं साम्राज्य आणि जोडीला रंगीबेरंगी फुलांची पखरण. कधी रानटी तर कधी लागवड केलेली फुलाची शेती. भर शहरातसुद्धा ठिकठीकाणी राखलेली हिरवी मैदाने, फुलाचे गालिचे शहराचे सौंदर्य अधिक खुलवतात.

ऑस्ट्रियाला गेलात म्हणजे स्वरोस्की क्रिस्टल डायमंड गार्डन नही देखा तो क्या देखा? 
हिन्दी सिनेमात कोणीतरी हिऱ्यांचा रेशमी बटवा चुकून उघडतो आणि सगळे हिरे लख- लख करत जमिनीवर पसरतात. मग गुंड माणसं ते हिरे गोळा करायला धावतात हे दृश अनेकदां पाहिलं होतं. देवानंदचा ज्वेल थीफ नाही म्हटलं तरी मनात रुंजी घालत होता. हिऱ्याचा आणि माझा एवढाच संबंध. पण या स्वरोस्की गार्डन मध्ये मात्र डोळे दिपवणारा क्रिस्टल डायमंडचा लखलखाट पहिला आणि खरे हिरेही झक मारतील इतकी त्यांची झळाळी पाहून डोळे निवले.  
 
आम्ही ब्लॅक फोरेस्ट क्रॉस करून स्वित्झरलंडला पोहचलो. ही जंगलं इतकी घनदाट आहेत की भर दिवसाही यात अंधार असतो. म्हणूनच त्याला ब्लॅक फॉरेस्ट म्हणतात. इंग्रजी चित्रपटातील भुताच्या सिनेमात जे वातावरण असतं तसं गुढ काहीतरी वाटतं. इथली लोकं सुट्टीच्या दिवसात मशरूम गोळा करायला या जंगलांमध्ये भटकतात. गावांची, शेतांची हद्द संपल्यावर लगेच ही जंगलं सुरू होतात. यात अस्वलं असतात. एवढ्या गावांमधून पास झालो पण अंगणात, दारात, खिडक्यात एकही मनुष्य नाही. सगळी जणू निर्मनुष्य वस्ती. कार्टून्स मध्ये किवा चित्रात दिसणारी सुबक घरं, रेखीव अंगण. (पूर्वी मला ही चित्रातील घरं म्हणजे कल्पनाविलास वाटायचा. इतकं कुठे आखीव रेखीव वास्तवात असतंय होय?)  अंगणात फुलं आहेत, घसरगुंडी आहे पण त्यावर खेळणारं एकही मूल नाही. पाईन आणि देवदार वृक्ष आणि बर्फाच्या टोप्या घातलेले आल्प्स पर्वत हे स्वित्झर्लंडचं सौंदर्य काश्मीरमध्ये पण आढळतं. फरक एवढाच की तिथे आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध आहेत आपल्याकडे त्याचा अभाव आहे. 

स्वित्झर्लंडला जाताना लागणाऱ्या इंटर्लींकन सिटी मधल्या तलावइतकाच सुंदर असा पेंगोंग लेक लडाखमध्ये आहे. पण तिथे जाण्याचा रस्ताच इतका खडतर की पोहचेपर्यंत माणूस पार ढेपाळून जातो. तरी आता ब्रो (बोर्डर रोड ऑर्गनायझेशन) मुळे बऱ्यापैकी सोय झालीये. या सोयी सुविधा अधिक चांगल्या केल्या तर परदेशी पर्यटकांची संख्या आहे त्यापेक्षा अधिक वाढू शकते यात वादच नाही. चीनी आक्रमणामुळे धोक्यात आलेल्या युरोपिअन अर्थव्यवस्थेला आज पर्यटन व्यवसायाने चांगलाच हात दिला आहे. स्वित्झर्लंड मधील कॉग व्हील ट्रेन ही बर्फ उडवत, उडवत वरती माउंट जुंगफ्राऊला पोहचते. (स्थानिक उच्चार युंगफ्राऊ) त्यात बसून दोन ट्रेन बदलून वरती जुंगफ्राऊला पोहचणे आणि top of the world म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो त्या माउंट टीटलिसला, आधी केबलकारमध्ये बसून आणि नंतर रोट एअरमध्ये (Rotair) बसून पोहचणे, आल्प्सची बर्फाच्छादित हिमशिखरे पादाक्रांत करणे ही पर्यटकांची खास आकर्षणे. 

आमचं नशीब चांगलं असल्याने तो स्वच्छ सूर्यप्रकाश असलेला दिवस होता. पांढऱ्या ढगांना चिरत चिरत केबल कर वर जाते. एवढा सूर्य वर आला असला तरी थंडीने कुडकुडण काही थांबलेले नसतेच. पहिल्या पातळीवर बर्फावर खेळ कळण्यासाठी उत्सुक लोक खाली उतरतात. बाकीचे वर जाऊन रॉट एअर पकडतात. एका वर्तुळाकार रॉट एअरमध्ये एकावेळी ७० लोक बसू शकतात. ती एअर बस म्हणजे पांढरी ओढणी दूर करून कोण्या रुपगार्वितेने आपले मुखकमल दाखवावे अशा रुबाबात पांढऱ्या ढगांमधून, ती ३६० अंशात काचा असलेली काचाळ गोलाकार बस अलगत अवतीर्ण होते. ‘अजी म्या ब्रम्ह पहिले’ अशी अवस्था असताना लोक काचेची बाजू पकडायला सुसाट पाळतात. 

मुंबईतल्या लोकल ट्रेनच्या गर्दीत चढण्याचं कौशल्य इकडे कामाला येतं. तरी बरं ती पृथ्वीसारखी स्वतः भोवती भ्रमण करत फिरते पण विंडो सीट पकडायची सवय सुटेल तर ना! युरोपिअन लोकांचं एक वैशिष्ट्य म्हणजे मानवी जीवाचा विचार करून सगळ्या सोयी उभारणार. ११,००० फुटांवर हिटर असतो. चॉकलेटची दुकाने असतात, खाद्यपदार्थांचे रेस्टॉरंट असतात. तिथे अगदी पावभाजी ते मसाले भातापासून सगळं उपलब्ध असतं. अर्थात किंमत परवडली तरच! युरोचा भाव डोळ्यात पाणी आणतो.   
  
एप्रिल आणि मे  महिन्यांमध्ये युरोपातील सर्वच टुरिस्ट प्लेसेस या ६० ते ७० टक्के भारतीय लोकांनी भरून गेलेल्या असतात तर डिसेम्बर, जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यांत जगभरातून लोक आईस स्कीईंग करायला युरोपात येतात. भारतीय लोकांची गर्दी असलेला एप्रिल आणि मे महिना युरोपिअन लोकांसाठी खडतर असतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अगदी कितीही सूचना टूर गाईडने दिल्या तरी सामुहिक भारतीय मानसिकता या युरोपिअन लोकांना अक्षरशः फीट आणते. वेळेचे बंधन न पाळणे हा सर्वात मोठा सामुहिक भारतीय आजार होय. दोन पैसे वाचावेत म्हणून लंच पॅकेज न घेता ब्रेकफास्ट आणि डिनर पॅकेज  घेतलेले बरेच जण सकाळी नाश्त्याच्या वेळी भरपेट नाश्ता करून, दुपारच्या जेवणाची सोय म्हणून रॅकवरील जिन्नस पर्समध्ये भरभरून घेणारे भारतीय हे हॉटेलच्या एकूणच खाद्यापादार्थ्यांच्या गणिताचे तीन तेरा वाजवतात. शारीरिक अस्वस्थेतेचे कारण देऊन विमानतळावर व्हील चेअरचा आग्रह धरणारे पण युरोपमध्ये नैसर्गिक प्रसाधनगृह वापरताना द्यावे लागणारे ५० सेंट वाचावेत म्हणून धातूच्या रॉडखालून, सराईत सर्कसपटूप्रमाणे अंगाचे मुटकुळे करून लीलया पार होणारे भारतीय, विमान प्रवासात अतिरिक्त अन्नाची आणि कोल्ड ड्रिंक्सची सतत मागणी करून “फ्री आहे, तुम्ही पण मागवा” असा एकमेकांना सल्ला देणारे भारतीय. विमानात पांघरायला दिलेली पांघरूणे ही घरी घेऊन जायची वस्तू आहे असे मानून केबिन बॅगमध्ये ब्लँकेट्स कोंबून, कोंबून भरणारे भारतीय, जेवणाच्या वेळेला उशिरा पोचून ती वेळ मालकाने हजर असलेल्या दुसऱ्या ग्रुपला दिल्यामुळे माउंट टीटलिसच्या बर्फाच्छादित डोंगरावर हाणामारीवर उतरलेले भारतीय अशी भारतीय मानसिकतेची अनेक रूपं पाहायला मिळाली आणि श्रीमंत भारतीयांच्या दरिद्री मानसिकतेचे दर्शन घडले. जर्मनीतील एका हॉटेलात जेवणातील पदार्थांवरून रिसेप्शन काउंटरवर हुज्जत घालणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी जर्मन बाईंना चक्क पोलिसांना पाचारण करावे लागले.  

तोडकं मोडकं इंग्रजी येणारा आमचा बस चालक सतत तक्रार करत होता, “Indian people... diffcult to handle”. “chinees in time, India no time”  (सगळ्या चापट्या डोळ्यांचे लोक चीनी असतात अशी त्याची श्रद्धा होती) त्याच्या या उद्गारानंतर धरणीमाता दुभंगून पोटात घेईल तर बरी अशी अवस्था झाली होती. भारतीयांच्या या कृत्याचे अनेक परकीय लोकांनी छायाचित्रण केले. परदेशात आपण आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करतो याचे भान आपण का विसरतो हेच कळत नाही. सर्वच प्रवासी कपन्यांनी आपल्या पर्यटकांना याबातीत मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. अर्थात आमची टूर गाईड सतत या सूचना देत होती पण झोपलेल्यांना जागं करता येतं झोपेचं सोंग घेतलेल्यांना जागं करण कठीण असतं हेच खरं. 

- डॉ. लतिका भानुशाली